मंडणगड ः गौराईला विरहगीतांनी प्रेमाचा निरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड ः  गौराईला विरहगीतांनी प्रेमाचा निरोप
मंडणगड ः गौराईला विरहगीतांनी प्रेमाचा निरोप

मंडणगड ः गौराईला विरहगीतांनी प्रेमाचा निरोप

sakal_logo
By

सकाळ विशेष ..............लोगो

फोटो ओळी
-rat5p4.jpg ः KOP22L47973 पालेकोंड ः सासरी निघालेल्या माहेरवाशीण गोराईला विरहगीतांनी निरोप देताना महिलावर्ग.
-rat5p5 .jpg ः KOP22L47974 गौराईला सुपातून ओवाळणी करताना महिला, मुली.


गौराईला विरहगीतांनी प्रेमाचा निरोप
पूर्वापार परंपरा : मध्यरात्री रंगतो भावपूर्ण खेळ
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता.५ ः
लवतील आंबे, लवतील जांबे लवत मोंगर जाई
गौराई निघाली सासराला तिला गं आंदण काय....
अशी निरोपाची विरहगीते गात सासरी जाणाऱ्या गौराई माहेरवाशिणीला रडवण्यात आले. वर्षानुवर्षाची ही परंपरा जपण्यात आली. विरहगीते गाताना उपस्थित महिलांचा कंठ दाटून आला. माहेर आणि सासर यातील भावनिक संबंध व्यक्त करणारी ही परंपरा पालेकोंड गावासह अनेक गावातून जोपासण्यात आली.
मंडणगडात ग्रामीण भागात अत्यंत पारंपरिक पद्धतीने गौराईचे आगमन झाले. गौर घरी आणल्यानंतर घराच्या माळ्यावर चढवण्यात आले. माहेरी आलेल्या गौरीचा पाहुणचार नीट व्हावा म्हणून सर्व झटत होते. संध्याकाळी घरातल्या प्रौढ स्त्रियांनी गौरीला सजवली. विविध प्रकारची धान्य, पत्री, फुले व अत्तर, अलंकारांनी सजवून, नटवल्यामुळे गौराईचे सौंदर्य नखशिखांत बावन्नकशी दिसत होते. दिवसभरात गौरी-गणपती दोघांचीही मनोभावे पूजा करण्यात आली. तिला विविध पदार्थांचा नैवैद्य दाखवण्यात आला. संध्याकाळी आरती म्हटल्यानंतर गौरीसमोर रात्रभर माहेरवाशिणी व सासुरवाशिणींच्या उपस्थितीत जागर घुमला. माहेरवाशिणीचे रुसवे-फुगवे काढत लाडाची सरबत्ती करण्यात आली. जाखडी नृत्य, टिपरी नृत्य, झिम्मा, फुगडी, बसफुगडी, फेर धरून नाच-दंगा करत आसू आणि हसूत रात्र जागवून गौराईसह लग्न होऊन सासरी गेलेल्या आणि दोन दिवसांसाठी माहेरी आलेल्या माहेरवाशिणीचे जल्लोषानं स्वागत करण्यात आले. मध्यरात्रीच्या सुमारास काटवटीवर उलटा पलिता, लाटणे, काठ्या रगडून वेगवेगळे आवाज काढण्यात आले. या वेळी विरहाची गाणी गाण्यात आली. यालाच गौर रडवणे म्हणतात. गाण्यात गावाच्या परिसरातील महिलांच्या आयुष्याशी निगडित आणि बालपणीच्या आठवणी असणाऱ्या स्थळांचा उल्लेख करून पुन्हा उजाळा देण्यात आला. पूर्वापार वर्षानुवर्षे चालत आलेली सासर-माहेरचे नाते सांगणारी परंपरा ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येत जपली.
---------------
चौकट
काळी गं गरसोळी - तिच्या पायात जोडवी
अय्याव ओवसते ही गौराई बाई!
अशी गाणी गात सोन्याच्या पावलांनी माहेरी आलेल्या गौराईला सुपातून ओवाळणी करून तिची यथोचित पूजा करण्यात आली. कोकणात गौरीला सुपे ओवसणे ही प्रथा आहे. पूर्वा नक्षत्रावर गौरीचे पूजन करून फुले फळांनी भरलेली सुपे ओवसण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93578 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..