रत्नागिरी ः तोतयेगिरी रोखण्यासाठी वर्गात शिक्षकांचा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः तोतयेगिरी रोखण्यासाठी वर्गात शिक्षकांचा फोटो
रत्नागिरी ः तोतयेगिरी रोखण्यासाठी वर्गात शिक्षकांचा फोटो

रत्नागिरी ः तोतयेगिरी रोखण्यासाठी वर्गात शिक्षकांचा फोटो

sakal_logo
By

तोतयेगिरी रोखण्यासाठी वर्गात शिक्षकांचा फोटो
शिक्षण विभागाचा आदेश; रत्नागिरी जिल्ह्यातून विरोध
रत्नागिरी, ता. ३ ः राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये नियुक्त केलेल्या अधिकृत शिक्षकाऐवजी तोतया शिक्षकांनी शिकवण्याचे प्रकार रोखण्यासाठी नियुक्त शिक्षकाचे छायाचित्र प्रत्येक वर्गात लावण्याची नामी शक्कल शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने लढवली आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांवर अतिरिक्त, अशैक्षणिक कामेसुद्धा मोठ्या प्रमाणात लादली जातात; पण त्याचबरोबर या शाळांमधील काही शिक्षकांबाबत कामचुकारपणाच्याही तक्रारी वारंवार येत असतात. यापैकी काही शिक्षकांची तर आपल्याऐवजी दुसरीच व्यक्ती संबंधित शाळेमध्ये अध्यापनासाठी बेकायदेशीरपणे नेमण्यापर्यंत मजल गेली असल्याचे मध्यंतरी उघडकीस आले. या तोतयेगिरीला आळा घालण्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाने ही उपाययोजना केली आहे. या संदर्भात पाठवण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ‘आपले गुरूजी’ या नावाने ‘ए फोर’ आकाराचे छायाचित्र शाळेतील संबंधित वर्गामध्ये लावणे बंधनकारक असून तशी कार्यवाही झाल्याची खातरजमा जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना समक्ष भेट देऊन करणे अपेक्षित आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल शिक्षण खात्याला सादर करावयाचा आहे. काही जिल्ह्यांमधून शिक्षकांनी वर्गांमध्ये फोटो लावून शासनाच्या आदेशाचे पालन केले आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या आदेशाला संघटनांनी विरोध दर्शवला आहे. जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने आक्षेप घेत प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना निवेदनही सादर केले आहे. तोतया शिक्षक कोणी ठेवत असतील तर संबंधित शिक्षकांना कायमचे घरी पाठवा आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करा; पण राज्यात आतापर्यंत कारवाईच झालेली नाही. या आदेशातून सगळ्याच शिक्षकांना बदनाम करणे योग्य नाही. शाळेत शिक्षकांचे छायाचित्र लावण्यासाठी सक्ती करू नये आणि त्यांना वेठीस धरण्यात येऊ नये, अशी मागणी असे निवेदनात केली आहे.

कोट
वर्गामध्ये फोटो लावण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यामध्ये शिक्षकांविषयी सकारात्मक भावना आहे. काही जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू असून हे ऐच्छिक आहे.
- वामन जगदाळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93079 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..