सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार
सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार

सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार

sakal_logo
By

टीपः swt७२६.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ -
मालवण ः वादळसदृश स्थितीमुळे मासेमारीस गेलेल्या नौका माघारी परतल्या.

सिंधुदुर्गात पुन्हा मुसळधार
झोड सुरूच; विजांमुळे भीती वाढली
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ७ ः जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. विजांच्या कडकडाटामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. पावसाचा जोर वाढत असून, जिल्ह्यात आज सकाळी दहापर्यत सरासरी ९०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने ११ तारखेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला. काल (ता. ६) जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला होता. वैभववाडीत अवघ्या ४५ मिनिटांत ९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती; परंतु दुपारी साडेतीनपासून विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागांना मुसळधार पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सह्याद्री पट्ट्यातील अनेक गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ले या सर्वच भागांत जोरदार सरी सायंकाळी उशिरापर्यत सुरू होत्या. विजांचा लखलखाट आणि त्यानंतर होणाऱ्या ढगांच्या गडगडाटामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
कणकवली तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. अनेक ठिकाणी गटारे तुंबून रस्त्यावर पाणी आले. नांदगाव परिसरात रस्त्यावर तुंबलेले पाणी घरांमध्ये घुसले. महामार्ग चौपदरीकरण करताना चुकीच्या पद्धतीने काम केल्याने हा प्रकार घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी एकत्र येत काही काळ महामार्गावरील वाहतूक रोखली.
सह्याद्री पट्ट्यात विजांच्या कडकडाटाचे प्रमाण अधिक होते. हवामान विभागाने ८ आणि ९ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा दिला असून, ११ सप्टेंबरपर्यंत ‘यलो अलर्ट’ आहे. समुद्रही खवळला असून, मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

समुद्रात वादळी वारे
मालवण ः प्रादेशिक हवामान विभागाने राज्याच्या किनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमारांना सतर्कतेचा व समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत माहिती आज सिंधुदुर्ग मत्स्य विभागास प्राप्त झाली. त्यानुसार मत्स्य विभागाने जिल्ह्यातील मच्छीमारांना खबरदारीचे आवाहन केले आहे.
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ११ सप्टेंबरपर्यत वादळी वारे वाहणार असून, वाऱ्यांचा वेग ६५ किलोमीटर प्रतितास पोचण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात किंवा खाडी क्षेत्रात जाऊ नये. नौका, जाळी व मासेमारी सामग्री सुरक्षित ठेवावी, असे आवाहन ‘मत्स्यव्यवसाय’च्या सहायक आयुक्तांनी केले आहे. समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली. मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित स्थळी नेण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94344 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..