पाणी प्यायल्यानंतर झालो बेशुद्ध! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी प्यायल्यानंतर झालो बेशुद्ध!
पाणी प्यायल्यानंतर झालो बेशुद्ध!

पाणी प्यायल्यानंतर झालो बेशुद्ध!

sakal_logo
By

46028
राजेश सावंत
46029
लुटमार झालेली रिक्षा


पाणी प्यायल्यानंतर झालो बेशुद्ध!

रिक्षा चालकाचा जबाब; गुंगीच्या औषधाने प्रवाशाकडून लूटमार

ओरोस, ता. २७ ः एका धार्मिक स्थळी जाऊन आल्यानंतर तेथील प्रसाद म्हणून दिलेला पेढा खाऊन ‘त्या’ प्रवाशांजवळील पाणी प्यायल्यानंतर बेशुद्ध झालो. पुन्हा सुकळवाडच्या दिशेने निघालो असता भंगसाळ पुलापर्यंत रिक्षा घेऊन आल्याचे आठवते; मात्र त्यानंतर रिक्षा हुमरमळ्यात कशी आली? तेथून जिल्हा रुग्णालयात कोणी दाखल केले? याबाबत काहीच माहिती नाही, असा जबाब लूटमार झालेल्या तळगाव-काटापूरवाडी येथील राजेश गणपत सावंत (वय ५०) याने आज शुद्धीवर आल्यावर सिंधुदुर्गनगरी पोलिसांना दिला.
रिक्षा व्यावसायिकाला प्रवाशांनी गुंगीचे औषध देऊन त्याच्या जवळील सोन्याची चेन व रोख रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उशिरा घडली होती. यातील रिक्षा व्यावसायिक बेशुद्ध असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते; मात्र याबाबत पोलिसांत तक्रार दाखल नव्हती. तसेच तो बेशुद्ध असल्याने वस्तुस्थिती समजत नव्हती. आज सकाळी शुद्ध आल्यानंतर संबंधित रिक्षा चालकाचा सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जबाब घेतला.
जबाबात सावंत यांनी म्हटले आहे की, मी १५ दिवसांपूर्वी नवीन रिक्षा घेतली. सुकळवाड रिक्षा स्टँड येथे रिक्षा लावून व्यवसाय करतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे रिक्षा स्टँडवर उभी करून प्रवाशांची वाट पाहत होतो. यावेळी दीड वर्षांच्या लहान मुलाला घेऊन आलेल्या एका तरुण जोडप्याने एका धार्मिकस्थळी जायचे आहे, तेथे दर्शन घेऊन पुन्हा सुकळवाडला यायचे आहे, त्यामुळे भाडे किती होईल, असे विचारले. त्यांना ७०० रुपये भाडे होईल, असे सांगितले. व्यवहार ठरल्यावर त्या तिघांना घेऊन संबंधित ठिकाणी गेलो. जाण्यापूर्वी त्यांनी कुडाळ गवळदेव येथे रिक्षा थांबवून गोड खाऊ घेतले. धार्मिक स्थळी गेल्यानंतर त्या जोडप्याने दर्शन घेतले. तिथून परतताना त्यांनी प्रसाद म्हणून पेढा दिला. तो खाल्ल्यावर त्यांनी पाणीही दिले. पेढा आणि पाणी प्यायल्यावर वेगळेच वाटत होते. तशाच परिस्थितीत रिक्षा चालवत भंगसाळ नदीच्या पुलाजवळील महामार्गापर्यंत आल्याचे आठवते; मात्र त्यानंतर काय झाले माहित नाही. तेथून रिक्षा हुमरमळ्यात कशी आली? तेथून जिल्हा रुग्णालयात कोणी दाखल केले? याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही.
दरम्यान, सावंत हे बेशुद्धावस्थेत हुमरमळा येथे सापडले. ती हद्द सिंधुदुर्गनगरी पोलिसांच्या हद्दीत येते; परंतु कुडाळ पोलिसांच्या हद्दीत त्यांना पेढा व पाणी देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी सावंत यांचा जबाब घेऊन हा गुन्हा कुडाळ पोलिसांकडे वर्ग केला. पुढील तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.
..................
३४ ग्रॅम सोने, २३ हजार पळविले
गळ्यात एक बारा ग्रॅमची व दुसरी बावीस ग्रॅमची सोन्याची चेन होती. नवीन रिक्षा घेतल्याने त्याचा हप्ता भरण्यासाठी पँटच्या खिशात रोख २० हजार होते. तर शर्टच्या खिशात तीन हजार होते. हा सर्व मुद्देमाल गायब आहे. तसेच रिक्षाची चावीही गायब आहे, असे जबाबात म्हटले आहे.
..................
पोलिसांना आव्हान
रिक्षा चालक सावंत यांना रिक्षा चालवीत भंगसाळ नदीच्या पुलावरील राष्ट्रीय महामार्गापर्यंत आल्याचे आठवते, मग तेथून रिक्षा हुमरमळ्यापर्यंत कोणी आणली? प्रवाशी व्यक्तीला रिक्षा चालवता येत होती का? की अन्य कोणी साथीदार या लुटारू टोळीत आहेत? याबाबतचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91046 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..