जायफळ लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जायफळ लागवड
जायफळ लागवड

जायफळ लागवड

sakal_logo
By

45261
डॉ. विलास सावंत

जायफळ लागवड

जायफळ हे एक उंच वाढणारे मसाल्याचे सदापर्णी झाड आहे. ईस्ट इंडिया कंपनीने हे झाड भारतात आणले. जायफळाची लागवड प्रामुख्याने केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील कोकण विभागात आहे. जायफळामध्ये नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. जायफळ बागेमध्ये सुमारे ५ टक्के मादी झाडे, ४५ टक्के नर झाडे व ५ टक्के संयुक्त फुले असणारी झाडे निघतात. जायफळाची फळे चिकूच्या आकाराची, पण गुळगुळीत व पिवळसर असतात. फळांच्या टरफलाचा उपयोग मुरांबा, कॅन्डी, लोणचे, चटणी आदी टिकाऊ पदार्थ तयार करण्यासाठी होतो. जायफळाच्या तेलाचा उपयोग मिठाई स्वादिष्ट करण्यासाठी तसेच जायपत्रीचा उपयोग मसाल्यात केला जातो. जायफळातील तेलाचा उपयोग औषध, साबण, टूथपेस्ट, चॉकलेट आदींसाठी होतो.
- डॉ. विलास सावंत, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस.
.....................
जायफळ हे उष्णकटिबंधीय पीक आहे. समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचीपर्यंत चांगले वाढते. १५०० ते ३००० मी.मी.पर्यंत पावसाची गरज असते. या पिकास वर्षभर ७० ते ९५ टक्के आर्द्रता आवश्यक असते. या पिकास जास्त तापमान मानवत नाही. पिकास सावलीची आवश्यकता असते. त्यामुळे हे पीक नारळ, सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून घेतले जाते. किनारपट्टीतील उत्तम निचरा होणाऱ्या गाळाच्या तसेच जांभ्या दगडापासून तयार झालेल्या लाल जमिनीमध्ये जायफळाची लागवड होऊ शकते. पोयट्याची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन याला चांगली मानवते. जायफळ हे एक परपरागसिंचित झाड असल्यामुळे त्याच्या झाडांमध्ये विविधता आढळून येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने निवड पद्धतीने जायफळाची ‘कोकण सुगंधा’ ही जात प्रसारित केली आहे. या जातीच्या पूर्ण वाढलेल्या झाडापासून वर्षाला सरासरी ५०० फळे मिळतात. या जातीमध्ये नर व मादी फुले एकाच झाडावर येतात. तसेच विद्यापीठाने ‘कोकण स्वाद’ ही एक दुसरी जात प्रसारित केली आहे. या जातीपासून सरासरी वर्षाला ७५० पर्यंत फळे मिळतात. जायफळाच्या झाडाला सावलीची आवश्यकता असल्याने या झाडाची लागवड विशेष करून नारळ सुपारीच्या बागेत ६ ते ८ मीटर अंतरावर करतात. लागवडीसाठी ९० सेंटीमीटर लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे खोदावेत. हे खड्डे चांगली माती व प्रत्येक खड्ड्यात ५० किलोग्रॅम शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून भरून घ्यावेत. जायफळांची अभिवृद्धी बियांपासून तसेच कलमे करून करता येते. जायफळ रोपांमध्ये आढळून येणारी विविधता उत्पादन सुरू व्हायला लागणारा जास्त कालावधी आणि वेगवेगळी नर व मादी झाडे यामुळे जायफळाची लागवड कलमाद्वारे करणे फायदेशीर ठरते. कलमाच्या पद्धतीमध्ये भेट कलम, मृदकाष्ठ कलम, बगल कलम आणि अंकूर कलम या पद्धतींचा वापर करून तयार केलेली कलमे लागवडीसाठी वापरता येतात. कलमे लावून लागवड केल्यामुळे मादी व नर झाडांचे आवश्यक प्रमाण १०:१ राखता येते. तिसऱ्या ते चौथ्या वर्षापासून उत्पादन मिळते व आपल्याला पाहिजे त्या गुणधर्माचे झाड निर्माण करता येते. लागवड जून महिन्यात करावी. लागवडीसाठी १ ते २ वर्षांची कलमे निवडावीत. जमिनीच्या मगदुरानुसार हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ३ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे. जायफळ झाडास पहिल्या वर्षी १० किलोग्रॅम शेणखत-कंपोस्ट ५० ग्रॅम नत्र, २५ ग्रॅम स्फुरद आणि १०० ग्रॅम पालाश ही खते द्यावीत. ही खतांची मात्रा दरवर्षी वाढवावी. दहा वर्षांनंतर प्रत्येक झाडास ५० किलोग्रॅम शेणखत, २ किलो युरिया आणि १.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट व पालाश २ किलोग्रॅम द्यावे. सेंद्रिय खाते एकाचवेळी द्यावीत, तर रासायनिक खते दोन समान हप्त्यात ऑगस्ट आणि जानेवारी, फेब्रुवारीमध्ये द्यावीत. जायफळाच्या रोपांपासून उत्पादन मिळण्यास ७ ते ८ वर्षांचा कालावधी लागतो. तर कलमापासून उत्पादन चौथ्या वर्षापासून सुरू होते. जायफळाच्या फलधारणेपासून काढणीपर्यंत ८ ते १० महिलांचा कालावधी लागतो. जायफळाला वर्षभर फुले येतात. जुलै, ऑगस्ट आणि फेब्रुवारी, मार्च या कालावधीत फळांची जास्त काढणी केली जाते. पूर्ण पक्व झालेल्या फळांचा रंग पिवळा असतो. तसेच टरफलाच्या देठाच्या विरुद्ध बाजूस तडा जातो. तयार फळे झाडावरून काढावीत किंवा जमिनीवर पडल्यानंतर गोळा करावीत. टरफले वेगळी करून जायपत्री १५ दिवसांत वाळतात. दहा वर्षांच्या झाडापासून दरवर्षी ५०० ते ८०० फळे मिळतात. ६० ते ७० वर्षांपर्यंत झाडांचे किफायतशीर उत्पादन मिळते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89886 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..