रत्नागिरी-नेत्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-नेत्रदान
रत्नागिरी-नेत्रदान

रत्नागिरी-नेत्रदान

sakal_logo
By

वेध वैद्यक विश्वाचा.......................लोगो


इंट्रो

नेत्रदान ही एक राष्ट्रीय गरज आहे. आज भारतामध्ये जी नेत्ररोपणे होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात दान केलेले नेत्र हे श्रीलंकेसारख्या आपल्या छोट्या शेजारी राष्ट्राकडून आलेले असतात. आपला देश विविध आघाड्यांवर स्वयंपूर्ण होत असताना या बाबतीतही तो स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. आपण् दाखवलेली दूरदृष्टी एखाद्या अंधाला दृष्टी देऊ शकते. ''मरावे परी नेत्ररूपी उरावे'', हे साध्य होऊ शकते. भारतामध्ये २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर हा कालावधी राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त..
- डॉ. संतोष केळकर, मालगुंड
---------

मरावे परी नेत्ररूपी उरावे

तुम्हाला मरणानंतरही हे सुंदर जग पाहायचं आहे का? मग नेत्रदान करा. भारतात नेत्रदानाविषयी खऱ्या अर्थाने जागृती निर्माण झाली ती ९० च्या दशकात ऐश्वर्या राय-बच्चन हिने केलेल्या जाहिरातीमुळे. ऐश्वर्याने नेत्रदान करणार असल्याचे जाहीर केले होते. सुंदर डोळे लाभलेल्या ऐश्वर्याच्या फक्त डोळ्यांचे स्टिकर्स गाड्या, दुकाने अनेक ठिकाणी लावलेले आढळत. या जाहिरातींनी सामान्य माणसाच्या मनात नेत्रदान याविषयी कुतूहल निर्माण केलं हे नक्की.
भारतात साधारणपणे एक ते सव्वा कोटी नेत्रहीन व्यक्ती आहेत. त्यापैकी ३० लाख व्यक्तींना नेत्ररोपणाने दृष्टी प्राप्त होऊ शकते. मृत व्यक्तींच्या नेत्रदानामुळेच हे नेत्ररोपण करणे शक्य होते. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करणे गरजेचे आहे. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. नेत्रदानामध्ये संपूर्ण डोळा काढला जात नाही तर केवळ नेत्रपटल अर्थात कॉर्निया काढला जातो. त्यामुळे डोळ्याचे विद्रुपीकरण होत नाही.
जन्मजात बालकापासून अगदी शंभर वर्षाच्या स्त्री-पुरुषांपर्यंत कोणीही नेत्रदान करू शकते. कुठल्याही प्रकारचा चष्मा लावणारे, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेले, मधुमेह, रक्तदाब, मोतिबिंदू असणारे लोकही नेत्रदान करू शकतात. अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे म्हणजेच नेत्रपटल सुस्थितीत असल्यास स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने नेत्रदान करता येऊ शकते.
आपल्या जवळच्या नेत्रपेढीकडे नेत्रदानासंबंधी अर्ज करावा लागतो. त्यानंतर नेत्रपेढी आपल्याला एक डोनर कार्ड देते. याची माहिती आपण आपले नातलग आणि जवळची मित्रमंडळी यांना देणे आवश्यक आहे. कारण तेच आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान पूर्णत्वास नेत असतात. नेत्रदात्याने ज्या नेत्रपेढीमध्ये अर्ज भरला आहे त्याच नेत्रपेढीमध्ये नेत्रदान करणे सक्तीचे नसते. नेत्रदाता मृत्यूसमयी अन्य ठिकाणी असल्यास तेथील जवळील नेत्रपेढीमध्येही नेत्रदान करता येते. एखाद्या व्यक्तीने नेत्रदानाचा अर्ज भरला नसेल तरीही त्याच्या मृत्यूपश्चात त्याच्या जवळील नातेवाईक नेत्रदानाचा निर्णय घेऊ शकतात.
नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर नेत्रपेढीला लगेचच नेत्रदानाविषयी कळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, मृत्यूनंतर तीन ते चार तासांमध्ये (अपवादात्मक स्थितीत सहा तासापर्यंत) नेत्रदान होणे आवश्यक आहे. आपल्या डॉक्टरांकडून मृत्यू प्रमाणपत्र त्वरित मिळवावे. शक्यतो आपल्या डॉक्टरांना (१० ml) रक्ताचा नमुना घेऊन ठेवण्यास सांगावे. मृताचे डोळे व्यवस्थित बंद करून पापण्यांवर बर्फ अथवा ओल्या कापसाच्या किंवा कापडाच्या घड्या ठेवाव्यात. मृत व्यक्ती ज्या खोलीत असेल त्या खोलीतील पंखे बंद करावेत; मात्र वातानुकूलन यंत्र असल्यास जरूर चालू ठेवावे. जवळ प्रखर दिवे नसावेत.
मृत व्यक्तीला शक्यतो कॉटवर ठेवावे आणि मृत व्यक्तीचे डोके साधारण दोन उष्यांवर ठेवावे. नेत्रपेढीला कळवले की, नेत्रपेढीचे डॉक्टर मृत व्यक्ती जेथे असेल तेथे येऊन नेत्र काढून नेतात. या प्रक्रियेला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो आणि त्यासाठी जंतूविरहित खोलीची आवश्यकता नसते. नेत्र काढून झाल्यावर कृत्रिम नेत्र किंवा कापसाचे बोळे ठेवून पापण्या व्यवस्थितपणे बंद केल्या जातात त्यामुळे मृत व्यक्तीचा चेहरा विद्रूप वगैरे दिसत नाही.
मृत व्यक्तीस एड्स, रेबीज, कावीळ, कर्करोग, सिफिलीस, धनुर्वात किंवा विषाणूपासून होणारे रोग उदा. हेपॅटायटिस बी व सी, कोविड-१९, आदी असल्यास अशा व्यक्तीचे नेत्र, रोपणासाठी निरूपयोगी ठरतात; परंतु ही नेत्रपटले सराव आणि संशोधनासाठी वापरता येऊ शकतात. तेव्हा अशा व्यक्तींचे नेत्रदान व्हावे की नाही हे कृपया नेत्रपेढीच्या डॉक्टरांना ठरवू द्यावे. आपल्या घराजवळील नेत्रपेढीमध्ये नेत्रदान करता येते.

चौकट १
नेत्रदानासाठी संपर्क
रत्नागिरी जिल्ह्यात लायन्स नेत्र रुग्णालय, एमआयडीसी, रत्नागिरी येथे नेत्रदान करता येते. संपर्क- लायन्स नेत्रसंकलन केंद्र (७०६६०३३७०७), किशोर सूर्यवंशी (७३८५२०९२७५), समीर करमरकर (९४२२४३०८०५).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93531 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..