बायपासच्या सेवारस्त्यांची दैना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बायपासच्या सेवारस्त्यांची दैना
बायपासच्या सेवारस्त्यांची दैना

बायपासच्या सेवारस्त्यांची दैना

sakal_logo
By

45254
मळगाव ः येथे महामार्गाच्या सेवारस्त्याची झालेली दुरवस्था.

बायपासच्या सेवारस्त्यांची दैना

खड्ड्यांमुळे चाळण, प्राधिकरणच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ ः मुंबई-गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासलगत असलेल्या सेवारस्त्यांची सद्यस्थितीत चाळण झाली आहे. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. परिसरातील मळगावसह वेत्ये, नेमळे येथील सेवारस्त्यांची सारखीच अवस्था आहे. गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे हे खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करण्याबाबत प्राधिकरणचे वारंवार लक्ष वेधूनही याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
झाराप पत्रादेवी बायपासच्या लगत असलेल्या सेवारस्त्यांची खोदाई करून गॅस पाईपलाईन टाकण्यात आली. त्यासाठी आवश्यक करोडो रुपयांचे डिपॉझिट संबंधित कंपनीने महामार्ग प्राधिकरणकडे जमाही केले; मात्र पावसाळ्यानंतर या रस्त्यांचे नूतनीकरण होणार असल्याची माहिती प्राधिकरणचे अधिकारी देत आहेत. तरीही सद्यस्थितीत गणेशोत्सव तोंडावर आला असल्याने सेवारस्त्यांवर पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. सेवारस्त्यांवर जेसीबीच्या साहाय्याने मोठे चर खणून त्यात गॅसची पाईपलाईन टाकण्यात आली. हे काम सुरू असताना वापरलेले जेसीबी, पोकलँड तसेच क्रेनसारख्या मशिनरीमुळे या रस्त्यांची हानी झाली. सद्यस्थितीत पावसामुळे या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येते. मध्यंतरी दगड व ग्रीट पावडर टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम करण्यात आले होते; मात्र पाऊस आणि सततच्या वाहतुकीमुळे ही ग्रीट व दगड उखडले असून अक्षरशः तब्बल फूट खोल आणि लांबलचक असे खड्डे पडले आहेत.
पाऊस सुरू असताना या खड्ड्यांत पाणी साचून त्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहनधारकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असून अनेक भक्तगणांना वाहनांमधून आपले गणपती घरी आणायचे आहेत. अशावेळी या खड्ड्यांमधून गाडी नेल्यामुळे गणेशमूर्तींना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या रस्त्यांची डागडुजी त्वरित करण्यात यावी; अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
याबाबत महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता तसेच अन्य अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी संपर्क साधल्यास केवळ आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झाले नसल्याने स्थानिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनींच्या मागणीकडेही दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे.
.................
चौकट
...अन्यथा आंदोलन
गॅस पाईपलाईनच्या कामामुळे बायपासलगत असलेल्या सेवारस्त्यावर पडलेले खड्डे महामार्ग प्राधिकरणने ताबडतोब बुजवावेत, अशी मागणी वारंवार महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे; मात्र अजूनही याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. दोन दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांसोबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी दिला आहे.
................
कोट
मळगाव बॉक्सवेल जवळ रस्त्याच्या बाजूपट्टीने गॅस पाईपलाईनसाठी खोदाई केल्याने त्याठिकाणी चर पडले असून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी हे चर बुजवण्याची मागणी केली आहे. याबाबत महामार्ग प्राधिकरणचे अभियंत्यांचे लक्षही वेधले असून दोन दिवसांत हे चर बुजवण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
- हरी वारंग, सरपंच, निरवडे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90011 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..