सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय दहशतवाद संपला; दीपक केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar
सिंधुदुर्गातील दहशतवाद संपला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय दहशतवाद संपला; दीपक केसरकर

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील राजकीय दहशतवाद संपला असून, जिल्हा भयमुक्त झाला आहे. यापुढे जिल्ह्यात न झालेला विकास हाच माझा शत्रू असेल. जिल्ह्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद विसरून सकारात्मक विचाराने माझी वाटचाल असेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आज येथे म्हणाले. राज्यातील आगामी सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष-शिवसेना (शिंदे गट) युती करूनच लढविल्या जातील. याबाबतचा फॉर्म्युला वरिष्ठ स्तरावर ठरविला जाईल. त्यानंतर आवश्यक ते निर्णय होतील, असेही ते म्हणाले.

जिल्हा दौऱ्यावर असलेल्या केसरकर यांनी त्यांच्या निवासस्थानी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘राजकीय घडामोडीनंतरही सिंधुदुर्गची जनता, खास करून सावंतवाडीची जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास हाच केंद्रबिंदू मानून यापुढे काम करेन. यासाठी मंत्री उदय सामंत, रवींद्र चव्हाण यांची साथ घेणार आहे. राजकारण करीत असताना आम्ही भांडत राहिलो तर त्यापासून जनता दूर राहते. त्यासाठी प्रत्येकाने धोरण बदलावे. जिल्ह्यातील राजकीय दहशतवाद संपल्याने यापुढची भूमिका राजकीय मतभेद विसरून सकारात्मक विचाराने सर्वांना सोबत घेऊन जाण्याची असेल. त्यामुळे जिल्ह्यात न झालेला विकास हाच माझा शत्रू असेल.’’

ते म्हणाले, ‘‘कोकण नेहमीच निकालाच्या बाबतीत अग्रेसर आहे. परंतु, येथील मुले उच्चशिक्षणासाठी बाहेर जात असल्याने येथील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्यासाठी प्रयत्न आहेत. दर्जेदार शिक्षणासाठीचे प्रयत्न असून, त्यासाठी इतर राज्यांचा दौरा करून त्यांच्याकडे असलेले सर्वोत्तम घेण्याचा प्रयत्न आहे. शिक्षकांच्या अडीअडचणींबाबत सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात जवळपास ९० ते ९५ टक्के समस्या मार्गी लावल्या. राज्यातही या समस्या सोडविण्याबरोबर शून्य फाइल्सच्या दृष्टीने थेट निर्णय घेतले जाणार आहेत. जिल्ह्यात येणारे शिक्षक घाटमाथ्यावरील असल्याने भाषेची अडचण जाणवते. त्यासाठी शिक्षकाने कुठली भाषा वापरावी, यासाठी विशिष्ट पुस्तक तयार केले आहे. ते लवकरच शिक्षकांपर्यंत पोचेल. शासकीय काम हे राष्ट्रीय कार्य असल्याने प्रत्येक शिक्षकाने केलेच पाहिजे. ते काम केल्याने अध्यापनात दुर्लक्ष होते, हे म्हणणे चुकीचे आहे. ज्या ठिकाणी शिक्षक काम करतो, त्या मुख्यालयातच त्याने राहणे गरजेचे असताना शिक्षक सुटीच्या दिवशी आपल्या गावी जातात. याबाबत आपल्या कानावर तक्रारी आल्याने चौकशी केली जाणार आहे.’’

झीरो पॉइंटबाबत मला कळवा!
ते म्हणाले, ‘‘चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या खासगी बस सावंतवाडीतील प्रवाशांना झीरो पॉइंट येथे उतरवितात. सावंतवाडीतून न आणता झाराप-पत्रादेवीमार्गे थेट बांद्यातून गोव्याला जातात, हा प्रकार चुकीचा आहे. या संदर्भात नुकतीच माझी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. असा प्रकार घडल्यास तो माझ्या निदर्शनास आणून द्यावा. जिल्ह्यात वाढलेले गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता संपूर्ण जिल्हा सीसीटीव्ही करण्यासाठीही प्रयत्न आहेत.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91924 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..