सामंतांनी आम्हाला आव्हान देऊ नये; विनायक राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinayak Raut Uday samant politics ratnagiri
रत्नागिरी-सामंतांनी आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये

सामंतांनी आम्हाला आव्हान देऊ नये; विनायक राऊत

रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये, तुमचे आवाहन स्वीकारायला केव्हाही तयार आहोत. ते राष्ट्रीवादी काँग्रेसमध्ये असतानाही शिवसेनेने लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळवला होता. तेव्हा ते नीलेश राणेंचे सारथ्य करत होते, अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मंत्री सामंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवात मंत्री सामंत यांनी २०२४ मध्ये सर्वांना उत्तर देईन, असे जाहीर करत ठाकरे सेनेला आव्हान दिले होते. त्यांच्या वक्तव्यावर रत्नागिरीत आलेल्या खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, ‘‘आव्हान स्वीकारायला आम्ही केव्हाही तयार आहोत.

सामंत राष्ट्रवादीत असताना लोकसभेची निवडणूक जिंकली. त्यांनी आम्हाला आव्हान देऊ नये. आमचा विश्वास जनतेवर आणि आमच्या पदाधिकाऱ्यांवर आहे. भूलथापा मारून, आमिष दाखवून शिवसेनेत या अशी वेळ आमच्या पदाधिकाऱ्यांवर आलेली नाही, ती सामंतांवर आली आहे. पक्षाने राज्याची जबाबदारी मला दिली आहे. त्यामुळे मतदारसंघात कमी वेळ द्यावा लागत आहे. तरीही आमचे पदाधिकारी चांगले काम करत आहेत, लोकांच्या संपर्कात आहेत.
न्यायालयीन प्रक्रियेबाबत खासदार राऊत म्हणाले, ‘‘शिवसेनेची घटना मजबूत आहे. त्यामुळे हा पक्ष आमचाच, असे म्हणणे मांडायला आम्हाला कुणाची गरज भासणार नाही. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी घटनेनुसार आहे. सक्रिय सदस्यांची संख्या भक्कम आहे. ४० आमदार १२ खासदार गेले म्हणून मूळ ढाच्याला धक्का लागलेला नाही. लाखोंच्या संख्येने शिवसेनेच्या लोकांनी प्रतिज्ञापत्र करून दिली आहेत. महाराष्ट्रचे नव्हे तर अन्य राज्यांतील शिवसैनिकांनीही प्रतिज्ञापत्र लिहून दिली आहेत. ही वस्तुस्थिती पाहिल्यानंतर आम्हाला नक्कीच न्यायदेवतेकडून न्याय मिळेल.’’

शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदार भावना गवळी यांच्यावर सडकून टीका करताना ते म्हणाले, ‘‘ईडीच्या छापेमारीत ज्यांच्याकडून घबाड मिळाले, जी महिला आरोपी ईडीच्या तुरुंगात जाणार होती, त्याच महिला आरोपीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधून घ्यावी लागते. १३० कोटी जनतेच्या या भारत देशात ईडीच्या आरोपीकडून देशाच्या पंतप्रधान यांना राखी बांधून घ्यावी लागते, यासारखा दुसरा विनोद नाही.’’

रिफायनरी रेटून नेऊ नका : राऊत

रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. सरकारला हा प्रकल्प राबवायचा असेल तर पोलिसी बळाचा वापर करून नको. दडपशाहीने, गोरगरिबांच्या घरावर नांगर फिरवून हा प्रकल्प राबविता येणार नाही. तसे केले तर निरपराध लोकांबरोबर आम्ही खंबीरपणे उभे राहू. सरकारने लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावे. तुमचा प्रकल्प चांगला असेल तर तो लोकांना समजावून सांगा. समाधान झाले तरच पुढे जा. ज्या पद्धतीने पोलिसी बळाचा वापर करून रिफायनरी रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यावर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. लोकांना तडीपार करून, ३०७ चे गुन्हे दाखल करून आणि महिलांवर गुन्हे दाखल करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89750 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..