सावंतवाडीतील वॉटर एटीएम अडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीतील वॉटर एटीएम अडकले
सावंतवाडीतील वॉटर एटीएम अडकले

सावंतवाडीतील वॉटर एटीएम अडकले

sakal_logo
By

swt२२१.jpg
४५४३१
सावंतवाडीः शहरात असणारे वॉटर एटीएम भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बंद स्थितीत आहे.

सावंतवाडीतील वॉटर एटीएम जैसे थे
दीड वर्षे प्रतिक्षाः भ्रष्ट्राचाराचा आरोप झाल्याने योजना रखडली
रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः शहरात प्रस्तावित २९ लाख अंदाजित खर्चाची वॉटर एटीएम योजना गेली दिड वर्षे भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकली आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागण्यात आली असल्याने उभारलेले तिन्ही वॉटर एटीएम जैसे थे स्थितीत आहेत. प्रशासनाने यातील सत्यता समोर आणून ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सावंतवाडी पालिकेत सत्ता बदल झाल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून संजू परब यांनी काही विकास कामे केली. वॉटर एटीएम ही सुविधाही त्यापैकी एक होती. तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजनमधून यासाठी निधी मंजूर करून दिला होता. मात्र, त्यावेळचे विरोधक असलेल्या पालिकेच्या गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी या वॉटर एटीएम सुविधेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी यांच्याकडे ३०८ खाली दावा दाखल केला होता. त्यामुळे वॉटर एटीएम उभारुन सुद्धा ती कार्यान्वित न होता जैसे थे परिस्थितीत गेली दिड वर्ष पडून आहेत. शहरातील नागरिकांना शुद्ध आणि थंडगार पाणी देण्यासाठी ही सुविधा उभारण्यात आली होती. तत्कालीन नगराध्यक्ष परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले होते. ज्याप्रमाणे एटीएममध्ये कार्ड टाकल्यावर पैसे येतात, त्याचप्रमाणे वॉटर एटीएममध्ये पैसे टाकल्यावर थंडगार आणि शुद्ध पाणी मिळणार होते. याचा फायदा शहरातील नागरिकांसह पर्यटकांनाही होणार होता. तत्कालीन नगराध्यक्ष परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कौन्सिलमध्ये विरोधी गटाच्या गटनेत्या लोबो यांनीही यासाठी सहमती दर्शवली होती. परंतु, प्रत्यक्षात ज्यावेळी हे एटीएम उभारण्यात आले, त्यावेळी दाखवण्यात आलेले इन्टुमेंट आणि प्रत्यक्षात उभारण्यात आलेले एटीएम यामध्ये तफावत दिसल्याने लोबो यांनी याबाबत आवाज उठवित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला होता. उभारण्यात आलेले एटीएम हे प्रत्येकी तीन लाख रुपये खर्चाचे असताना त्यावर नऊ लाख रुपये खर्च दाखविण्यात आल्याने याबाबतचे बिल संबधित ठेकेदाराला अदा करु नये, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रक्रियेत आजही ही तीन्ही एटीएम जैसे थे स्थितीत उभी आहेत.
------------
चौकट
आरोप-प्रत्यारोपांचे सत्र
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपही रंगले होते. हिंमत असेल तर भ्रष्टाचार उघड करून दाखवाच असे आव्हान सत्ताधाऱ्यांकडूनही देण्यात आले होते विद्यमान शालेय मंत्री दीपक केसरकर यांनीही या प्रकरणात लक्ष घालून सत्ताधाऱ्यावर आसूड ओढले होते. एकूणच हे प्रकरण चांगलेच तापले होते.
-------------
कोट
शहरात उभारलेल्या एटीएम पाहत त्याचा खर्च नऊ लाख रुपये नसणार हे कोणीही सांगू शकतो. फारफार एका एटीएमचा खर्च तीन लाख असू शकतो; पण नऊ लाख हा आकडा खुप मोठा असल्याने त्यात भ्रष्टाचार झाल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणूनच याबाबत आवाज उठविला. आता जोपर्यत नवी कौन्सिल बसत नाही, तोपर्यत यावर निर्णय घेणे अशक्य आहे.
- अनारोजीन लोबो, माजी नगरसेविका
-----------
कोट
शहरात उभारण्यात आलेल्या वॉटर एटीएमबाबत कोकण आयुक्त पातळीवर चौकशी सुरु आहे. जोपर्यत ही चौकशी पुर्ण होत नाही, तोपर्यंत काही सांगता येत नाही.
- जयंत जावडेकर, मुख्याधिकारी, सावंतवाडी पालिका
-----------
कोट
वॉटर एटीएम संदर्भात त्रिसदस्यीय समितीद्वारे सर्व चौकशी पूर्ण झाली आहे. केवळ मुख्याधिकाऱ्यांमुळेच ही योजना सुरु होऊ शकत नाही. एटीएमसाठी ठरलेले नऊ लाख हे मूल्यांकन जिल्हापातळीवरूनच झाले होते. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्न नव्हता. आता लवकरात लवकर ही योजना सुरु व्हावी.
- संजू परब, माजी नगराध्यक्ष
.....................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90196 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..