चिपळूण ः मसापतर्फे लोकगीते व लोककला स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः मसापतर्फे लोकगीते व लोककला स्पर्धा
चिपळूण ः मसापतर्फे लोकगीते व लोककला स्पर्धा

चिपळूण ः मसापतर्फे लोकगीते व लोककला स्पर्धा

sakal_logo
By

मसापतर्फे लोकगीते व लोककला स्पर्धा
रत्नभूमीतील कलांचे संवर्धन ; चिपळूण शाखेचा पुढाकार
चिपळूण, ता. ३ ः लोककलाकारांचा परस्पर परिचय आणि संघटन निर्माण करणे, काळाच्या ओघात पिढ्यानपिढ्या मातीच्या थराआड लुप्त होत चाललेले लोककलेचे शिल्लक धन जपण्यासाठी, संवर्धनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील पहिल्या पाच आणि उत्तेजनार्थ दहा लोककलाकारांचा भव्य बक्षिसांनी सन्मान केला जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, भारूड, जाखडी, गोमू, काटखेळ, संकासूर, भजन, डेरा, कव्वाली, जलसा, गज्जो, कातकरी, आदिवासी, लोककला यासोबत जुनी सांस्कृतिक गीते, शेती गीते, भलरी गीते, लग्नगीते, होळीगीते, बारसागीते (सुहेर गीते), विधी गीते, डाक गीते, मुस्लिम विधी गीते, मुस्लिम विवाह गीते या व अशा इतर काळाच्या पडद्याआड चाललेल्या लोकगीते, लोककला, लोककथा, विधीकथा आणि सांस्कृतिक ठेवा यांचे संकलन व संवर्धन या निमित्ताने होणार आहे. स्पर्धेतील प्रकार हा अस्सल पारंपरिक असणे अपेक्षित असून स्पर्धकाने त्याची लिखित संहिता पाठवणे बंधनकारक आहे. स्पर्धकाने कोणताही पारंपरिक रूढ प्रकार मोबाईल किंवा कॅमेऱ्याने शूटिंग करून पाठवायचा आहे.
स्पर्धेतील गीत, कला, खेळ, रूढ प्रकार हे अस्सल पारंपरिकच असावेत. त्याची चाल, प्रकार, शब्द योजना, मांडणी कोणतेही आधुनिक संस्कार न करता मूळ जुन्या रूपातच असावी. एखादा कलाप्रकार किती वेळात सर्वंकष पद्धतीने समोरच्या पर्यंत पोहचू शकेल, याचा अंदाज घेऊन व्हिडिओचा कलावधी/वेळ ठरवावा. शूटिंग मुद्दाम तयार केलेले किंवा प्रत्यक्षात कार्यक्रम सादर होत असताना केलेले किंवा पूर्वीही केलेले असले तरी चालू शकते. मोबाईल आडवा ठेवून व्हिडिओ बनवणे आवश्यक आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग (फक्त आवाज) साठीही स्पर्धक स्पर्धेत भाग घेऊ शकतो. वाद्य आणि लाईव्ह अॅक्शन यांना अधिकचे वेगळे गुण स्पर्धेत असणार आहेत. संहितेमध्ये अगदी थोडक्यात गीताचा आशय किंवा गाण्याची लौकिक कथा लिहून पाठवावी तसेच गाण्यांमध्ये काही स्थानिक किंवा पारंपरिक जुने शब्द आले असतील तर त्या शब्दांचा अर्थ शेवटी नमूद करावा. तसेच काही गीते ही रेकॉर्ड करणे किंवा चित्रित करणे शक्य न झाल्यास, ती फक्त लिखित स्वरूपात पाठवली तरी चालू शकतील. संहितेच्या शेवटी स्पर्धकाचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता यांचा स्पष्ट उल्लेख असावा.

चौकट
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...
भूतं, भगत, बाया, देवाचा नवस, अशुभ कार्याचे विधी यामध्येही गाण्यांची सांस्कृतिक ठेव आहे. स्पर्धेच्यादृष्टीने हा ठेवा देखील महत्वाचा मानला जाणार आहे. पुरस्कारांचे स्वरूप पहिला क्र. २१ हजार रु. रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, दुसरा क्र. १५ हजार रु. रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, तिसरा क्र. ११ हजार रु. रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, चौथा क्र. ७ हजार ५०० रु. रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, हापूस आंब्याचे कलम, पाचवा क्र. ५ हजार रु. रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, उत्तेजनार्थ १० बक्षिसे प्रत्येकी १ हजार १११ रु. रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुस्तके, हापूस आंब्याचे कलम तसेच पहिल्या ५० स्पर्धकांना हापूस आंबा कलम भेट देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. व्हिडिओ साईज मोठी झाल्यास aparant.msp@gmail.com या ई-मेल गुगल ड्राईव्हवर शेअर करावा किंवा पेन ड्राईव्हमधून स्पर्धा संयोजकांकडे जमा करावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92964 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..