कोकणगांधी कर्मयोगी अप्पा पटवर्धन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणगांधी कर्मयोगी अप्पा पटवर्धन
कोकणगांधी कर्मयोगी अप्पा पटवर्धन

कोकणगांधी कर्मयोगी अप्पा पटवर्धन

sakal_logo
By

इये साहित्याचिये नगरी ---------लोगो

rat२६p१९.jpg
४५७०२
अप्पा पटवर्धन

rat२६p२०.jpg
४५७१२
प्रकाश देशपांडे

कोकणगांधी कर्मयोगी अप्पा पटवर्धन

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात अपरान्ताचे योगदान मोलाचे आहे. जहालांचे नेतृत्व करणारे लोकमान्य असोत वा मवाळ पक्षाचे नेतृत्व करणारे गोपाळ कृष्ण गोखले असोत. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत आणि लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंकर हेही कोकणचेच. याच नररत्नांमध्ये ज्यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा ते स्वच्छ भारत मिशनचे अग्रदुत कोकणगांधी अप्पा पटवर्धन यांचा सीताराम पुरुषोत्तम तथा अप्पा पटवर्थन यांचा जन्म ९ नोव्हेंबर १८९४ ला रत्नागिरीजवळ असलेले अगरगुळे गावात झाला.
महात्माजींच्या अगदी निकट असणारे अप्पासाहेब पटवर्धन. त्यांचे चरित्रकार त्यांचा ‘अप्पासाहेब‘ असाच उल्लेख करतात. कोकणवासियांना मात्र ते अप्पाच. घरातल्या वडीलधाऱ्यांना कुणी साहेब म्हणत नाहीत. बाबा, दादा, नाना असाच उल्लेख करतात. साऱ्या कोकणवासियांना अप्पा घरातल्या वडीलधाऱ्यांसारखेच वाटतात. त्यामुळे ते आपले केवळ अप्पाच.
कोकणात सर्वत्र असायची तशीच अप्पांच्या घरातही गरिबी पाचवीला पुजलेली. जात्याचं हुशार असलेले अप्पां शिष्यवृत्ती मिळवत शिकले. मॅट्रिकला मुंबर्इ राज्यात पाचवे आले. मुंबर्इच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून तत्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम वर्गात एमए झाले. पुण्याच्या तत्कालीन न्यू पूना कॉलेजमधे (आजचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय) प्राध्यापक म्हणून नोकरीला लागले.
१९१९ ला रौलट कायदा आला. या काळ्या कायद्याविरोधात जनता उठली. राष्ट्रप्रेमाने भारलेल्या अप्पांनी प्राध्यापकीचा त्याग करून महात्माजींच्या हाकेला ओ देऊन सत्याग्रहात सामील झाले. महात्माजींच्या व्यक्तिमत्वाने आणि कार्याने भारावलेले अप्पा महात्माजींना ’यंग इंडिया‘ चे उपसंपादक म्हणून आणि त्यांचा पत्रव्यवहार याला मदत करून लागले.
गांधीजींना ते मदतनीस म्हणून हवे होते; मात्र घरी आर्इ आहे तिची सेवा करायची आहे, असे सांगून अप्पा रत्नागिरीला परत आले. याच काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांनी रत्नागिरी येथे स्थानबद्ध केले होते. सावरकरांनी सामाजिक अस्पृश्यता संपावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अप्पांना जन्मदत्त अस्पृश्यतेचा तिटकारा होता. अप्पा सावरकरांच्या या कार्यात सहभागी झाले.
१९३० ला महात्माजींनी मिठाच्या सत्याग्रहाची हाक दिली. अप्पांनी रत्नागिरी जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले. गावोगावी सभा होऊन आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा येथे प्रचंड मोठ्या संस्थेने मिठाचा सत्याग्रह झाला. मिठाच्या सत्याग्रहाने अप्पांचे नाव सर्वत्र झाले. या सत्याग्रहात लहानथोर सामील झाले होते. अप्पांनी लिहिलेले ''देव दिधले आम्हा मीठ बंधूनो करा करा लूट'', ही कविता म्हणत गावोगावी सत्याग्रह झाले. सत्याग्रहाचे सेनापती असलेल्या अप्पांना अटक करण्यात आली. त्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्या वेळी तुरुंगात संडास स्वच्छ करण्याचे काम वंचित समाजातील कैद्यांना करावे लागे. अप्पांनी संडास साफ करण्याचे काम मागितले; मात्र तुरुंगाच्या कायद्यात सवर्णांना हे काम देता येत नसल्याने कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. या विरुद्ध अप्पांनी सत्याग्रह आणि उपोषण सुरू केले. अप्पांच्या या उपोषणाची वार्ता महात्माजींना समजली. महात्माजींनी तार करून अप्पांना या मागणीसाठी पाठिंबा दिलां इतकेच नव्हे तर अप्पांच्या समर्थनार्थ गांधीजींनीही शासनाला कळवून उपोषण सुरू केले. यामुळे अप्पांचे नाव भारतभर गाजले. इंग्रज शासनाने सश्रम कारावासाची शिक्षा देऊन रत्नागिरीला कारावासात टाकले. कारावासात त्यांना सेनापती बापट, साने गुरुजी यांचा सहवास लाभला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तत्कालीन महार समाजाने मेलेल्या गुरांची कातडी सोडवण्याचे काम बंद केले. मेलेल्या पशूंची कातडी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, या विचाराने अप्पांनी कातडी सोडवण्याचे काम सुरू केले. त्याना भंगीकाम करण्यासाठी अनेक सवर्णांनी सहकार्य केले तेच सहकार्य याही कामात सवर्णांनी केले. दापोलीचे बाबा फाटक मार्गताम्हाण्याचे डॉ. तात्या नातू अशांनी हा वसा पुढे चालवला. देवरूखचे रमाकांत आर्ते हे गोपुरीत राहून हे काम करत असत.
१९४२ ला पुन्हा महात्माजींनी चलेजावचा नार दिला. अप्पा सत्याग्रहात उतरले. त्यांना शिक्षा झाली. कारावासात होते तेव्हां आर्इ घरी अत्यंत आजारी झाली. अप्पांनी पॅरोल मिळावा म्हणून अर्ज केला. त्यांच्यासमवेत असणाऱ्यांना हे मान्य नव्हते; मात्र अप्पा ठाम होते. कारागृहातून बाहेर आले. तडक घरी जाऊन आर्इची सेवा करू लागले. आर्इला ते बाया म्हणत. आर्इने त्यांना एकदा सांगितले होते, ’तू मला स्मशानात पोचव आणि मग तुझी देशभक्ती चालव.‘ तेरा महिने त्यांनी आर्इची सेवा केली. १९४४ च्या जानेवारी महिन्यात आर्इ वारली. आर्इच्या निधनानंतर सहाव्या दिवशी अप्पा पुन्हा हिंडलग्याच्या कारागृहात उरलेली शिक्षा भोगायला हजर झाले. या वेळी महात्माजींच्या सेवेत सदैव असलेल्या महादेवभार्इ देसार्इ यांचे निधन झाले होते. अप्पांना इंग्रजी, हिंदी, गुजराथी भाषा येत. महात्माजींनी अप्पांना निजी सचिव म्हणून ये, असे सांगितले. अप्पांना अ. भा. प्रसिद्धी मिळाली असती; पण अप्पांना कोकणची साद मोठी वाटली. अप्पांनी नकार दिला आणि अप्पांची पावलं पुन्हा कोकणकडे वळली.
आज रत्नागिरी शहरात काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची इमारत आहे. ती सुद्धा अप्पांनी उभी केली आहे. यासाठी लागणारा निधी अप्पांच्या वयाला १९४६ ला पन्नास वर्षे झाली. या निमित्त सुवर्ण महोत्सव निधी जमा झाला. अप्पांनी तो काँग्रेस पक्षाला दिला त्यातून ही इमारत उभी राहिली. अप्पा आयुष्यभर काँग्रेस पक्षाचे राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात अप्पा महाराष्ट्र आणि गुजरात या संयुक्त प्रांताचे समर्थक होते. त्यामुळे आंदोलनाची झळ त्यांना सोसावी लागली. गोपुरी आश्रम जाळण्याचा प्रयत्न झाला. अप्पा तिथे नव्हते. परत आले. झालेला विद्ध्वंस पाहिला आणि त्या रात्री अप्पांनी आश्रमातल्या सर्वांना एकत्र केले. ‘योगी पावन मनाचा साही अपराध जनांचा’ या अभंगावर निरूपण केले.
अप्पांनी कणकवलीजवळ गोपुरी येथे अठरा एकरावर आश्रम सुरू केला. अप्पांनी गोपुरी संडास, चलनशुद्धी असे अनेक उपक्रम आयुष्यभर केले. ग्रंथरचना केली. त्यांचे आत्मचरित्र परंधाम प्रकाशनाने प्रसिद्ध केले. विविध विषयांवर २६ पुस्तके लिहिली. आयुष्यभर शोषणमुक्त समाजाचा ध्यास घेतला. अप्पांनी १० मार्च १९७१ ला अखेरचा श्‍वास घेतला.
नानासाहेब गोरे यांनी अप्पांचे वर्णन करताना म्हटले, ’अप्पांना राजकीय निष्ठा होती; पण राजकीय महत्वाकांक्षा नव्हती.‘ अप्पांच्या आत्मचरित्रावर दुर्गाबार्इ भागवतांनी १९७२ च्या मार्च महिन्यात प्रसिद्ध झालेल्या ललित मासिकांत ’अप्पा मी अप्पासाहेब मुद्दाम म्हणत नाही पटवर्धन ही माझ्या आयुष्यात मी बघितलेली सर्वात पारदर्शक सत्यमूर्ती आहे.'' पुढे म्हणतात, ’गांधींनी सेवेचे जे विशाल दालन खुले केले त्यात सहस्त्रधारांनी भर घालणारा आणि त्यातही दवांप्रमाणे शुद्ध दवाच्या धारांनी भर घालणारा कुणी खरा सत्याग्रही सेवक झाला असेल तर तो अप्पाचं. अप्पांच्या चरित्र्याला आणखी कुठले प्रशस्तीपत्र हवंय.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90552 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..