पत्नीसह प्रियकर दोषी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीसह प्रियकर दोषी
पत्नीसह प्रियकर दोषी

पत्नीसह प्रियकर दोषी

sakal_logo
By

45633
सिंधुदुर्गनगरी ः विजयकुमार गुरव खून प्रकरणी दोषी ठरविल्यानंतर त्यांची पत्नी जयलक्ष्मी यांना घेऊन जाताना पोलिस.
45635
सिंधुदुर्गनगरी ः प्रमुख आरोपी सुरेश चोथे याला घेऊन जाताना पोलिस.

- लोगो
शिक्षक खून प्रकरण

पत्नीसह प्रियकर दोषी
---
जिल्हा न्यायालय आज शिक्षा सुनावणार

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २४ ः गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव यांचा खून करून मृतदेह आंबोली-कावळेसाद येथे टाकल्याप्रकरणी गुरव यांची पत्नी जयलक्ष्मी आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे याला आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी दोषी ठरविले. खून करणे, खुनाचा पुरावा नष्ट करणे व संगनमताने नियोजन करणे या गुन्ह्याखाली दोषी ठरविण्यात आले आहे. उद्या (ता. २६) शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. विशेष सरकारी वकील म्हणून अजित भणगे यांनी काम पाहिले.
आंबोली कावळेसाद येथील खोल दरीत ११ नोव्हेंबर २०१७ ला मृतदेह आढळला होता. गडहिंग्लजमधील गुरव बेपत्ता असल्याची तक्रार त्यांची पत्नी जयलक्ष्मी यांनी तेथील ठाण्यात दिल्याची माहिती पुढे आली. तेथील पोलिसांसह गुरव यांचा मुलगा आंबोलीत आले. त्याने मृतदेहाच्या हातातील दोऱ्‍यावरून ते वडील असल्याचे सांगितले. डोक्यावरून ओळख पटविणे शक्य नसल्याने डीएनए चाचणी करण्यात आली. सावंतवाडीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी तपासाची चक्रे गडहिंग्लज भडगावकडे फिरविली होती. हा प्रकार घडल्याच्या चौथ्या दिवसापासून प्रियकर सुरेश आप्पासो चोथे (३२) पसार होता. दोन दिवसांनी जयलक्ष्मी घरातून बेपत्ता झाली. पोलिस त्यांच्या मागावर होते. दोघांना लोअर परेल येथून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. दोघांना २८ नोव्हेंबर २०१७ ला अटक करण्यात आली होती.
प्रेम प्रकरणातून ६ नोव्हेंबर २०१७ ला रात्री जयलक्ष्मीने प्रियकर सुरेशला घरी बोलावून घेत विजयकुमार यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केला. सुरेशने मृतदेह वाहनातून कावळेसाद येथील दरीत टाकला. त्यांना मारण्यासाठी वापरलेल्या दोन उशा, रॉड व गाडी दरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, असा उलगडा दोघांच्या जबानीतून झाला.

बहिणींना आनंदाश्रू
न्यायालयाने दोघांनाही दोषी ठरविताच विजयकुमार यांच्या दोन बहिणी, भाची, भाचा यांना आनंदाश्रू अनावर झाले. त्यांनी निरीक्षक धनावडे यांच्याजवळ कृतज्ञता व्यक्त केली. न्यायालय, वकील व पोलिस यांचेही आभार मानले.

२९ जणांची साक्ष
या प्रकरणात २९ जणांची साक्ष नोंदविण्यात आली. सावंतवाडी येथील बाबल आल्मेडा यांनी कावळेसाद दरीतून उशा, गादी, रॉड बाहेर काढले होते. त्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

मुलांनी साक्ष फिरवली; पण...
विजयकुमार यांच्या मुलांनी आई जयलक्ष्मी यांना जामीन मंजूर करू नये, तिच्यापासून आमच्या जीविताला धोका असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले होते. मात्र, सुनावणी सुरू झाल्यावर साक्ष देताना मुलांनी साक्ष फिरवली होती. याच मुलांनी वडील विजयकुमार यांचा भविष्यनिर्वाह निधी घेतला होता. त्यामुळे न्यायालयाने वडील नाहीत तर हा निधी कसा घेतला, असा सवाल मुलांना केला होता.

अटक झाल्यापासून कोठडीत
अटकेपासून जयलक्ष्मी व सुरेश कोठडीत आहेत. दोघांचाही जामीन अर्ज न्यायालयाने वेळोवेळी फेटाळला होता. कोरोना कालावधीत २०२१ मध्ये जयलक्ष्मी यांना काही कालावधीसाठी सोडण्यात आले होते; परंतु पुन्हा त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले.

साक्षीदार फिरविण्यात आले, तरी तांत्रिक मुद्दे महत्त्वाचे ठरले. जयलक्ष्मी व सुरेश यांचे कॉल रेकॉर्ड, त्यांचे बेपत्ता होणे, पोलिस निरीक्षक सुनील धनावडे, कॉन्स्टेबल प्रमोद कामतेकर, बाबल आल्मेडा यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
- अजित भगणे, वकील

सुरुवातीला पुरावा सापडत नव्हता; परंतु आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. योग्य तपास केला आणि सत्याचा विजय झाला.
- सुनील धनावडे, तपासी पोलिस अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90431 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..