अनैतिक कृत्यांना जरब बसवणारा तपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनैतिक कृत्यांना जरब बसवणारा तपास
अनैतिक कृत्यांना जरब बसवणारा तपास

अनैतिक कृत्यांना जरब बसवणारा तपास

sakal_logo
By

लग्न प्रेमाने, दुसऱ्या प्रेमासाठी खून

गडहिंग्लज शिक्षक खून प्रकरण; आरोपींना शिक्षा झाल्याने अनैतिक कृत्यांना बसणार जरब

विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः प्रामाणिक पोलिस तपास गुन्ह्यांवर कसा वचक बसवू शकतो, याचे उदाहरण गडहिंग्लज येथील शिक्षक विजयकुमार गुरव खून प्रकरणाने सिंधुदुर्ग पोलिसांनी दाखवून दिले. केवळ वस्तुस्थितीजन्य पुरावे शोधून गुन्हेगारांना त्यांच्या शिक्षेपर्यंत पोहोचविले. हा गुन्ह्याचा तपास आणि त्यानंतर आरोपींना झालेली शिक्षा ही अशी अनैतिक कृत्य करणाऱ्यासाठी जरब बसवणारी आणि पोलिसांचे मनोधैर्य वाढवणारी म्हणावी लागेल. शिक्षक विजयकुमार आणि जयलक्ष्मी यांचा प्रेमविवाह झाला होता. तर दुसऱ्या प्रेमासाठी त्याच पत्नीने पतीचा काटा काढला. त्यामुळे पहिले लग्न प्रेमाने, दुसऱ्या प्रेमासाठी खून झाल्याचे स्पष्ट झाले.
भुरळ घालणाऱ्या आंबोली-कावळेसाद येथील खोल दरीचे व तेथील विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. उत्साही पर्यटकांनी भान हरवू नये व चुकून या दरीत कोसळून पर्यटनाला गालबोट लागू नये, यासाठी येथे विशेष काळजी घेण्यात आली आहे. सुरक्षेचे उपाय केले आहेत; मात्र या खोल दरीचा फायदा खून करून तो गुन्हा लपविण्यासाठी केल्याचा प्रकार ११ नोव्हेंबर २०१७ ला उघड झाला होता. या दिवशी कावळेसाद दरीत खोलवर एक मृतदेह असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिस यंत्रणेत खळबळ माजली होती. तत्काळ सावंतवाडी येथील बाबल आल्मेडा यांच्या टीमला पाचारण करीत तो मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मृतदेह अनोळखी होता. विशेष म्हणजे त्यांचे डोळे काढले होते. त्यामुळे त्यांचा खूनच झाल्याची खात्री पोलिसांची झाली होती. त्यामुळे पोलिसांसमोर या खुनाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते; परंतु सावंतवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस अधिकारी सुनील धनावडे यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेत तपास यंत्रणा कामाला लावली. याच दरम्यान पोलिसांना गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील माध्यमिक शिक्षक विजयकुमार गुरव ७ नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याचे समजले. गडहिंग्लज पोलिसांत तशी तक्रार त्यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव यांनी दिली होती. त्यामुळे कावळेसाद येथे मिळालेला मृतदेह विजयकुमार यांचा आहे का? याची खात्री करण्यासाठी त्यांच्या मुलाला गडहिंग्लज पोलिस सावंतवाडीत घेऊन आले. यावेळी त्यांच्या मोठ्या मुलाने मृतदेहाच्या हातात असलेला दोरा पाहून मृतदेह आपले वडील विजयकुमार यांचाच असल्याचे सांगितले. त्यामुळे सावंतवाडी पोलिसांसमोरील सर्वांत मोठे असलेले मृतदेह ओळख पटविण्याचे आव्हान संपले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील रहिवाशी असलेल्या विजयकुमार यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून सुमारे ४० किलोमीटर दूर असलेल्या कावळेसादच्या खोल दरीत मिळाल्यानंतर येथेच गुन्हेगाराने पुरावे नष्ट करण्यासाठी घेतलेली काळजी लक्षात येत होती. कोल्हापूर जिल्ह्यातील व्यक्ती असली तरी मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळाल्याने खून्याचा शोध घेण्याची जबाबदारी सावंतवाडी पोलिसांवर आली होती. यात विजयकुमार यांच्या पत्नीने विजयकुमार बेपत्ताची तक्रार दाखल करताना ६ नोव्हेंबर २०१७ ला ते रात्री जेवणासाठी बसलेले असताना त्यांना एक फोन आला. त्यामुळे ते कुठे तरी निघून गेले. ते परत आले नाहीत, असे नमूद केले होते. त्यामुळे तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक धनावडे यांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला असता विजयकुमार यांना त्या कालावधीत फोन आल्याचे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे पोलिसांचा तपास तिथल्या तिथेच फिरत होता. तपासासाठी योग्य मार्ग मिळत नव्हता. आरोपींकडून तपास यंत्रणेला गुंगारा देण्याचा प्रकार होत असल्याचे पुढे येत होते.
याच दरम्यान सावंतवाडी पोलिसांचा तपास सुरू असताना विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी व तेथीलच सुरेश चोथे यांचे अनैतिक संबंध असल्याचे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी सुरेशच्या दिशेने तपास यंत्रणा फिरविली. ही बाब लक्षात येताच सुरेश गायब झाला. त्यानंतर दोन दिवसांनी शिक्षक विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मीही बेपत्ता असल्याचे पुढे आले. त्यामुळे सावंतवाडी पोलिसांचा तपास योग्य पटरीवर आला. ११ नोव्हेंबरला मुंबई लोअर परेल येथून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. या दोघांनी खुनाची कबुली दिली. विजयकुमार घरात झोपले असताना त्यांच्या तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला. डोक्यावर रॉड मारून व डोळे काढून त्यांची ओळख पटणार नाही, याची काळजी घेतली. तसेच मृतदेह कोणाला मिळू नये यासाठी कावळेसाद दरीत आणून टाकला, असे त्यांनी सांगितले.
विजयकुमार यांचे खुनी मिळाले, त्यांनी खुनाची कबुलीही दिली; परंतु विजयकुमार यांचा या दोघांनीच खून केल्याचा पुरावा देणारी कोणतीही व्यक्ती पोलिसांना मिळाली नव्हती. त्यामुळे सावंतवाडी पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यावर भर दिला. यातील प्रमुख आरोपी चोथे याच्या पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या शिंत्रे या कामगाराला पोलिसांनी विश्वासात घेत त्याला माफीचा साक्षीदार बनविले. त्याने दिलेली साक्ष सर्वांत महत्त्वाची ठरली. न्यायालयाने एकूण २९ साक्षीदार तपासले. यात विजयकुमार यांची मुले वगळता अन्य एकही साक्षीदार फितूर झाला नाही. यावरून या घटनेविरुद्ध साक्षीदारांच्या मनातही किती चीड होती, हे स्पष्ट होते. न्यायालयाने पत्नी जयलक्ष्मी व तिच्या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे यातील तपास यंत्रणा, साक्षीदार, विशेष सरकारी वकील अजित भणगे कौतुकास पात्र ठरले आहेत.
---
47706
पोलिसांसाठी अभिमानाचा क्षण
या प्रकरणाचा तपास सिंधुदुर्ग पोलिसांच्या इतिहासात अगदी ठळकपणे नोंदवला गेला. प्रत्यक्ष पुरावा नसतानाही पोलिसांच्या प्रामाणिक भूमिकेमुळे गुन्हेगारीला कसा वचत बसू शकतो, हेच यातून स्पष्ट झाले. अनैतिक कृत्य करणाऱ्यांसाठी हा नक्कीच धोक्याचा संकेत आणि सिंधुदुर्ग पोलिसांसाठी अभिमानाचा क्षण म्हणता येईल. तसेच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस अधिकारी सुनील धनावडे यांनीही महत्वाची भूमिका बजावली.
.............
घराला शिक्षकी वारसा
विजयकुमार गुरव यांच्या घराण्याला शिक्षकी वारसा आहे. त्यांची सलग तिसरी पिढी ज्ञानदानासारख्या पवित्र कार्यात कार्यरत आहे. विजयकुमारही माध्यमिक शिक्षक होते. त्यांचे जयलक्ष्मी यांच्यावर प्रेम होते. या प्रेमाचे रुपांतर लग्नात झाले. प्रेमविवाह करून सुखी संसार सुरू असताना जिच्यासोबत प्रेम केले, त्याच पत्नीने दुसऱ्या प्रेमासाठी प्रियकराच्या मदतीने त्यांचा काटा काढला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93248 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..