शिंदे गट नावालाच; धोरण भाजपचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदे गट नावालाच; धोरण भाजपचे
शिंदे गट नावालाच; धोरण भाजपचे

शिंदे गट नावालाच; धोरण भाजपचे

sakal_logo
By

44587
वैभववाडी ः सभासद नोंदणीचे फॉर्म आमदार वैभव नाईक यांच्याकडे सुपुर्द करताना शिवसेना पदाधिकारी.

शिंदे गट नावालाच; धोरण भाजपचे

आमदार वैभव नाईक यांची टीका; वैभववाडीत जिल्हा परिषद मतदारसंघनिहाय सभा

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी ता. २० ः शिवसेनेची घौडदौड भविष्यात भाजपसाठी डोकेदुखी ठरणार होती. त्यामुळेच शिवसेनेत फूट पाडण्याची रणनीती दिल्लीत आखली गेली. शिंदे गट हा नावापुरता असून शिवसेना फोडण्याचे धोरण भाजपचेच आहे, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी येथे केली.
जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत. आज भुईबावडा येथील बैठक आटोपल्यानंतर कोकिसरे जिल्हा परिषद मतदारसंघाचा कार्यकर्ता मेळावा येथील आंबडेकर भवनात झाला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, संदेश पारकर, संजय पडते, नीलम पालव, सुशांत नाईक, हर्षद गावडे, माई सरवणकर, नंदू शिंदे, मंगेश लोके, संभाजी रावराणे, गौस पाटणकर, पप्पू धुरी आदी उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘भाजपाला सक्षम पर्याय म्हणून शिवसेना राज्यात आणि देशात पुढे येत असल्याचे भाजपच्या नेतृत्वाच्या निर्दशनास आले होते. त्यामुळे अनेक पातळ्यांवर काम करणाऱ्या मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरण करणे हा एकमेव अजेंडा भाजपने राबविण्यास सुरुवात केली. त्यांनीच शिवसेना फोडली. शिंदे गट हा नामधारी आहे; परंतु जोपर्यंत शिवसेनेत प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, तोपर्यंत शिवसेनेला कधीही धोका नाही. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणात शिवसेनेचेच बीज आहे. नारायण राणे सोडून गेल्यानंतरही येथे शिवसेना भक्कमपणे उभी राहिली. त्यामुळे भविष्यातही कोकण आणि संपूर्ण राज्यात शिवसेनेचीच लाट येणार आहे. कार्यकर्त्यांनी न डगमगता जनतेमध्ये जावे, सत्यस्थिती उलगडून सांगावी. भाजपाची मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची, इतिहास बदलण्याची कुटील रणनीती जनतेसमोर मांडावी. देशातील जनता भाजपच्या धोरणाला कंटाळली आहे. त्यामुळे जनतेचा रोष कमी करण्यासाठी काहीतरी विकासाचा एखादा स्टंट करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम सध्या भाजपाकडून सुरू आहे; परंतु जनता सुज्ञ आहे.’’ दरम्यान, राज्यातील आणि कोकणातील जनतेचा कल विविध माध्यमातून ऐकायला मिळत आहे. आता निवडणुका झाल्या तर शिवसेना एक नबंरचा पक्ष बनेल, अशा प्रकारचे वातावरण आहे. त्यामुळे यापुढील जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका शिवसेनाच जिंकेल, असा विश्वास संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
.....................
कणकवलीला हवाय हक्काचा आमदार
कुडाळात विकासाचा झंझावात सुरू आहे. तेथे जनतेशी नाळ जोडलेले आमदार नाईक विकासाची कामे मार्गी लावत असताना येथील आमदार मात्र कोणतेच काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे या मतदारसंघाला हक्काचा आमदार हवाय, असे मत जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी यावेळी व्यक्त केले.