सिंधुदुर्गात सुगंधी भात लागवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात सुगंधी भात लागवड
सिंधुदुर्गात सुगंधी भात लागवड

सिंधुदुर्गात सुगंधी भात लागवड

sakal_logo
By

45718
रानबांबुळी ः येथे लागवड केलेले काळभात पिक.

45719
रानबांबुळी ः काळभात पिक दाखवताना शेतकरी कंपनीचे अध्यक्ष संतोष गावडे.


जिल्ह्यात सुगंधी भात लागवड

रानबांबुळीत प्रयोग; ‘अॅग्रीकार्ट’चा पुढाकार, काळभात, आंबेमोहोर, खडक्या बियाण्यांचा समावेश

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २५ ः जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातील पारंपरिक आणि पोषणमूल्य असलेल्या भातबियाण्यांचे संकलन आणि संवर्धन करणाऱ्या अॅग्रीकार्ट फार्मर कंपनीने आता पांरपरिक सुंगधी भातपीक लागवडीचा प्रयोग रानबांबुळी येथे केला आहे. यामध्ये ‘काळभात’, ‘आंबेमोहोर’ आणि ‘खडक्या’ या तीन बियाण्यांचा समावेश असून काळभात सध्या फुलोऱ्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील वर्षी सुंगधी बियाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
रानबांबुळी (ता.कुडाळ) येथील अॅग्रीकार्ट फार्मर कंपनी अनेक वर्षांपासून जिल्ह्यासह राज्यातील पोषणमूल्य असलेल्या पांरपरिक भात बियाण्यांचे संकलन, संवर्धन करण्याचे काम करीत आहे. आठ-दहा वर्षांत या कंपनीच्या माध्यमातून ४५ हून अधिक भातबियाणी संकलित करून त्याची विविध गावांमध्ये लागवड करून बीजनिर्मिती केली. अलीकडेच पारंपरिक भात बियाण्यांची सीडबँक निर्माण केली असून या बँकेच्या माध्यमातून यंदाच्या खरीप हंगामात १०० हुन अधिक शेतकऱ्यांनी २० हुन अधिक जातीच्या बियाण्यांची खरेदी केली आहे. यावर्षी पारंपरिक भातपीक लागवड क्षेत्रात सरासरी ५० ते ६० हेक्टरने वाढ झाली आहे.
या कंपनीने आता पारंपरिक परंतु तीन सुंगधी भातपिकाच्या लागवडीचा प्रयोग रानबांबुळीत केला आहे. यामध्ये अकोले (जि. नगर) येथील काळभात, जुन्नर (जि. पुणे) येथील आंबेमोहोर आणि खडक्या या तीन जातींचा समावेश आहे. या भात बियाण्यांची रोपवाटीका १ जूनला तयार केली असून २० जूनला भातरोप लागवड केली आहे. तीन पैकी काळभात पीकाला आता फुलोरा येत असून त्याचा सुंगध दरवळत आहे. या भाताचा टरफल काळ्या रंगाचा असून तांदूळ लहान आहे. उर्वरित दन्ही जातीच्या पिकांची वाढ जोमदार आहे. सुंगधी पिकाची ही लागवड यशस्वी झाल्यास भविष्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पांरपरिक बियाणे उपलब्ध करून देण्याचा ‘अॅग्रीकार्ट’चा मानस आहे. काही वर्षांत सुगंधी तांदुळाची मागणी बाजारपेठेत वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक तांदुळ उपलब्ध झाल्यास त्याला मोठी मागणी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
-------------
चौकट
जिल्ह्यात ‘कोथिंबीरी’ या भाताला सुगंध आहे. सध्या या पिकाचे उत्पादन हुमरमळा (ता.कुडाळ) येथील शेतकरी घेतात. ‘अॅग्रीकार्ट’च्या सीड बँकेतही हे बियाणे उपलब्ध आहे.
-----------
चौकट
हेतु सफलतेकडे
नामशेष होण्याच्या मार्गावरील पारंपरिक भातबियाण्यांचे संकलन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने अॅग्रीकार्टचे सचिन चोरगे, संतोष गावडे आणि शेतीचे अभ्यासक तथा समाजकल्याण सहआयुक्त प्रमोद जाधव हे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. खडतर स्थितीत त्यांनी ही बियाणे संकलित करून त्याचे यशस्वी प्रयोग केले. त्या बियाण्यांची सीडबँक तयार केली आहे. आता महत्वाच्या टप्प्यावर हे काम असून हेतू सफलतेकडे त्यांची वाटचाल सुरू आहे.
-----------
कोट
यावर्षी प्रथमच पारंपरिक सुगंधी भातपिकाची लागवड रानबांबुळी येथे केली आहे. पैकी एका जातीच्या भाताला फुलोरा आला आहे. महिन्याभरात अंदाज येईल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास पारंपरिक भातबियाणे संवर्धनालाही चालना मिळणार आहे.
- संतोष गावडे, अध्यक्ष, अॅग्रीकार्ट शेतकरी कंपनी, रानबांबुळी
--------------
कोट
वालय, घाटीपंकज, मोगरा, लाल वरगंळ, बेळा, सानेफळ आदी ४५ प्रकारच्या पारंपरिक बियाण्यांचे संवर्धन केले आहे. आता सुंगधी भातपिकाची लागवड केली आहे. हा प्रयोग प्रथमच केला असून यशस्वी झाल्यास बियाणे शेतकऱ्यांना देऊ.
- सचिन चोरगे, संचालक, अॅग्रीकार्ट कंपनी
-------------
पाँईटर्स
*४५ पारंपरिक भातबियाण्यांची सीड बँक
* काळभात हे वाण १०५ ते ११० दिवसांत तयार, पिकाचा दाणा बारीक असून सुंगधी, सध्या अकोले (जि.नगर) येथे उत्पादन
* आंबेमोहोर आणि खडक्या ही दन्ही सुंगधी भातबियाणी असून जुन्नर येथे उत्पादन, पिकाचा दाणा मध्यम, १३५ ते १४० दिवस कालावधी तर खडक्याचा दाणा लहान असून कालावधी १२५ ते १३० दिवस, कॅल्शियम, लोह आणि झिंकचे प्रमाण अधिक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90554 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..