कणकवलीवर वर्चस्वासाठी मोर्चेबांधणी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीवर वर्चस्वासाठी मोर्चेबांधणी सुरू
कणकवलीवर वर्चस्वासाठी मोर्चेबांधणी सुरू

कणकवलीवर वर्चस्वासाठी मोर्चेबांधणी सुरू

sakal_logo
By

swt५५.jpg
४७९५२
कणकवली नगरपंचायत

कणकवलीवर वर्चस्वासाठी मोर्चेबांधणी सुरू
नगरपंचायत लढतीचे वेधः नगराध्यक्षपदासाठीही चुरस वाढणार
राजेश सरकारेः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ५ः सिंधुदुर्गात डिसेंबरअखेरपर्यंत जिल्‍हा परिषद, पंचायत समिती तसेच मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या तीन नगरपालिकांच्या निवडणुकांचा रणसंग्राम रंगणार आहे. त्‍याचबरोबर कणकवली तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचाही उमेदवारांची ताकद पणाला लागणार आहे. या निवडणुका आटोपताच कणकवली नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या नगरपंचायतीवर वर्चस्वासाठी पुन्हा एकदा राणेंच्या नेतृत्‍वाखालील भाजप आणि शिवसेना यांच्यात सामना रंगण्याची शक्‍यता असून त्‍यादृष्‍टीने संभाव्य उमेदवारांनी आपापल्‍या प्रभागात चाचपणी सुरू केली आहे.
कणकवली नगरपंचायतीची स्थापना २००२ मध्ये झाली. यात २००३ मध्ये झालेल्‍या पहिल्‍या सार्वत्रिक निवडणुकीत संदेश पारकर यांच्या नेतृत्‍वाखालील राष्‍ट्रवादीने झेंडा फडकावला होता. मात्र, त्‍यानंतर २००८, २०१३ आणि २०१८ मधील निवडणुकीत राणेंच्या शिलेदारांनी नगरपंचायतीवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे. २०१८ मध्ये नगराध्यक्ष पदाची थेट निवडणूक झाली होती. यात पारकर आणि राणेंचे कट्टर समर्थक समीर नलावडे यांच्यात सामना रंगला होता. त्‍यामध्ये नलावडे यांनी पारकर यांचा अवघ्या ३७ मतांनी पराभव केला. तर राणेंच्या स्वाभिमान पक्षाचे ११ नगरसेवकही निवडून आल्‍याने नगरपंचायतीवर राणेंचे वर्चस्व कायम राहिले. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला प्रत्‍येकी तीन जागा मिळाला होत्‍या. सध्या यातील शिवसेनेच्या एक नगरसेविका शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झाल्‍या आहेत तर भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्‍या मेघा सावंत यांचे सत्ताधारी गटाला समर्थन राहिले. त्‍यामुळे नगरपंचायतीमध्ये विरोधी नगरसेवकांचा आवाज क्षीण झाल्‍याचे चित्र आहे.
कणकवली नगरपंचायतीची पाचवी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल २०२३ मध्ये होणार आहे. या निवडणुकीतही नगराध्यक्षपदाची निवड जनतेमधून होणार आहे. त्‍यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचा खरा कस लागणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून विद्यमान नगराध्यक्ष नलावडे हेच उमेदवार असतील असे चित्र आहे. त्‍याअनुषंगाने त्‍यांनी गेल्‍या वर्षभरापासून मोर्चेबांधणीही केली आहे. शिवसेनेकडून नगरपंचायतमधील विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे जिल्‍हा युवा संघटक सुशांत नाईक, शिवसेना नेते पारकर आणि त्‍यांचे भाऊ माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांची नावे चर्चेत आहेत.

चौकट
शहर विकास आराखडा ठरणार कळीचा मुद्दा
मागील साडे चार वर्षात विरोधकांनी विविध मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, सत्ताधारी गटाकडूनही प्रत्‍येकवेळी आक्रमक पवित्रा घेण्यात आला. त्‍यामुळे विरोधकांना अपेक्षित प्रभाव पाडता आलेला नाही. मात्र, या निवडणुकीत कणकवली शहराचा सुधारित विकास आराखडा कळीचा मुद्दा ठरणार आहे. कणकवली शहराच्या विद्यमान विकास आराखड्याची मुदत यंदा संपत आहे. पुढील वर्षीपासून नवीन विकास आराखडा लागू होणार आहे. त्‍याची कार्यवाही सुरू झाली असून पुढील एक दोन महिन्यात नवीन आराखडा आणि त्‍यातील आरक्षणे जनतेसाठी खुली होणार आहेत. यात अस्तित्वात असलेल्‍या रस्त्यांचे रूंदीकरण, नव्या रस्त्यांची निर्मिती, अस्तित्वातील आरक्षणांमध्ये फेरबदल यामुळे नागरिकांमध्ये काहीसा असंतोष निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्‍याचा राजकीय फायदा विरोधी पक्ष असलेल्‍या शिवसेनेला होण्याची शक्‍यता आहे.

चौकट
पक्षीय ताकद
नगरपंचायतीच्या मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युती, राणेंची स्वाभिमान संघटना आणि गाव विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. यंदा देखील भाजप, शिवसेना आणि गाव विकास आघाडी अशी लढत अपेक्षित आहे. मागच्या निवडणुकीत गाव विकास आघाडीच्या उमेदवारांना अपेक्षित मते मिळाली नव्हती. त्‍यामुळे खरी लढत भाजप आणि शिवसेना यांच्यातच होणार असून पक्षीय संघटना मजबूत असणारा पक्ष सत्तेची चावी आपल्‍या हाती राखणार आहे. या दृष्‍टीने गेल्‍या पाच वर्षात भाजप संघटना पूर्वीपेक्षा आणखी बळकट करण्याला भाजपकडून प्राधान्य देण्यात आले. शिवसेनेकडेही प्रत्‍येक प्रभागात कार्यकर्ते आहेत. २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत भाजपचे नीतेश राणे आणि शिवसेनेचे सतीश सावंत यांच्यात लढत झाली होती. या लढतीमध्ये कणकवली शहरात शिवसेना उमेदवार ३४४ मतांनी पिछाडीवर राहिली होती. त्‍यामुळे कणकवली शहरातही शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग असल्‍याचे स्पष्‍ट झाले असून शिवसेनेने पक्षीय संघटना आखणी मजबूत केली तर नगरपंचायत निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

चौकट
विकासकामे महत्‍वाचा मुद्दा
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत विकास कामांचाही मुद्दा महत्‍वाचा ठरणार आहे. यात गेल्‍या साडे चार वर्षात शहरातील रिंगरोडचे सुरू झालेले दोन टप्पे, तेली आळी, टेंबवाडी येथील नव्याने झालेले रस्ते, क्रीडा संकुल, सेल्‍फी पॉइंट, प्रभाग निहाय पथदीप व्यवस्था आदी कामे सत्ताधाऱ्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार आहे. तर रखडलेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्‍प, स्टेडियम, सांडपाणी व्यवस्था यासह अनेक प्रलंबित प्रश्‍न विरोधकांकडून उपस्थित केले जाण्याची शक्‍यता आहे.

चौकट
सुरक्षित मतदारसंघाचा शोध सुरू
नगराध्यक्ष आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी असले तरी सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभागातील आरक्षणात फेरबदल होणार आहे. त्‍याअनुषंगाने लगतचा मतदारसंघ सुरक्षित असू शकतो का? या दृष्‍टीनेही अनेक उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्‍चित झाल्‍यानंतर उमेदवारी निश्‍चितीसाठी पक्षप्रवेश कार्यक्रम देखील सुरू होणार आहेत. मागील वेळेत अनेक विद्यमान उमेदवारांचे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले होते. त्‍या मतदारसंघात आपल्‍या सौभाग्‍यवतींना उभे करून निवडणूक जिंकली होती. या मतदारसंघातील महिला आरक्षण उठल्‍यास त्‍या ठिकाणी पुन्हा निवडणूक लढविण्यासाठीचीही सज्‍जता उमेदवारांनी ठेवली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93545 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..