मालवण बसस्थानकाचा चार वर्षात केवळ चौथरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण बसस्थानकाचा चार वर्षात केवळ चौथरा
मालवण बसस्थानकाचा चार वर्षात केवळ चौथरा

मालवण बसस्थानकाचा चार वर्षात केवळ चौथरा

sakal_logo
By

48554
मालवण ः सद्य:स्थितीत बसस्थानकाचे केवळ चौथऱ्यापर्यंतचे झालेले काम.

48553
मालवण ः येथील बसस्थानकाची प्रस्तावित नवीन इमारत.
---

चार वर्षांत केवळ चौथऱ्याचेच काम

मालवण बसस्थानक; जुनी इमारत धोकादायक; उर्वरित निधी उपलब्धतेची गरज

प्रशांत हिंदळेकर ः सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ६ ः येथील बसस्थानकाच्या नव्या इमारतीसह अन्य सोयी-सुविधांसाठी चार वर्षांपूर्वी सुमारे ३ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर झाला; मात्र गेली तीन वर्षे बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या केवळ चौथऱ्यापलीकडे कोणतेही काम झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे काम केव्हा मार्गी लागणार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. ठेकेदारास कामाचे बिल अदा न केल्याने त्याने काम थांबविले आहे. परिणामी तीन वर्षे बसस्थानकाच्या इमारतीचे काम रखडले आहे. जुन्या बसस्थानकाची इमारत अत्यंत धोकादायक बनली असून प्रवाशांच्या जीवितास धोका आहे. नव्या इमारतीचे काम मार्गी लागण्यासाठी शासनाने आवश्यक निधी तत्काळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
तालुक्याच्या ठिकाणी १९८१ मध्ये बसस्थानकाची निर्मिती झाली होती. बसस्थानकाच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी २०१७ मध्ये शासनाकडे बसस्थानकाच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र भविष्यात पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पर्यटन राजधानी असलेल्या येथील बसस्थानक नव्याने बांधण्यासाठी नवीन प्रस्ताव शासनाला सादर केला. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे नवीन बसस्थानकासाठी ३ कोटी १५ लाखांचा निधी शासनाने मंजूर केला.
२०१९ मध्ये या बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले; मात्र तरीही या कामास सुरुवात झाली नाही. पालिका हद्दीतील हे काम असल्याने या कामास पालिका प्रशासनाची परवानगी मिळाली नव्हती. नव्या इमारतीचे काम सुरू करण्यापूर्वी बसस्थानकाच्या परिसरात ग्रामीण भागात सोडल्या जाणाऱ्या एसटी बसमधून जाणाऱ्या प्रवाशांसाठी असणारी छोटी पत्र्याची शेड पाडली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. बसस्थानकाच्या इमारतीचे काम रखडल्याने पंचायत समितीच्या सभेतही सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. यावेळी आमदार नाईक यांनी आगार व्यवस्थापकांसह, पालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. त्यानंतर पालिका प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर नवीन इमारतीच्या प्रत्यक्षात कामास सुरवात झाली.
बसस्थानकाच्या जीर्ण इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळून प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. त्यामुळे नव्या इमारतीचे काम तत्काळ सुरू करण्याच्या सूचना आमदार नाईकांनी आगार व्यवस्थापकांना दिल्या होत्या. त्यानुसार एसटी प्रशासन व संबंधित ठेकेदाराने नव्या इमारतीच्या कामास सुरवात केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत बसस्थानकाच्या इमारतीचे काही प्रमाणात काम सुरू झाले; मात्र कोरोना काळात हे काम पूर्णतः ठप्प झाले. बसस्थानकाच्या अस्तित्त्वात असलेल्या इमारतीच्या पाठीमागील जागेत नव्या इमारतीच्या कामास सुरवात झाली. यात केवळ चौथऱ्यापर्यंतच काम झाल्याचे दिसून येत आहे. तीन वर्षांत बसस्थानकाच्या इमारतीचे पुढील कामच न झाल्याने नवीन बसस्थानक केव्हा अस्तित्वात येणार, असा प्रश्‍न आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या कामाचे ठेकेदाराचे बिल शासनाने अदा न केल्याने हे काम रखडले असल्याचे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
.............
...तर अनेकांना मिळेल रोजीरोटी
या नवीन बसस्थानकाच्या आराखड्यात बसस्थानकाच्या तळमजल्यावर सहा फलाट, प्रवासी सभागृह, पुरुष व महिलांसाठी स्वच्छतागृह, प्रतीक्षा कक्ष, महिलांसाठी विश्रामगृह, हिरकणी कक्ष, दुकान गाळे, जेनरिक मेडिकल दुकान, पहिल्या मजल्यावर बसस्थानकाच्या कामकाजाची कार्यालये, दुसऱ्या मजल्यावर अद्ययावत ६० आसन क्षमतेच्या सिनेमागृहाचा समावेश केला आहे. त्यामुळे काम पूर्णत्वास गेल्यास अनेकांना रोजीरोटी मिळेलचच शिवाय तालुक्याची पर्यटनवृद्धी होईल. परिणामी तालुक्याचा विकास होईल.
--
48552
टाकीच्या पिलरना भेगा
जुन्या बसस्थानकाची इमारत जीर्ण झाली असून ती धोकादायक बनली आहे. इमारतीच्या स्लॅबचे भाग कोसळून काही प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. स्लॅबचे तुकडे अजूनही पडत असल्याचे दिसून येत आहे. जुन्या इमारतीवर असलेल्या पाण्याच्या मोठ्या टाकीच्या पिलरांना भेगा पडल्या असून पाण्याची ही टाकी केव्हाही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
..............
48555
विश्रामगृहाची दयनीय स्थिती
येथील बसस्थानकाच्या जुन्या इमारतीत लांबपल्ल्याच्या प्रवासी एसटी बसेस घेऊन येणाऱ्या एसटी चालक, वाहकांसाठी असलेल्या विश्रामगृहाची दयनीय अवस्था झाली आहे. स्वच्छतागृहात असलेल्या अस्वच्छतेबरोबरच दुर्गंधीमुळे या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे परजिल्ह्यातून येणाऱ्या चालक, वाहकांना काहीवेळा एसटी बसेसमध्ये विश्रांती घ्यावी लागत आहे. त्यामुळे नव्या बसस्थानकाच्या इमारतीचे काम लवकर मार्गी लागणे आवश्यक बनले आहे.
..............
कोट
मालवण बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाच्या आराखड्यात बदल करावा लागल्याने या कामास सुरवातीस विलंब झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी इमारतीचे काम सुरू झाले; मात्र शासनाकडून संबंधित ठेकेदाराचे पहिल्या टप्प्यातील कामाचे बिल न दिल्याने काम रखडले. याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधले आहे. सद्यःस्थितीत गणेशोत्सवानिमित्त जादा बसफेऱ्या सोडल्याने बसस्थानक परिसरात बसगाड्या लावल्या आहेत. त्यामुळे गणेशोत्सवानंतर या इमारतीच्या कामास पुन्हा सुरवात होईल. जुन्या इमारतीच्या ज्या धोकादायक पापड्या हटविण्यात येतील.
- अक्षय केंकरे, विभागीय स्थापत्य अधिकारी.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94151 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..