गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात सज्जता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात सज्जता
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात सज्जता

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात सज्जता

sakal_logo
By

46463
कणकवली ः येथील बाजारपेठ माटवीच्या साहित्याने सजली आहे. गणेशोत्‍सवाच्या खरेदीसाठी सोमवारी झालेली गर्दी. (छायाचित्र ः अनिकेत उचले)

गणेशोत्सवासाठी
सिंधुदुर्गात सज्जता
प्रशासनाकडून तयारी ः जिल्ह्यात ६८,९५२ घरगुती गणेशमूर्ती
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः यंदा बुधवार (ता.३१) पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्ह्यात ६८ हजार ९५२ घरगुती-खासगी, तर ३२ सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत. गणेशोत्सवसाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी बस व रेल्वे स्थानकावर १८ ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात आहेत. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. सर्व बस व रेल्वे स्थानके, महामार्ग आणि घाटमार्गांवर चोख बंदोबस्त तैनात आहे.
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये किंवा वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. त्यामुळे सर्व गणेशभक्तांचा हिरमोड झाला होता. यावर्षी मात्र मुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे जादा रेल्वे, एसटी, खासगी बस मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्या. चाकरमानी यायला सुरुवात झाली आहे. यंदा खासगी घरगुती गणपतींमध्येही वाढ असून, ६५ ते ६६ हजारांपर्यंत असणारी संख्या यंदा ६८ हजार ९५२ पर्यंत गेली आहे, अशी माहिती पोलिस खात्याच्या अहवालातून उपलब्ध झाली. दीड ते अकरा दिवसांपर्यंत गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होत असतो. यावर्षी जास्तच उत्साह दिसून येत आहे.
सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. घरांची रंगरंगोटी व सजावटीची लगबग आहे. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी आहे. मूर्तीशाळांमध्ये रंगरंगोटीचा अंतिम हात फिरवला जात असून, आता बाप्पांच्या आगमनाचे वेध लागले आहेत.
येणाऱ्या चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणी करण्यासाठी सर्व रेल्वे स्थानके, बस स्थानकांवर १८ आरोग्य पथके तैनात आहेत. जोखमीच्या प्रवाशांना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केले जाणार आहे. दरम्यान, गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये, याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत. सार्वजनिक मंडळांनी ध्वनिप्रदूषण टाळावे, असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व रेल्वे व बस स्थानके, फिक्स पॉइंट, भुईबावडा, करुळ, फोंडा आणि आंबोली घाटमार्गांवर तसेच महामार्गावर बंदोबस्त आहे. अपघात होऊ नये, यासाठी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी आहे. खड्डे बुजविण्याबाबत बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी महामार्ग पाहणी दौरा करून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनीही कंबर कसली असून, दंगा काबू पथक, दंगल नियंत्रण पथकाकडून सरावासह प्रात्यक्षिक करून घेण्यात आले आहे.

सार्वजनिक गणपती असे
जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात ४, सावंतवाड़ी ५, आचरा १, मालवण २, कणकवली ५, बांदा २, कुडाळ ५, वेंगुर्ले ३, देवगड १, वैभववाडी ४ अशा सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91588 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..