वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेला ‘ट्रॅक’ मिळेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेला ‘ट्रॅक’ मिळेना
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेला ‘ट्रॅक’ मिळेना

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेला ‘ट्रॅक’ मिळेना

sakal_logo
By

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेला ‘ट्रॅक’ मिळेना

केवळ घोषणाच; सहा वर्षानंतरही हालचाली शून्य

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ३१ ः बहुचर्चित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाची घोषणा झाल्यानंतर तब्बल सहा वर्षांचा कालावधी लोटला असून मात्र रेल्वेमार्ग होण्याची कोणतीही सुचिन्हे दिसताना दिसत नाही. आता राज्यात भाजपप्रणित सरकार स्थापन झाले असून केंद्रात भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेल्या या मार्गाला गती मिळणार का? असा प्रश्न जिल्हावासीयांकडून विचारला जात आहे.
कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रेल्वेमार्ग व्हावा, अशी अनेक वर्षांपासून जिल्हावासींयाची मागणी होती. त्यासाठी अनेकदा चर्चा रंगल्या. प्राथमिक सर्व्हेक्षण झाले; परंतु, प्रत्यक्षात कधीच या मार्गाच्या दृष्टीने महत्वपुर्ण पाऊल उचलण्यात आले नाही. मात्र, २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर केंद्रीयमंत्री पदाची धुरा जिल्ह्याचे सुपुत्र सुरेश प्रभु यांच्या हाती आली. त्यांनी २०१५ मध्ये नियोजित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम जे. पी. इंजिनियरिंग कंपनीला देण्यात आले. या कंपनीने गुगल मॅपचा आधार घेत अतिशय खडतर असलेल्या या मार्गाचे सर्व्हेक्षण अवघ्या काही महिन्यात केले. त्यानंतर २०१६ मध्ये मंत्री प्रभू यांनी वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाची घोषणा केली. रेल्वेमंत्रालयाचा अखेरचा स्वतंत्र अर्थसंकल्प याच वर्षात सादर करण्यात आला. १०७ किलोमीटरच्या या रेल्वेमार्गासाठी अर्थसंकल्पात ३ हजार २०० कोटीची घोषणा करण्यात आली. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी अर्थसंकल्पात २५० कोटीची तरतुद देखील केल्याचे स्पष्ट केले होते.
अर्थसंकल्पात २५० कोटीची तरतुद झाल्यामुळे नियोजित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या कामाला सुरूवात होईल, अशी अपेक्षा होती. रेल्वेमंत्री प्रभू असल्यामुळे त्या कामाला गती मिळेल आणि मार्गाला मुर्तस्वरूप येईल, अशी धारणा सर्वसामान्यांची होती. अवघ्या काही महिन्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांनी काही कारणास्तव रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर गतीने सुरू असलेल्या रेल्वेमार्गाची प्रकिया काहीशी थंडावली. त्यानंतर आजमितीस रेल्वेमार्ग होण्याच्या दृष्टीने कोणतीच हालचाल मंत्रालयीन पातळीवर सुरू असल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे हा मार्ग आता होणार की नाही? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते हा रेल्वेमार्ग व्हावा, अशा प्रयत्नात होते. परंतु, त्यांच्याकडून देखील गेल्या वर्ष दोन वर्षांत कोणताच उठाव झाल्याचे दिसून येत नाही. सध्या केंद्रात भाजपचे सरकार असून अलीकडेच राज्यात भाजपप्रणित सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता तरी या रेल्वे मार्गाला गती मिळणार का? असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे.
------------
चौकट
पाठपुराव्याची गरज
नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत. याशिवाय राज्याच्या मंत्रीमंडळात जिल्ह्यातील रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर हे महत्वाची भुमिका बजावित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपाच्या नेत्यांनी हा रेल्वेमार्ग पुर्णत्वास होण्यासाठी या मंत्र्यांच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे पाठपुरावा केल्यास या मार्गाला मुर्त स्वरूप येईल.
-------------
चौकट
नियजीत रेल्वेमार्ग असा
वैभववाडी-कोल्हापूर हा नियोजित मार्ग १०७ किलोमीटरचा आहे. या रेल्वेमार्गावर १० स्थानके, ५ उड्डाणपूल, २६ बोगदे असणार आहेत. हा मार्ग वैभववाडी-सोनाळी-कुंभारवाडी-कुसुर-उंबर्डे-मांगवली-उपळे-ऐनारी (ता.वैभववाडी) सैतवडे-कळे-भुये-कसबा बावडा-मार्केट यार्ड कोल्हापूर, असा निश्चित केला होता.
------------
कोट
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग व्हावा, अशी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांची मागणी आहे. नियोजीत रेल्वेमार्गाची नेमकी स्थिती काय आहे, हे जाणून घेऊन लवकरच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळांसह केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली जाईल. त्यासाठी पुढाकार घेणार आहोत.
- प्रमोद जठार, माजी आमदार, सिंधुदुर्ग

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92050 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..