साडेचारशे वर्षांच्या परंपरेचा उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेचारशे वर्षांच्या परंपरेचा उत्सव
साडेचारशे वर्षांच्या परंपरेचा उत्सव

साडेचारशे वर्षांच्या परंपरेचा उत्सव

sakal_logo
By

48374
ओटवणे ः कुळघर येथे स्थानापन्न झालेली गणपती बाप्पांची मूर्ती.


साडेचारशे वर्षांच्या परंपरेचा उत्सव

ओटवणेतील ‘कुळाचा गणपती’; पाचवी पिढी करतेय पूजन, परिसरात उत्साहाचे वातावरण

महेश चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. ६ ः सुमारे साडेचारशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या ओटवणे गावाची धार्मिकता सर्वपरिचित आहे. येथील प्रत्येक कार्यात धार्मिकतेचा विविधांगी अंश दिसून येतो. ओटवणे-कुळघर येथे स्थानापन्न झालेली श्रींची मूर्तीही अशाच आगळ्यावेगळ्या धार्मिकतेचे प्रतिक आहे. गावप्रमुख मानकरी रवींद्र गावकर यांच्या निवासस्थानी म्हणजे कुळघराकडे स्थानापन्न होणाऱ्या मूर्तीला ‘कुळाचा’ किंवा ‘गावाचा गणपती’ म्हणून संबोधले जाते. गावकर घराण्याची पाचवी पिढी म्हणजे सुमारे १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात या गावाच्या सार्वत्रिक गणपती पूजनाला सुरुवात झाली असावी, असे जाणकार सांगतात. आता बाप्पांची संख्या वाढतली असली, तरी कुळाचा गणपती त्यावेळी गावात एकमेव होता.
ओटवणे गावाच्या गणपतीची धार्मिकता ही विशेष आहे. या मूर्तीच्या मातीच्या गोळ्यापासून ते विसर्जनापर्यंत विविध धार्मिक चालीरीती दिसून येतात. मूर्ती बनविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मातीच्या गोळ्याची विधिवत पूजा करण्यात येते. तसेच मूर्ती घडविण्यासाठी सुद्धा पौर्णिमा, नागपंचमी, गोकुळाष्टमी आदी दिवसांतील मुहूर्त निवडला जातो. मूर्तीच्या रंगकामात देखील वैविध्य आढळून येते. ‘रक्तवर्ण’ स्वरुपाची मूर्ती असलेल्या या गावाच्या गणपतीचे रंगकाम गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी, म्हणजे हरितालिकेच्या रात्री करण्यात येते. सूर्यास्तानंतर मूर्तीचे रंगकाम सुरू होते व सूर्योदयापूर्वी म्हणजे, गणेश चतुर्थीच्या दिवशी रंगकाम पूर्ण करण्याची धार्मिक प्रथा आहे. मूर्तीचे रक्तवर्ण स्वरुपाचे रंगकाम पूर्ण झाल्यानंतर मूर्तीच्या धार्मिकतेचे तेज अधिकच वाढते. अशा मूर्तीच्या नेत्रांची रेखणी करण्यासाठी सुद्धा विशेष प्रथा येथे आहे. सूर्योदयापूर्वी रंगकाम पूर्ण झाल्यानंतर गावाचे प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व श्रीफळ ठेवून (तळी ठेवून) नजर उघडली जाते. ही परंपरा आजही त्याच धार्मिकतेने सुरू असून यंदा या गणपतीचा मुक्काम दहा दिवसांचा आहे.

‘रक्तवर्ण’ स्वरुप
गावाचा हा गणपती रक्तवर्ण स्वरुपाचा असल्याने त्याचे पावित्र्य अधिक जपावे लागते. रक्तवर्ण म्हणजे लाल रंगाच्या गणपती बाप्पाचा क्रोध उग्र असतो. त्यामुळे नीटनेटकेपणा, स्वच्छता या बाप्पाजवळ अधिक बाळगली जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या मूर्ती क्वचित ठिकाणी पाहायला मिळतात.

मूर्ती घडविणारी तिसरी पिढी
कुळाच्या गणपतीची मूर्ती ओटवणेचे प्रसिद्ध कलावंत चंद्रकांत मेस्त्री यांच्या चित्रशाळेत घडविली जाते. तत्कालीन (कै.) गंगाराम मेस्त्री, त्यानंतर सिद्धहस्त शिल्प-मूर्तिकार (कै.) अनंत मेस्त्री व त्यानंतर त्यांचे पुत्र आनंद मेस्त्री ही तिसरी पिढी त्यांचा वारसा पुढे चालवित आहे.
.............
त्रिवेणी संगमावर विसर्जन
कुळाच्या गणपतीचे विसर्जन सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेम सावंत भोसले यांच्या समाधी स्थळाजवळील तेरेखोल, गड व दाभील या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर करण्यात येते. कुळघर ते त्रिवेणी संगम, असा दीड किलोमीटरचा प्रवास पालखी मिरवणुकीने करण्यात येतो. एवढा लांबचा प्रवास असूनही वाहन वापरले जात नाही. गणपती बाप्पा पूजनाला आणताना किंवा विसर्जनाला नेतानाची धार्मिकताही वेगळीच आहे. विसर्जनासाठी पालखी स्वरुपात ढाचा तयार करून किंवा मूर्ती पालखीत बसवून खांद्यावरून विसर्जनाला न्यावी लागते, आजही ती नेली जाते. काहीवेळा वाहनाने नेण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रवासात अडचणी आल्याचे जाणकार सांगतात. विसर्जनावेळी ढोलताशांचा मराठमोळा साज रीतीरिवाजाप्रमाणे केला जातो.
--
नवसाला पावणारा गणपती
तत्कालीन गावप्रमुख (कै.) गुणाजी गावकर, त्यानंतर (कै.) बाबली गुणाजी गावकर (न्हानगो दादा) आणि आता रवींद्रनाथ बाबली गावकर अशा पिढ्या या गावाच्या गणपतीचे त्याच परंपरेने पूजन करीत आहेत. गावाचा म्हणजेच कुळाचा गणपती नवसाला पावणारा गणपती असल्याची येथील भाविकांची धारणा आहे. त्यामुळे गावातील प्रत्येकाच्या घरी आता बाप्पाचे पूजन झाले तरी न चुकता गावाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोक आतुरलेले असतात. एवढेच नव्हे, तर गावातील कुळाच्या परिसरातील येणारी भजन मंडळे भजनाची सुरुवात गावाच्या गणपतीपासूनच करतात. ही परंपरा आजही सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93912 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..