नव्या ‘नीलक्रांती’ची जिल्ह्यात चाहूल नव्या नीलक्रांतीची चाहूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या ‘नीलक्रांती’ची 
जिल्ह्यात चाहूल
नव्या नीलक्रांतीची चाहूल
नव्या ‘नीलक्रांती’ची जिल्ह्यात चाहूल नव्या नीलक्रांतीची चाहूल

नव्या ‘नीलक्रांती’ची जिल्ह्यात चाहूल नव्या नीलक्रांतीची चाहूल

sakal_logo
By

44591
44594
वसोली ः येथील आठ एकर क्षेत्रामध्ये वीस शेततळी बांधण्यात आली असून त्‍यात मत्स्यपालन केले जात आहे.
-------------

नव्या ‘नीलक्रांती’ची
सिंधुदुर्गात चाहूल

गोड्या पाण्यातील मत्स्यशेती; वसोलीत यशस्वी प्रयोग; आर्थिक स्थैर्याची संधी


लीड
राज्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमधून लाखोंची उलाढाल केली आहे. सिंधुदुर्गात मात्र तब्‍बल ३४ तलाव आणि इतर ठिकाणी मुबलक पाण्याची व्यवस्था असूनही गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीकडे गांभीर्याने पाहिले गेलेले नव्हते; मात्र सिंधुदुर्गात नीलक्रांती घडविण्यासाठी देवगड येथील सुमन कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी जिल्ह्यात हा प्रयोग यशस्वी करत गोड्या पाण्यातील नीलक्रांतीचा पॅटर्न निर्माण केला आहे. सुरुवातीला वसोली (ता. कुडाळ) येथे २० शेततळी बांधून मत्स्यपालन आणि मत्स्यबीज निर्मिती केली. त्‍यानंतर सिंधुदुर्गातील ९ तलावांमध्येही त्‍यांनी मत्स्योत्‍पादनाला प्रारंभ केला. इथल्‍या गोड्या पाण्यातील मासळीला मुंबईसह पश्‍चिम महाराष्‍ट्रात मोठी मागणी असून उत्‍पादित होणारी सर्व मासळी चांगल्‍या दराने विक्री केली जात आहे. जिल्ह्यासाठी रोजगाराचे नवे आभाळ यानिमित्ताने खुले झाले आहे.
- राजेश सरकारे
...............
वसोलीतून सुरुवात
मत्स्य विज्ञान विभागातील पदवी घेतल्‍यानंतर सुमन कुलकर्णी यांनी प्रस्तावित टाळंबा धरण क्षेत्रातील वसोली येथे ८ एकर जागा २० वर्षे भाडे करारावर घेतली. यात १५ शेततळी प्लास्टिक पेपर टाकून तयार केली. माशांना नैसर्गिक पाणीपुरवठा, खाद्य, ऑक्‍सिजन मिळावा यासाठी ५ नैसर्गिक शेततळी निर्माण केली. याखेरीज मत्स्यपालनासाठी नर्सरीचीही उभारणी केली. सुरुवातीला कोल्‍हापूर येथून रोहू, कटला आणि सायप्रस या जातीचे मत्स्यबीज आणले. त्‍याची नर्सरीमध्ये योग्‍य वाढ झाल्‍यानंतर ते प्लास्टिक पेपर असलेल्‍या शेततळ्यांमध्ये सोडण्यात आले. तेथे चार महिन्यांची वाढ झाल्‍यानंतर हे मासे नैसर्गिक शेततळीमध्ये, तर काही मासे तलावामध्ये सोडण्यात आले. वर्षभरात एक किलोपर्यंत माशाचे वजन झाल्‍यानंतर ते विक्रीसाठी पाठविले जातात.
...............
मार्केट मोठे
कोकण किनारपट्टीमध्ये समुद्री मासळी मुबलक प्रमाणात मिळत असल्‍याने इथे गोड्या पाण्यातील माशांना फारशी मागणी नाही; मात्र मुंबई आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रात गोड्या पाण्यातील मासळीला प्रचंड मागणी असल्‍याचे श्री. कुलकर्णी सांगतात. चांगली वाढ झालेली मासळी तयार झाल्‍यानंतर हे मासे आयसोलेटेड वाहनांतून मुंबई, कोल्‍हापूर आणि कराड येथील हॉटेल इंडस्ट्रीमध्ये पाठवले जात आहेत. कोल्‍हापूरसह सांगली, सातारा, पुणे या भागातूनही गोड्या पाण्यातील मासळीला मोठी मागणी आहे; मात्र या मागणीप्रमाणे मासे उपलब्‍ध होत नाहीत. त्‍यामुळे सिंधुदुर्गातील इतर तलाव भाड्याने घेऊन श्री. कुलकर्णी यांनी मत्स्योत्‍पादन सुरू केले आहे.
................
वीस लाख मत्स्यबीज आयात
शेततळ्यातील यश‍स्वी मत्स्यपालनानंतर श्री. कुलकर्णी यांनी गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीसाठी तब्‍बल १ कोटीची गुंतवणूक केली आहे. त्‍यासाठी त्‍यांना कोल्‍हापूर येथील आयकर सल्‍लागार गजानन दिवाण यांचे आर्थिक सहकार्य लाभले. या गुंतवणुकीतून पहिल्‍या टप्प्यात त्‍यांनी पश्‍चिम बंगाल येथून २० लाख मत्स्यबीज आणले. जिल्ह्यातील ९ तलावांमध्ये या मत्स्यबीजापासून रोहू, कटला, सायप्रस जातीचे मासे तयार होऊ लागले आहेत. ऑगस्ट अखेरपासून डिसेंबरपर्यंत हे मासे विक्रीसाठी पाठविले जाणार आहेत. त्‍यांनतर पुन्हा वीस लाख मत्स्य बीज आणून मत्स्योत्‍पादनाची साखळी सुरू ठेवली जाणार आहे.
................
मत्स्यबीज उबवण केंद्राचीही उभारणी
गोड्या पाण्यातील रोहू, कटला, सायप्रस, बासा, म्रिगेल आदी मत्स्यबीज केरळ, पश्‍चिम बंगाल, आंध्रप्रदेश आदी राज्‍यांतील मत्स्यबीज उबवण केंद्रातून (हॅचरीज) आणावा लागतो. यात एक रुपया मत्स्यबीज असेल, तर तीन ते चार रुपये वाहतूक खर्च येतो. याखेरीज इतक्‍या दूरवरून मत्स्यबीज आणताना मत्स्यबिजामध्ये घटही मोठ्या प्रमाणात होते. त्‍यामुळे मत्स्यबिजापासून मासेपालन करणाऱ्या छोट्या उद्योजकांना मत्स्यबीज आयात आणि माशांची विक्री यापासून मोठा फायदा मिळत नाही. त्‍यामुळे पुढील काळात सिंधुदुर्गातच मत्स्यबीज उबवण केंद्राची उभारणी केली जाणार असल्‍याची माहिती सुमन कुलकर्णी आणि गजानन दिवाण यांनी दिली. तसेच इथल्‍या वातावरणात मत्स्यबीज तयार होणार असल्‍याने मत्स्योत्‍पादनात वाढ होणार असून आयात करताना मत्स्यबिजांचा होणारा नाश देखील टळणार आहे.
.................
जिल्ह्यात अत्यल्प खवय्ये
सिंधुदुर्गातील खवैय्यांकडून नदी, ओहोळातील खेकड्यांना मोठी मागणी आहे; मात्र गोड्या पाण्यातील मासे खाणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. समुद्राइतकेच गोड्या पाण्यातील मासे चविष्ट आहेत. हे मासे खाण्याची फारशी सवय येथील लोकांना नाही. त्याच्या पाककृती कशा बनवायच्या, हेही येथील हॉटेल व्यावसायिकांना माहीत नाही. त्‍यामुळे सध्या सिंधुदुर्गात उत्‍पादित होणारी गोड्या पाण्यातील मासळी प्रामु्ख्याने मुंबई आणि पश्‍चिम महाराष्‍ट्रात पाठविली जाते. जर सिंधुदुर्गातही गोड्या पाण्यातील मासळीची मागणी वाढली, तर स्थानिकांनाही शेततळी, भात खाचरे यामध्ये मत्स्यपालन करून अर्थार्जनाची संधी सहज उपलब्‍ध होणार आहे.
.......................
वालावलमध्येही यशस्वी प्रयोग
वालावलच्या दयानंद चौधरी यांनी वालावल येथील तलाव वार्षिक साडेचार हजार रुपये भाडेतत्‍वावर घेऊन दीड हेक्‍टर क्षेत्रात मत्स्यशेतीचा प्रयोग केला. या तलावातून त्‍यांना वर्षाला उत्‍पादन खर्च वजा जाता पन्नास हजार रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. त्‍यांनी प्रामुख्याने रोहू, कटला, सायप्रस या जातीच्या माशांचे उत्‍पादन घेतले आहे. शेतीपूरक व्यवसायात येणाऱ्या गोड्या पाण्यातील मत्स्यपालन काहीसे जोखमीचे समजले जाते; मात्र योग्‍य नियोजन केल्‍यास गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीमधूनही उत्‍पन्न घेता येते, हे श्री. चौधरी यांनी दाखवून दिले असून त्‍यांची सर्व मासळी स्थानिक बाजारपेठेतच विक्री होत आहे.
.................
कोट
गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनासाठी मत्स्य महाविद्यालयाने तंत्रज्ञान विकसित केले आहे. मुळदे कृषी विद्यापीठाच्या संशोधन केंद्रात मत्स्यबीज उपलब्ध असून ते शेतकऱ्यांना दिले जाते. कांदळगावच्या कातळावरही शेततळीमधून यापूर्वी मत्स्यशेतीचा प्रयोग यशस्वी झाला होता. तर गोड्या पाण्यातील मत्स्योत्‍पादन वाढीसाठी पंतप्रधान मत्स्यसंपदा योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मत्स्य महाविद्यालय काम करत आहे. त्‍याचा फायदा घेऊन इथले तरुण मत्स्यशेतीकडे वळल्यास जिल्ह्यात नीलक्रांती होईल.
- डॉ. नितीन सावंत, वरिष्ठ शास्त्रज्ञ, मासेमारी, फलोत्पादन महाविद्यालय, मुळदे,
................
कोट
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २० हजार कोटीची प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू केली. त्यामुळे खारे, निमखारे, गोड्या पाण्यातील मत्स्योत्‍पादनातून रोजगार संधी निर्माण होणार आहेत. या योजनेसाठी सिंधुदुर्गातून गतवर्षी ५० प्रस्ताव आले होते; मात्र प्रस्ताव मंजुरीसाठी वर्षभरात कमिटीची बैठकच झाली नाही. आता राज्‍यात भाजप - शिंदे गटाचे सरकार असल्‍याने या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्‍न असतील. गतवर्षी सावंतवाडीत मत्स्य महोत्‍सव झाला, तसाच इतर तालुक्‍यातही होण्यासाठी प्रयत्‍न करू.
- अतुल काळसेकर, कोकण संयोजक, आत्‍मनिर्भर भारत अभियान
---
तलावांमधील मत्स्योत्‍पादन
- वसोलीत मत्स्योत्‍पादनानंतर मत्स्यबीज निर्मितीही
- वीस शेततळ्यांमध्ये मत्स्यबीजाची निर्मिती
- वसोलीत सुमारे २५ लाखाचा खर्च
- डिसेंबर अखेर ५० लाखाचे उत्पन्न अपेक्षित
- कोल्‍हापूर, मुंबई, कराडच्या हॉटेलला पुरवठा
- जिल्ह्यात ९ तलावांमध्ये रोहू, कटला, सायप्रस जातीचे मासे
------
भाडेतत्वावर तलाव
पावशी, माडखोल, आकेरी, आडेली, हातेरी, धामापूर, निळेली, कारीवडे आणि ओटव हे नऊ तलाव पाटबंधारे विभागाकडून भाडेतत्‍वावर घेतले आहेत. या ठिकाणी मत्स्योत्‍पादन सुरू केले आहे. नांदगावात येथील एका मत्स्योत्‍पादन संस्थेबरोबर करार करून त्या भागातील जलाशयांमध्येही मत्स्योत्‍पादन केले जाणार आहे, असे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y88924 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..