साखरपा ः अश्वारूढ गणेशांचे आगमन, दीड शतकी जुनी परंपरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा ः अश्वारूढ गणेशांचे आगमन, दीड शतकी जुनी परंपरा
साखरपा ः अश्वारूढ गणेशांचे आगमन, दीड शतकी जुनी परंपरा

साखरपा ः अश्वारूढ गणेशांचे आगमन, दीड शतकी जुनी परंपरा

sakal_logo
By

rat31p24.jpg
46832
साखरपाः नवाथे यांचा श्वेत दुर्वाधारी अश्वारूढ गणेश, सरदेशपांडे आणि केळकर यांचे अश्वारूढ गणेश.
----------
अश्वारूढ गणेशांची दीड शतकी जुनी परंपरा
गणेशोत्सव ; साखरपा-कोंडगावाची वेगळी ओळख
अमित पंडित ः सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता ३१ः गणेशोत्सव काळात ठिकठिकाणी अनेक परंपरा श्रद्धेने पाळल्या जातात. अशांपैकीच एक म्हणजे कोंडगाव साखरपा परिसरातील अश्वारूढ गणेशांची दीड शतकाची परंपरा आजही जोपासली जात आहे. या गावांमध्ये अनेक घरांमध्ये दरवर्षीप्रमाणे अश्वारूढ गणेश मानाने विराजमान झाले आहेत.
गणपतीचे वाहन हे उंदीर; पण साखरपा कोंडगाव परिसरातील सरदेशपांडे, अभ्यंकर, केळकर, केतकर, रेमणे, नावाथे, जोगळेकर, गद्रे, पोंक्षे, शिंदे या घराण्यांच्या घरी घोड्यांवर विराजमान झालेल्या गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. त्या मागे दीड शतकांचा इतिहास आहे. ही घराणी मराठेशाहीच्या काळात विशाळगडावर अधिकारी होती. सरदेशपांडे घराण्याकडे हे विशाळगड सुभ्यातील गावांच्या महसूल वसुलीचे अधिकार होते तर अभ्यंकर हे पागा सांभाळत असत. केळकर हे दिवाण होते तर केतकर कुटुंबाकडे सुभेदारी होती. रेमणे हे ग्रामोपाध्ये होते. या घराण्यांना साखरपा आणि परिसरातील गावांमढे जमिनी इनाम मिळाल्या होत्या. मराठेशाहीचा अस्त झाला. इंग्रजांचे साम्राज्य वाढीस लागल्यावर या कुटुंबांचे अधिकार लोप पावले आणि चरितार्थासाठी ही कुटुंबे गडउतार झाली. गडावरून येताना ते घोड्यावरून आले म्हणून त्यांचे गणपती घोड्यांवरून आणण्याची प्रथा सुरू झाली.
सुरवातीला या घराण्यांकडे लाकडी अश्व होते. सरदेशपांडे, केळकर, पोंक्षे यांच्याकडे हे लाकडी अश्व आहेत. त्यांच्या गणेशमूर्ती त्याच अश्वावर काढल्या जातात. रेमणे, नवाथे, अभ्यंकर, जोगळेकर यांचे अश्व आजही सुस्थितीत आहेत; पण आता त्यांवर गणपती काढणे, अश्वारूढ गणेश मूर्तिकारांकडून आणणे, विसर्जन करणे हे कठीण होत चालल्याने त्यांनी मातीच्या सहवासह मूर्ती आणण्यास प्रारंभ केला आहे. नवाथे यांच्या यंदाच्या गणेशमूर्तीची खासियत म्हणजे यंदा या मूर्तीच्या गळ्यात पांढर्‍या दुर्वांचा हार घालण्यात आला आहे. पेशाने वकील असलेले प्रवीण नवाथे यांनी या विषयी सांगितले की, हा योग दुर्मिळ आहे. श्वेत दूर्वा या सहजासहजी उपलब्ध होत नाहीत; पण यंदा त्यांच्याकडे त्या रुजून आल्यामुळे हा दुर्मिळ योग जुळून आला आहे. श्वेत दुर्वाधारी गणेश हा साखरपा परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
-------
दृष्टिक्षेपात...
* विशाळगडावरील मानकरी कुटुंबे
* नागपंचमीला अश्व मूर्तिकारांकडे सुपूर्द
* नवाथे यांच्या मूर्तीला श्वेत दुर्वांचा हार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92118 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..