मेढा-राजकोटमधील सागरी तडाखे थांबणार कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेढा-राजकोटमधील सागरी तडाखे थांबणार कधी?
मेढा-राजकोटमधील सागरी तडाखे थांबणार कधी?

मेढा-राजकोटमधील सागरी तडाखे थांबणार कधी?

sakal_logo
By

swt११७.jpg व swt११८.jpg
L४७०३५, ४७०३६
मेढाः राजकोट बंधाऱ्या अभावी समुद्री लाटांचा मारा असा दगडी कुपणांवर होऊन पाणी लोकवस्तीत घुसत आहे.

सागरी तडाखे थांबणार कधी?
मेढा-राजकोटमधील रहिवाशांचा सवाल; दीड कोटी मंजूर होऊनही काम रखडले
प्रशांत हिंदळेकरः सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १ः शहरातील मेढा-राजकोट येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी सुमारे १ कोटी ४७ लाख ३५ हजार ८१६ रुपयांचा निधी मंजूर होऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला. मात्र, अद्यापही या बंधाऱ्याच्या कामास सुरवात न झाल्याने यावर्षीही स्थानिक रहिवाशांना समुद्री लाटांच्या माऱ्याचा तडाखा बसला. यावर संतप्त स्थानिक रहिवाशांनी जीव गेल्यानंतर या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम होणार का? असा प्रश्‍न केला आहे. या बंधाऱ्याअभावी या परिसरातील सुमारे ६० हून अधिक कुटुंबांना उद्भवणारा धोका लक्षात घेता बंधार्‍याचे काम तातडीने मार्गी लावणे आवश्यक बनले आहे.
शहरातील मेढा-राजकोट भागात २०१२ मध्ये मेरीटाईम बोर्डाच्यावतीने बांधलेल्या अर्धवट धूपप्रतिबंधक बंधाऱ्यामुळे समुद्राच्या लाटांचा प्रवाह बदलला. परिणामी यामुळे गेली काही वर्षे समुद्री लाटांचे पाणी दगडी कुंपणे तोडून आत घुसत असल्याने मेढा काळबादेवी मंदिर परिसरातील लोकवस्तीत घुसत आहे. या गंभीर प्रश्‍नाबाबत स्थानिक रहिवाशांनी सातत्याने मेरीटाईम बोर्डाचे लक्ष वेधले. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. मेरीटाईम बोर्डाच्यावतीने केलेल्या या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम प्रत्यक्षात बंदर जेटीपर्यत करणे आवश्यक होते. मात्र, हे काम अर्धवट ठेवण्यात आले. यासंदर्भात त्यावेळी स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदाराची भेट घेत अर्धवट बंधाऱ्याबाबत विचारले असता निधीअभावी बंधाऱ्याचे काम अपूर्ण ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
मेरीटाईम बोर्डाच्यावतीने करण्यात आलेल्या या बंधाऱ्याचे काम पतन विभागाकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे अर्धवट स्थितीतील बंधाऱ्याचे काम मार्गी लागावे यासाठी स्थानिक नागरिक विश्‍वास पालव यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची २०१६ मध्ये भेट घेत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी पतन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या बंधाऱ्याच्या कामाचे अंदाजपत्रक बनविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार अंदाजपत्रक बनवून ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आले. मात्र, त्यानंतर कोणतीही कार्यवाही झाली नाही. फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या पावसाळी अधिवेशनात या बंधाऱ्याच्या प्रश्‍नावर चर्चा झाली. बंदर जेटीपर्यतच्या बंधाऱ्याच्या कामासाठी सुमारे साडे सहा कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी नसल्याने अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
सद्यःस्थितीत या बंधाऱ्याच्या कामासाठी १ कोटी ४७ लाख ३५ हजार ८१६ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात २२० मीटरचा बंधारा बांधण्यात येणार आहे. मात्र, निधी मंजूर होऊन तीन वर्षाचा कालावधी उलटला तरी प्रत्यक्षात या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला सुरवात न झाल्याने मेढा-राजकोट परिसरातील स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेली तीन वर्षे या बंधाऱ्याचे काम मार्गी न लागल्याने मेढा-राजकोट ते बंदर जेटी परिसरात किनाऱ्याच्या बाजूने राहणाऱ्या सुमारे ६० हून अधिक कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय अर्धवट स्थितीतील बंधाऱ्यामुळे समुद्राचा प्रवाह बदलून लाटांचे पाणी लोकवस्तीत घुसत असल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय विहीरींचे पाणीही खारट बनल्याने स्थानिक रहिवाशांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. गेली काही वर्षे पावसाळ्यात या भागातील रहिवाशांना पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून याबाबत लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी आहे. लोकांचे जीव गेल्यानंतर या बंधार्‍याचे काम पूर्ण होणार का? असा प्रश्‍न त्यांच्यातून विचारला जात आहे.
किनाऱ्याच्या बाजूने असणाऱ्या या वस्तीकडे जाण्यासाठी मार्ग नाही. या भागात एखादी आग लागल्यास किंवा एखादा अपघात घडल्यास त्याठिकाणी अग्निशमन बंब, रुग्णवाहिकाही पोचू शकत नाही अशी परिस्थिती आहे. या भागातही पर्यटन वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून हा धूपप्रतिबंधक बंधारा झाल्यास स्थानिक रहिवाशांना, पर्यटकांना ये-जा करण्यासाठी आवश्यक मार्गही उपलब्ध होणार आहे. यादृष्टीने या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम तातडीने मार्गी लागणे आवश्यक आहे.

चौकट
टेट्रापॉड टाकणे आवश्यक
जूनमध्ये मुंबईत पतन विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता पावसाळ्यानंतर या बंधाऱ्याच्या कामास सुरवात होईल. जानेवारी, फेब्रुवारीपर्यत या बंधाऱ्याचे काम मार्गी लागेल, असे तोंडी आश्‍वासन दिले आहे. या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याअभावी काय परिस्थिती उद्भवत आहे? त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात? याची माहिती पतनच्या अधिकाऱ्यांनी शासनाला द्यायला हवी. त्याचबरोबर केवळ धूपप्रतिबंधक बंधाराच न करता समुद्राच्या बाजूने टेट्रापॉड टाकणे आवश्यक असल्याचे तेथील रहिवाश्यांचे म्हणणे आहे.

कोट
मेढा-राजकोट या बंधाऱ्याच्या कामासाठी तीन वर्षापूर्वी मंजूरी मिळाली आहे. या बंधाऱ्याच्या कामासाठी आवश्यक सीआरझेडसह अन्य परवानग्या घेतल्या आहेत. या बंधाऱ्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. नव्या सरकारने सर्वच कामांना स्थगिती दिल्याने राज्यभरातील सर्वच धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे रखडली आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या बंधाऱ्याबाबत चर्चा झाली असून लवकरच या कामांना सुरवात होईल. त्यानुसार मेढा-राजकोट येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामास पावसाळा संपल्यानंतर सुरवात होईल असे स्पष्ट केले.
- प्रशांत पवार- पतन विभाग अधिकारी
--------------
कोट
swt१२१.jpg
47039
विश्‍वास पालव

मेढा-राजकोट बंधार्‍याचे काम अर्धवट ठेवल्याने या भागातील लोकवस्तीला समुद्री लाटांचे पाणी आत घुसत असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मेढा-राजकोट ते बंदर जेटी या बंधार्‍याचे काम मार्गी लागावे यासाठी गेली काही वर्षे पतन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन जिल्हाधिकारी, पतन विभागाच्या अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यात आले. तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर २०१९ मध्ये या बंधाऱ्याच्या कामासाठी सुमारे १ कोटी ४७ लाख ३५ हजार ८१६ रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र गेल्या तीन वर्षात प्रत्यक्षात या बंधाऱ्याच्या कामास सुरवात झालेली नाही. त्यामुळे शासन स्थानिक रहिवाशांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्‍न आम्हाला पडला आहे.
- विश्‍वास पालव, स्थानिक रहिवासी
-------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92402 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..