खारदांड्यातील तरुण बनले विसर्जनासाठी जीवरक्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारदांड्यातील तरुण बनले
विसर्जनासाठी जीवरक्षक
खारदांड्यातील तरुण बनले विसर्जनासाठी जीवरक्षक

खारदांड्यातील तरुण बनले विसर्जनासाठी जीवरक्षक

sakal_logo
By

खारदांड्यातील तरुण बनले
विसर्जनासाठी जीवरक्षक
मुंबई : गणेशोत्सवासाठी महापालिकेसोबतच अग्निशमन दलाचीही यंत्रणा अहोरात्र कार्यरत असते; परंतु प्रशासनासोबतच स्थानिक पातळीवर सेवाभावी संस्थांही मोलाची भूमिका बजावत असतात. मुंबईतील खारदांडा कोळीवाड्यातील तरुणांनीही यंदा गणेशोत्सवासाठी निःशुल्क सेवा देण्याचा निश्चय केला आहे. त्यानुसार गणेशमूर्ती विसर्जनासाठी श्रीराम गणेश विसर्जन मंडळाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. दीड दिवसाच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनापासून या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सेवा देण्यास सुरुवात केली आहे. खारदांडा कोळीवाड्यातील तसेच खार आणि वांद्रे परिसरातील गणेश विसर्जनावेळी भाविकांना कोणताही अपघात होऊ नये, म्हणून हे मंडळ जातीने लक्ष घालत असते. लहान मुले, तसेच नागरिकांनी खोल समुद्रात जाऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून जाहीर सूचना दिल्या जातात. तरीही खबरदारी म्हणून खार दांडा कोळीवाडा गावांतील तरुण मंडळी निःशुल्कपणे जीवरक्षक म्हणून बाप्पासाठी सेवा बजावतात. विशेष म्हणजे दीड दिवसाच्या गणपतीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत विसर्जनाची जबाबदारी मंडळामार्फत घेतली जाते.

‘क्रिकेटर’ बाप्पा ठरतोय लक्षवेधी
घाटकोपर ः गणपती बाप्पा हे चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे आवडते दैवत. गणेशोत्सवात गणपतीचे विविध रूपात आगमन होताना दिसते. एका १२ वर्षीय चिमुकल्या क्रिकेटर वैभव थोरवेने त्याच्या बाबांजवळ हट्ट धरत आपण क्रिकेट खेळणारा बाप्पा घरात आणू या, अशी अट घातली. या कल्पनेतून चेंबूरच्या आरसी मार्ग येथील माऊली थोरवे यांनी यंदा घरात डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये खेळणारा ‘क्रिकेटर’ बाप्पा साकारला आहे. माऊली थोरवे हे मनसेचे वाहतूक सेनेचे राज्य सरचिटणीस असून त्यांचा मुलगा वैभव हा सध्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये नेट सराव करत आहे. सध्या दुबईत आशिया करंडक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. वैभवला क्रिकेटचे आकर्षण असल्याने यंदा त्याने घरात सजावटीत क्रिकेट खेळणारा बाप्पा साकारण्याची कल्पना आखली. त्यानुसार सोमनाथ जावीर यांनी थोरवे यांच्या घरातील सजावट केली. मूर्तिकार रुपेश जाधव यांनी बाप्‍पाची मूर्ती साकारली.
--
गणेशमूर्ती मोफत विसर्जन सेवा
मानखुर्द ः मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी मोफत वाहने उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र नगरमधील समाजसेवक बाबांनी वरडे, अशोक काळुगडे व विशाल बाबर यांनी हा उपक्रम राबवला आहे. अनंत चतुर्दशी दिवशी ही मोफत सेवा देण्यात येणार असून त्यासाठी अगोदर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र नगरातील घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मोफत वाहनाची सोय स्थानिक समाजसेवकांनी करून दिली आहे. त्यामध्ये घरगुती गणपतींच्या मूर्ती तसेच विसर्जन करण्यासाठी येणारे भाविक यांना वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मागील वर्षीदेखील हा उपक्रम राबवण्यात आला होता. त्या वेळी सुमारे ५० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी या मोफत वाहनांतून नेण्यात आल्या होत्या. या वेळीदेखील ही सेवा महाराष्ट्र नगर ते वाशी खाडी येथील विसर्जन स्थळापर्यंत दिवसभर उपलब्ध राहणार आहे.
--
देशभक्तीपर देखावा लक्षवेधी
कांदिवली ः भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होताना गणेशोत्सवातही देशभक्तीच्या देखाव्यांचे आणि सजावटीचे चित्र दिसत आहे. कांदिवली येथील चारकोप सह्याद्री नगरातील प्रसिद्ध अशा ‘सह्याद्री डी-२ सार्वजनिक उत्सव’ मंडळाने यंदा आपल्या दहाव्या वर्षी ‘बलसागर भारत होवो’ या देखाव्याला अनुसरून सजावट केली आहे. ‘भारत ः काल, आज आणि उद्या’ असे या देखाव्याचे स्वरूप आहे. ७५ वर्षांतील देशाची वाटचाल आणि आगामी काळाचे आव्हान नजरेसमोर ठेवून वैविध्यपूर्ण सजावट करण्यात आली आहे. या देखाव्याची संकल्पना मंडळाचे पदाधिकारी घनश्याम देटके यांची आहे; तर ठाण्यातील साहित्यिक-पत्रकार विनोद पितळे यांनी या विषयावर संहिता लिहिली आहे. मंडळाच्या देखाव्यासाठी गीतांजली कदम यांनी डिझाईन केले आहे. मंडळाच्या सर्व उत्साही युवा-तरुण कार्यकर्त्यांनी त्यानुसार सजावट केली आहे. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची ओळख, महती, वैशिष्ट्य, नैसर्गिक समृद्धी हा या देखाव्यातील आकर्षणाचा भाग आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93467 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..