सेल्फी पॉईंट अडकला कुठे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेल्फी पॉईंट अडकला कुठे?
सेल्फी पॉईंट अडकला कुठे?

सेल्फी पॉईंट अडकला कुठे?

sakal_logo
By

48294
सावंतवाडी ः सेल्फी पॉईंट उभारण्यात येणारी मोती तलावाकाठची जागा.


सेल्फी पॉईंट अडकला कुठे?

सावंतवाडी शहरातील प्रश्न; तलावाकाठची संकल्पना सत्यात येईना

सावंतवाडी, ता. ६ ः पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सावंतवाडी पालिकेकडून येथील मोती तलावाकाठी श्रीराम वाचन मंदिर समोर सेल्फी पॉईंट उभारण्याचा संकल्प सोडला खरा; परंतु नऊ महिने उलटले तरी हे काम नेमके कशासाठी थांबले, या प्रश्नाचे उत्तर मात्र नागरिकांना सापडू शकले नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील वर्षभरात सेल्फी पॉईंट ही संकल्पना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. सुरुवातीला कुडाळ पालिकेतर्फे ‘आय लव कुडाळ’, ही संकल्पना सत्यात उतरल्यानंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी हा उपक्रम पाहायला मिळाला. ग्रामपंचायतीपासून दुकानांसमोर ही संकल्पना आज पाहायला मिळत आहे. त्या त्या गावाचे किंवा त्या त्या शहराचे दुकानांच्या नावाने हे सेल्फी पॉईंट उभारले जात आहेत. सावंतवाडी पालिकेकडूनही ही संकल्पना राबवण्याचा प्रयत्न झाला. नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यकाळात हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी ‘आय लव सावंतवाडी’ या शब्दरचनेचे अनेक डिझाईन आर्किटेककडून मागविण्यात आले. त्यातील एका डिझाईनवर शिक्कामोर्तब करत हा सेल्फी पॉईंट शहरातील श्रीराम वाचन मंदिर समोरील स्लॅबच्या ठिकाणी उभारण्याचे निश्चित झाले. यासाठी जिल्हा नियोजनकडून तब्बल नऊ लाख रुपये मंजूरही झाले. नियमाप्रमाणे टेंडर प्रक्रिया राबवून या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली. संबंधित ठेकेदाराकडून कामही हाती घेण्यात आले; मात्र त्यानंतर नगरपालिकेची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्ष पदावरून परब आणि सर्व नगरसेवकांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर पालिकेवर शासनाकडून प्रशासक नेमण्यात आला व हाती घेतलेले सेल्फी पॉईंटचे काम आजमितीपर्यंत अर्धवट स्थितीत रखडून राहिले. नेमके हे काम कशासाठी आणि का रखडले, याचे उत्तर मात्र अद्यापही कोणालाच मिळाले नाही.
सावंतवाडी शहराला निसर्गाने भरभरून दिले आहे. मोती तलावाचे सौंदर्य येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला भुरळ घालते. त्यामुळे तलावाकाठी बसून सेल्फी घेणे ही प्रक्रिया पर्यटकांमध्ये आपसुकच पाहायला मिळते. मोती तलावाच्या याच सौंदर्यात आणखी भर घालताना आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहरातील हा सेल्फी पॉईंट महत्त्वाची भूमिका बजावणार होता; परंतु प्रशासकाच्या कालावधीत नऊ महिन्यांत हे काम मार्गी लागले नाही, हे आश्चर्यच म्हणावे लागेल.
---
निधी मंजूर, तरीही...
मुळात कामासाठी निधी नसता तर भाग वेगळा होता; परंतु जिल्हा नियोजनकडून निधी मंजूर असतानाही हे काम रखडल्याने यात काहीतरी वेगळे कारण निश्चितच असू शकते, असा कयास आता नागरिकांतून व्यक्त केला जात आहे. ज्याप्रमाणे हे काम अर्धवट सोडण्यात आले आहे, ते पाहता ते शहर सौंदर्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. त्यामुळे हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी आता नागरिकांतून होत आहे.
---
प्रशासनाचे मौन
दरम्यान, यासंदर्भात प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात बोलण्याचे टाळले. त्यामुळे हे काम कशासाठी थांबले, याचे उत्तर मिळू शकले नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93834 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..