सर्वधर्मसमभाव जपणारा साटेलीतील गणेशोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वधर्मसमभाव जपणारा साटेलीतील गणेशोत्सव
सर्वधर्मसमभाव जपणारा साटेलीतील गणेशोत्सव

सर्वधर्मसमभाव जपणारा साटेलीतील गणेशोत्सव

sakal_logo
By

swt6.jpg
48332
साटेली : येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची ''श्रीं''ची मूर्ती.

सर्वधर्मसमभाव जपणारा गणेशोत्सव
साटेलीतील उत्सव ः सामाजिक बदलाची नांदी
प्रभाकर धुरी ः सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ६ ः साटेली येथील गणेशोत्सव सर्वधर्मसमभाव जपणारा आहे. त्यामुळे परिसरात साटेलीच्या बाप्पाचे सर्वसामान्य भाविकांच्या मनात विशेष स्थान आहे.
दोडामार्ग-तिलारी-बेळगाव मार्गावर मिळणारे साटेली हे गाव. तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ येथे आहे. वेगवेगळ्या जाती-धर्माची माणसे नोकरी, व्यवसायानिमित्त येथे स्थिरावली आहेत. गावाला सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वारसा मोठा आहे. वेगवेगळ्या जाती-धर्माची माणसे या गावात गुण्यागोविंदाने राहतात. त्या सगळ्यांना आणखी एक धागा कायमस्वरुपी ऋणानुबंधांच्या विणीत बांधून ठेवतो, तो म्हणजे इथला सार्वजनिक गणेशोत्सव.
साधारणपणे तेरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष सुरेश दळवी यांनी साटेली येथील केंद्रशाळेच्या समोरील पटांगणात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. ती खरं तर नव्या सामाजिक बदलाची नांदी मानावी लागेल. कारण तो गणेशोत्सव केवळ हिंदूंचा न राहता सर्वधर्मीयांचा झाला. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन आदी सर्वधर्मीय पहिल्या वर्षापासून साटेलीतील बाप्पाची एकत्रपणे पूजाअर्चा करतात. आरतीत सर्वांचा सहभाग असतो. दिवसभर आणि रात्रीही सर्वजण आळीपाळीने जागर करतात. गणेशोत्सव मंडळ सर्वांचे आहे. इथे प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी, तर प्रत्येक पदाधिकारी इथला कार्यकर्ता असतो. त्यामुळे कुणी सान-थोर नाही. सगळे समान. तोच धागा सर्वांना गेली तेरा-चौदा वर्षे एका समान आणि अतूट धाग्यात बांधून ठेवत आहे.
संजय गवस, ऋषिकेश धर्णे, दत्ताराम धर्णे, दशरथ मयेकर, शामसुंदर धर्णे, इसाक खेडेकर, अभय धर्णे, बाबा मयेकर, पंकज गाड, चंद्रकांत मयेकर, महेंद्र नाईक, सचिन गाड, बॅनी फर्नांडिस, रामदास धर्णे, सूर्यकांत भट आणि त्यांची अनेक मित्रमंडळी तसेच गावातील अनेक युवक अकरा दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव लक्षवेधी बनवण्यासाठी मेहनत घेत असतात.
तालुक्यासह कर्नाटक व गोवा येथील अनेक भाविक दरवर्षी मुद्दामहून साटेलीच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येतात. सर्वांचे श्रद्धास्थान असलेला साटेलीचा गणेशोत्सव आता एका गावापुरता मर्यादित राहिला नसून त्याची ख्याती सर्वदूर पसरली आहे. सर्व धर्माच्या एकात्मकतेचे प्रतिक म्हणून साटेलीच्या गणेशोत्सवाने एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर घालून दिला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93836 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..