आता घरबसल्या ‘भूमी अभिलेख’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

computerized land records
आता घरबसल्या ‘भूमी अभिलेख’

आता घरबसल्या ‘भूमी अभिलेख’

ओरोस : जिल्ह्यात भूमी आणि अधिकार अभिलेखाच्या संगणीकृत नकला लवकरच नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. केवळ मालवण तालुका वळगता इतरत्र स्कॅनिंगचे काम पूर्ण होत आले आहे. एक कोटी १४ लाख एवढ्या भूमी आणि अधिकार अभिलेख पानांचे स्कॅनिंग पूर्ण झाले आहे. त्यामुळे सातबारा, फेरफार आणि मिळकत पत्रिका पाठोपाठ आता भूमी आणि अधिकार अभिलेखाच्या नकलाही ऑनलाईन प्राप्त होणार आहेत. डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम सध्या पूर्ण राज्यात राबविला जात आहे. याद्वारे आधुनिक अभिलेख कक्ष स्थापन करण्यात येत आहे. जमिनीच्या अधिकार अभिलेखाशी निगडित अभिलेख हे तालुकास्तरावरील तहसीलदार व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या अभिलेख कक्षामध्ये जतन व संधारन केलेले आहेत. शहरी भागातील नगर भूमापन झालेले अभिलेख यासाठी स्वतंत्र नगर भूमापन अधिकारी कार्यालये निर्माण केलेली आहेत. अशाप्रकारे सध्या भूमी आणि अधिकार अभिलेख जतन केले आहेत.

नागरिकांना जमिनीचे अभिलेख हे खरेदी विक्री व्यवहार, कर्ज घेणे, नवीन बांधकाम करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, न्यायालयीन प्रक्रिया आदी कारणांसाठी वारंवार आवश्यक असतात. त्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नक्कलांची मागणी होत असते; परंतु, वेळेवर नकला पुरविण्यात विलंब होत असतो. नकला वेळेवर न मिळाल्याने वेळ वाया जावून प्रसंगी नुकसानीस देखील सामोरे जावे लागते. विविध शासकीय योजना राबविताना अनेक शासकीय कार्यालयांना जमिनीच्या अभिलेखांच्या नकला आवश्यक असतात. अशावेळी अभिलेखांच्या नकला पुरविण्यास विलंब झाल्यास पर्यायाने शासकीय योजना राबविण्यास विलंब होतो. त्यामुळे शासनाचे देखील मोठे आर्थिक नुकसान होत असते. नागरिकांना व शासनाच्या अन्य विभागांना जमीन विषयीचे अभिलेख मागणीप्रमाणे तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील सर्व तहसीलदार, उपअधीक्षक भूमी अभिलेख व नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील अभिलेख कक्षाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे.

त्यानुसार राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण अंतर्गत केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालय भूमी संसाधन विभागाच्या निर्देशानुसार जुन्या अधिकार अभिलेखाशी निगडित भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग करणे, अभिलेख कक्षामध्ये आवश्यकतेनुसार भौतिक सुधारणा करून अभिलेख कक्षातील सर्व अभिलेख संगणकामध्ये जतन करणे, हे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यावर स्कॅन केलेल्या अभिलेखांच्या डेटामधून नागरिकांना व शासनाच्या अन्य विभागांना अभिलेख तत्परतेने उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

हत्ती गेला आणि शेपूट राहिले
भूमी अभिलेख आधुनिकीकरण अंतर्गत पूर्ण जिल्ह्यात भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग करणे, इमेज प्रोसेसिंग करणे, व्हेंडर क्युसी, डिपार्टमेंट क्युसी, मेटा डेटा, व्हेंडर मेटा डेटा, डिपार्टमेंट मेटा डेटा क्युसी आदी कार्यवाही करून भूमी आणि अधिकार अभिलेखांचे जतन आणि संधारण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तहसील कार्यालये व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून ही कार्यवाही सुरू आहे. यातील मालवण तहसीलदार कार्यालय वगळता उर्वरित सर्व कार्यालयांनी कार्यवाही पूर्ण केली आहे. एक कोटी १४ लाख पानांचे स्कॅनिंग करून पुढील कार्यवाही केली आहे. केवळ मालवण तहसील कार्यालयाचे काम शिल्लक आहे. त्यामुळे ‘हत्ती गेला आणि शेपूट राहिले’, अशी स्थिती आहे. मालवण तहसील कार्यालयाने ही कार्यवाही पूर्ण केली की भूमी आणि अधिकार अभिलेखांच्या नकला नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या मिळविता येणार आहेत.

सर्व अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत
आजमितीस अभिलेख स्कॅन स्वरूपात महाभूमी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ते सर्व अभिलेख डिजिटल स्वाक्षरीत करण्यात येणार आहेत. त्याचे आवश्यक प्रशिक्षण तहसीलदार व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे. डिजिटल स्वाक्षरीत अभिलेख नागरिकांना घरबसल्या डाउनलोड करता येतील; मात्र, त्यासाठी विहित शुल्क ऑनलाईन भरावे लागणार आहे. ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. विजय वीर यांनी दिली.

आधुनिक भूमी अभिलेख कक्ष स्थापन करण्यासाठी भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग करून ते डिजिटल स्वरूपात जतन करण्यात येत आहेत. डिजिटल स्वरूपात जतन केलेले अभिलेख ‘डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम’ या संगणकीय आज्ञावलीद्वारे नागरिकांना व प्रशासनास तत्काळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. स्कॅन केलेल्या अभिलेखाचा डाटा स्टेट डाटा सेंटरवर ठेवून तो नागरिकांना भूमी अभिलेखच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
- डॉ. विजय वीर, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89889 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SindhudurgKokanLands