खेड ः सेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः  सेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल
खेड ः सेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल

खेड ः सेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल

sakal_logo
By

सेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस ब्लॅकमेल
रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. 6 ः एकनाथ शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम आता आक्रमक झालेले दिसत आहेत. शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून किती दिवस राज्याला ब्लॅकमेल करणार आहात, असा थेट सवालच रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला आहे. पहिल्यांदाच शिंदे गटातील एका मोठ्या नेत्याने थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्याचे चित्र आहे.

माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी जामगे येथे त्यांच्या निवासस्थानी बोलताना जोरदार हल्लबोल केला आहे. शिंदे यांचे समर्थन केलेल्या शिवसेना आमदारांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह त्यांचे समर्थक खोके खोके करून डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर ते म्हणाले, ‘मातोश्री’ला खोके नवीन नाहीत, मातोश्रीत किती मिठाईचे खोके गेले हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ज्याला कावीळ होते. त्याला सगळं जग पिवळं दिसतं. उद्धव ठाकरेंना जे काही मिळाले, ते शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मिळाले. आदित्य ठाकरेंना जे पक्षात, सत्तेत जे स्थान मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून मिळाले असल्याचे सांगत पक्ष संघटना कुणी वाढवली? असा सवाल कदम यांनी केला आहे. पक्ष संघटना आपल्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी वाढवली असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या आगामी महाराष्ट्र दौऱ्यावरही त्यांनी टीका केली आहे. त्यांच्या दौऱ्यानंतर आपणही राज्याचा दौरा करणार असल्याचे सांगत सत्य जनतेला कळेल, असेही कदम यांनी सांगितले. या वेळी त्यांनी रत्नागिरीचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावरही टीका केली.
कदम म्हणाले,‘उद्धव ठाकरे यांनी त्यांची भावनात्मक डायलॉगबाजी थांबवावी. सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का? राज्यातील सत्ता गेल्यानंतर आता उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत. आता जाणीव झाल्यानंतर सगळ्या शिवसेना नेत्यांच्या गाठीभेठी सुरू झाल्या आहेत. मग सत्तेत असताना गेली अडीच वर्षात काय झाले होते ? उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर आपणही राज्याचा दौरा करणार असल्याचे रामदास कदम यांनी जाहीर केले आहे. नेमके काय घडले आहे, ही वस्तुस्थिती राज्यातील जनतेला सांगणार आहेत.


चौकट
ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत
जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तेच स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, हे वास्तव महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे शरद पवार यांचे विचार आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा अधिकार शिंदे यांनाच आहे, असे रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

--------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y93965 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..