स्वच्छ सिंधुदुर्ग ‘फाईव्ह स्टार’कडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ सिंधुदुर्ग ‘फाईव्ह स्टार’कडे
स्वच्छ सिंधुदुर्ग ‘फाईव्ह स्टार’कडे

स्वच्छ सिंधुदुर्ग ‘फाईव्ह स्टार’कडे

sakal_logo
By

स्वच्छ सिंधुदुर्ग ‘फाईव्ह स्टार’कडे

हागणदारीमुक्त प्लसचा मान; ७४१ पैकी २९३ गावे अभियानात पुढे


विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः स्वच्छतेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ठसा उमटविला आहे. स्वच्छतेबाबतची खरी जान जिल्ह्यातील नागरिकांना आली आहे. आशिया खंडात हागणदारी मुक्त होण्याचा पहिला मान मिळविणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची हागणदारी मुक्त प्लस या अभियानातही वेगाने वाटचाल सुरू आहे. स्वच्छतेचे पाच निकष दृश्यमान स्थितीत पूर्ण करीत ७४१ पैकी २९३ गावांनी हागणदारी मुक्त प्लस होण्याचा मान मिळविला आहे. स्वच्छतेतील ५ स्टार मानांकन मिळवत अनेक गावे यशस्वी होत आहेत.
स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत हागणदारी मुक्त अभियान राबविले होते. या टप्प्यात प्रत्येक कुटुंबाला शौचालय उभे करून देण्याचे उद्दिष्ट होते. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाजी मारत देशाच्या आशिया खंडात सर्वांत प्रथम १०० टक्के शौचालय उभे करण्याचा विक्रम केला होता. त्यामुळे आशिया खंडातील पहिला हागणदारी मुक्त जिल्हा होण्याचा मान जिल्ह्याला मिळाला होता. २०१६ मध्ये हा मान जिल्ह्याने मिळविला होता. पंतप्रधानांच्या हस्ते तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. त्यानंतर केंद्राच्या जलशक्ती विभागाच्यावतीने ३० जून २०२० पासून स्वच्छ भारत अभियान ग्रामीण टप्पा दुसरा सुरू केला आहे. या अभियानात गावे हागणदारी मुक्त प्लस (ओडीएफ प्लस) जाहीर करण्यात येत आहेत; मात्र याची व्याप्ती वाढविली आहे. पहिल्या टप्प्यात शौचालय उभारणी हेच प्रमुख उद्दिष्ट होते; मात्र या दुसऱ्या टप्प्यात शौचालयाचा प्रत्यक्ष वापर, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा निर्मूलन आदी विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे. यात उदियमान, उज्वल आणि उत्कृष्ट अशा तीन टप्पे निश्चित केले आहेत.
यामध्ये तिसरा उत्कृष्ट हा टप्पा महत्वाचा असून त्यादृष्टीने जिल्ह्यात जोरदार काम सुरू आहे. यामध्ये गावातील सर्व कार्यरत कुटुंबाकडे शौचालय असणे व त्याचा वापर करणे बंधनकारक आहे. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय येथे शौचालय सुविधा उपलब्ध करून देणे. यात महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करणे. गावातील सर्व सावजनिक ठिकाणी कमीत कमी कचरा व सांडपाणी निर्माण होईल, असे नियोजन करणे. तसेच गावात प्लास्टिक कचरा आढळणार नाही, असे नियोजन करणे, गावात सांडपाणी व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध करणे, गावात घनकचरा व्यवस्थापन सुविधा निर्माण करणे, हागणदारी मुक्त प्लसचे दृश्यमान संदेश भिंतीवर पेंटिंगच्या माध्यमातून लावण्यात येणे आदी निकष अंतर्भूत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६४१ महसुली गावे आहेत. ही सर्व गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात राबविण्यात येत असलेल्या हागणदारी मुक्त प्लस अभियानात यातील २९३ गावांनी बाजी मारली आहे. एवढे गाव हागणदारी मुक्त प्लस जाहीर झाले आहेत. तर ४४८ गाव शिल्लक राहिले आहेत. या ४४८ गावांत हागणदारी मुक्त प्लस होण्यासाठी काम सुरू आहे. २९३ गावातील २ ऑक्टोबर २०२१ रोजी ११५ गाव जाहीर केले होते. तर १६ ऑगस्ट २०२२ ला १७८ गाव जाहीर केले आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात १०० टक्के शौचालय उभारणी झाली होती. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यांत नागरिकांनी त्याचा वापर करणे यासाठी काम करावे लागत आहे. सुदैवाने यासाठी नागरिकांना प्रबोधन करण्याची गरज पडत नाही. कारण नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटलेले आहे. याशिवाय सांडपाणी व घनकचरा यासाठी काम करावे लागत आहे. वैयक्तिक स्तरावर शौषखड्डे मारून सांडपण्याचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे. मॅजिक किट पद्धतीचा शौषखड्डा मारून सांडपाणी नियोजन करण्यात येत आहे. ही पद्धत आधुनिक असून यामुळे सांडपाण्याची दुर्गंधी येणे किंवा त्यामुळे डास निर्माण होणे, ही समस्या संपली आहे. त्यामुळे मॅजिक किट ही पद्धत जिल्ह्याचे मॉडेल म्हणून विकसित झाले आहे. तसेच घनकचरा विल्लेवाट लावण्यासाठी प्रत्येक गावात कचरा संकलनासाठी शेड उभारण्यात येत आहे. त्यात सुका व ओला कचरा स्वतंत्र ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. सुका व ओला कचरा संकलीत करून विल्लेवाट लावण्याचे व्यवस्थापन उभे केले आहे.
----------
चौकट
‘फाईव्ह स्टार’चे निकष
- कुटुंबांकडे शौचालय व वापर बंधनकारक
- शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतींना शौचालये
- या महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सुविधा हवी
- सार्वजनिक ठिकाणी कचरा, सांडपाणी हवे कमी
- प्लास्टिक कचऱ्याला आळा
- सांडपाणी व्यवस्थापन सुविधा गरेजेची
- घनकचरा व्यवस्थापन गरजेचे
- हागणदारीमुक्त प्लसचे संदेश हवेत भिंतीवर
---------
कोट
सिंधुदुर्ग जिल्हा मुळात स्वच्छ आहे. या जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छ्ता आवडते. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटले आहे. केंद्र सरकारच्या हागणदारी मुक्त प्लस या अभियानात जिल्ह्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. पहिल्या टप्प्या प्रमाणे या दुसऱ्या टप्प्यात १०० टक्के यश मिळविण्यासाठी प्रशासकीय पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.
- विनायक ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग
----------
चौकट
ग्राफ देतो

हागणदारीमुक्त प्लस गावे (तालुकानिहाय)

तालुका*पहिला टप्पा*दुसरा टप्पा*एकूण
देवगड*१४*५८*७२
वैभववाडी*१०*२६*३६
कणकवली*१८*३*२१
मालवण*६*४५*५१
कुडाळ*३६*१२*४८
वेंगुर्ले*४*१३*१७
सावंतवाडी*१८*१६*३४
दोडामार्ग*९*५*१४

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93833 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..