मुंबई विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे

मुंबई विद्यापीठ जागतिक दर्जाचे व्हावे; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

कणकवली : देशात नावाजलेले मुंबई विद्यापीठ जगातील अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांमधील दर्जेदार विद्यापीठांप्रमाणे विश्वविद्यापीठ व्हावे, असा प्रयत्न आहे. राज्य आर्थिकदृष्ट्या पुढे आहेच, ते शैक्षणिकदृष्ट्या त्याहून पुढे जावे, देशात अग्रेसर राहावे, यासाठी कोकणातील सुंदर प्रदेशात मुंबई विद्यापीठाचे नवे उपकेंद्र सुरू करून या प्रदेशाचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयत्न झाला आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

तळेरे येथे मुंबई विद्यापीठ संचलित विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय मॉडेल महाविद्यालयाच्या आवारात मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या इमारतीचे उद्‍घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. या वेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, प्र. कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, दळवी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विनायक दळवी, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, प्रांत वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार आदी उपस्थित होते. जिल्ह्यात प्रथमच राज्यपाल कोश्यारी यांचे सकाळी आगमन झाले. चिपी विमानतळावर मंत्री केसरकर यांनी त्यांचे स्वागत केले. ते तेथून तळेरे येथे दाखल झाले.

या वेळी कोश्यारी म्हणाले, ‘‘कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचा वरदहस्त आहे. मी प्रथमच येथे आलो. इथल्या नैसर्गिक सुंदरतेने भारावून गेलो. ही सुंदरता शिक्षणक्षेत्रात अधिक सुंदर व्हावी. मुंबई विद्यापीठाचे हे मॉडेल महाविद्यालय आणि हा कॅम्पस अतिशय सुंदर आहे. विद्यापीठाचे येथे उपकेंद्र होण्यामागे सर्वांचे प्रयत्न आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दर्जेदार शिक्षण हेच स्वप्न आहे. ते स्वप्न पुढे नेण्याचे काम मुंबई विद्यापीठाने करावे. तसे नियोजन आम्ही केले आहे. अमेरिका, ब्रिटनसारख्या प्रगत विश्वविद्यालयांचे २० प्राध्यापक मुंबई विद्यापीठात येऊन शिक्षणाची देवाणघेवाण करतील. भावी पिढीला दर्जेदार शिक्षण याद्वारे मिळणार आहे.’’
राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. ते शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होऊन अग्रेसर व्हावे, अशी आपली भावना आहे. कोकणला अधिक सुंदरतम बनवा, असे आवाहन त्यांनी लोकप्रतिनिधींना केले. निवृत्तीनंतर कुलगुरू पेडणेकर यांनी आपल्या जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राकडे अधिक लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘उपकेंद्र माझ्या मतदारसंघात होणार होते; परंतु वाद नको म्हणून तळेरे निश्चित केले. वादात उपकेंद्र अडकून पडू नये, यासाठी नवा इतिहास घडविण्याचे काम आम्ही केले. राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे, यासाठी सागरी संशोधन उपकेंद्र वेंगुर्ले येथे सुरू होत आहे. लवकरच आंबोली येथे ५० एकर जागेत मुंबई विद्यापीठाचे दुसरे उपकेंद्र सुरू होईल. तेथे विद्यापीठाने कमी खर्चातील कॅटरिंग टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट असे अभ्यासक्रम सुरू करावेत. आर्टिफिशियल इंटेलिजेंस अभ्यासक्रमास प्राधान्य द्यावे. कॅनडामधील काही शिक्षण संस्था हा अभ्यासक्रम देण्यास उत्सुक आहेत. बदलत्या शैक्षणिक धोरणानंतर आठवीपुढील सर्व विद्यार्थीही विद्यापीठाशी जोडले जातील. यापुढे राज्याचे शिक्षण क्षेत्रावर खर्चाला प्राधान्य राहील, असा प्रयत्न करणार आहे.’’

श्री. राणे म्हणाले, ‘‘विद्यापीठाच्या पुढील वाटचालीत आणि नवे अभ्यासक्रम सुरू राहण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. आयोजकांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी पार पाडेन.’’ श्री. पेडणेकर म्हणाले, की आजचा दिवस मोलाचा आहे. राज्यपालांच्या पाठबळामुळे उपकेंद्र सुरू करू शकलो. अनेक अडचणी आल्या; पण प्रशासनाने सहकार्य केले. आंबोलीतही ५० एकर जागेत दुसरे उपकेंद्र होईल. त्याची पायाभरणी लवकरच केली जाईल. बदलत्या काळाची शिक्षण पद्धती स्वीकारण्याची तयारी विद्यापीठाने अशा विविध उपक्रमांतून ठेवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मुले शिक्षणासाठी इतर जिल्ह्यांत जात होती. मात्र, यापुढे या बाहेरील जिल्ह्यांतून मुले शिक्षणासाठी येथे येतील. या वेळी मुंबई विद्यापीठाचा माहितीपट सादर करण्यात आला. उपकेंद्राच्या जडणघडणीत काम करणाऱ्यांचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते झाला. दळवी महाविद्यालयाचे प्रा. सतीश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मुंबई विद्यापीठाचे प्र. कुलगुरू कुलकर्णी यांनी आभार मानले.

दळवींचे मनोगत सर्वांना भावले
महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष विनायक दळवी यांनी भाषणात संस्कृत आणि हिंदी कवितांचे वाचन केले. स्वरचित कविताही त्यांनी सादर करून सर्वांची मने जिंकली. शिक्षण क्षेत्राचा प्रवास आणि उपकेंद्र उभारण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले, त्यांचे आभारही त्यांनी या निमित्ताने मांडले. प्रशासकीय अधिकारी कशा पद्धतीने या जिल्ह्यात काम करतात, त्याची माहिती राज्यपाल कोश्यारी यांना दळवी यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात जिल्ह्यात सर्वाधिक उंच ध्वज फडकावण्याचा मान कणकवली तहसीलदारांनी मिळविल्याचे त्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y90912 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..