जिल्ह्यात मुलींचे जन्मप्रमाण समाधानकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात मुलींचे जन्मप्रमाण समाधानकारक
जिल्ह्यात मुलींचे जन्मप्रमाण समाधानकारक

जिल्ह्यात मुलींचे जन्मप्रमाण समाधानकारक

sakal_logo
By

जिल्ह्यात मुलींचे जन्मप्रमाण समाधानकारक
डॉ. महेश खलिपेः कठोर अंमलबजावणीसह विविध उपक्रमांचे फलित
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २३ः जिल्ह्यात मुलामुलींचे जन्मप्रमाण समतोल राखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजना, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेला कठोर कायद्याची अंमलबजावणी तसेच, प्रचार, प्रबोधनासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे फलित जिल्ह्यात दिसू लागले आहे. त्यामुळे मुलींचे जन्म प्रमाण वाढत असून ही बाब समाधानकारक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते जुलै २०२२ या सात महिन्यांत जन्मलेल्या एकूण ३३६२ नवजात बालकांमध्ये १७०३ मुलगे व १६५९ मुली जन्मल्या आहेत. मुलांपेक्षा ४४ मुली कमी जन्मल्या आहेत. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत एकूण ७२५५, तर जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षात ६२८० एवढ्या नवजात बालकांचा जन्म झाला. ९७५ बालके कमी जन्मली आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा जन्मदर घटल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या गतवर्षामध्ये ६ हजार २८० बालकांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये ३ हजार २१६ मुलगे, तर ३ हजार ६४ मुलींचा समावेश आहे. या वर्षभरामध्ये जन्मलेल्या बालकांमध्ये मुलगे व मुलींच्या जन्माचे प्रमाण पाहता मुलांच्या जन्मापेक्षा १५२ एवढ्या मुली कमी जन्मल्या आहेत. २०२० मध्ये ३७९२ मुलगे व ३४६४ मुलींचा जन्म झाला होता. तर २०२१ मध्ये ३२१६ मुलगे व ३०६४ मुली जन्मल्या आहेत. २०२० या वर्षीच्या तुलनेत ९७५ एवढी बालके कमी जन्मली असून मुलांपेक्षा केवळ १५२ एवढ्याच मुली कमी जन्मल्याचे दिसून येत आहे. २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये मुलींच्या जन्मप्रमाणात वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलै २०२२ या सात महिन्यांत १७०३ मुलगे व १६५९ मुली अशा एकूण ३३६२ नवजात बालकांचा जन्म झाला आहे. यामध्ये मुलांपेक्षा ४४ मुली कमी जन्मल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छता, शिक्षण यासारख्या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. जिल्ह्यात विविध उपाय योजना केल्या जात असल्या तरी मुलींचे जन्मप्रमाण मुलांपेक्षा कमीच राहिले आहे. गेल्या सात महिन्यांचा जन्म अहवाल पाहता मुला-मुलींच्या जन्म प्रमाण समाधानकारक राहिले असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात मुलींच्या जन्माबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासन व जनतेकडूनही मुला-मुलींचे स्वागत होऊ लागले आहे. विविध उपाययोजना, शासकीय योजनेचा लाभ मुलींच्या जन्मानंतर दिले जात आहेत. तरी मुलींच्या जन्माचे प्रमाण मुलांच्या जन्मप्रमाणाशी बरोबरी करू शकलेले नाही. जिल्ह्यातील मुलींचे जन्मप्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक राहिले आहे.
............
चौकट
सात महिन्यांतील जन्म प्रमाण
जिल्ह्यात जानेवारी ते जुलै २०२२ या सात महिन्यांमध्ये जन्मलेल्या एकूण ३३६२ बालकांमध्ये जानेवारी २४१ मुलगे, २७५ मुली, फेब्रुवारी २२६ मुलगे, २२२ मुली, मार्च २५९ मुलगे, २८१ मुली, एप्रिल २४९ मुलगे व २४१ मुली, मे २५८ मुलगे व २१२ मुली, जून २४० मुलगे व २१५ मुली, तर जुलैमध्ये २२९ मुलगे व २१३ मुली अशाप्रकारे गेल्या सात महिन्यात १७०३ मुलगे व १६५९ मुली अशा एकूण ३३६२ नवजात बालकांचा जन्म झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89701 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..