तेरवण मेढे रस्त्याचे एक कोटी गेले कुठे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेरवण मेढे रस्त्याचे एक कोटी गेले कुठे?
तेरवण मेढे रस्त्याचे एक कोटी गेले कुठे?

तेरवण मेढे रस्त्याचे एक कोटी गेले कुठे?

sakal_logo
By

swt८३.jpg
L48914
तेरवण मेढे ः गावकऱ्यांनी श्रमदानातून बनवलेला तेरवण मेढे ते तेरवण रस्ता.

swt८४.jpg
48915
तेरवण मेढे ः तेरवण रस्त्याचे ठेकेदाराने ठेवलेले साईड कटिंगचे अर्धवट काम.

swt८५.jpg
48939
तेरवण ते तेरवण मेढे:एक कोटी रूपये खर्च होवूनही रस्त्याचे रुंदीकरण झालेलेच नाही

तेरवण मेढे रस्त्याचे
एक कोटी गेले कुठे ?
गावकऱ्यांचा प्रश्न ः काम अजूनही आहे अपूर्ण
प्रभाकर धुरी ः सकाळ वृत्तसेवा
साटेली भेडशी, ता. ८ ः तेरवण ते तेरवण मेढे रस्त्यासाठी मंजूर झालेले एक कोटी रुपये गेले कुठे? असा प्रश्न रस्त्याचे अपूर्ण काम बघून गावकरी विचारत आहेत. मुळात तो रस्ता स्वखर्च आणि श्रमदानातून गावकऱ्यांनी वाहतुकीस योग्य बनवला होता, तोच रस्ता आता ठेकेदाराकडून रुंद करण्यात आला आणि त्यावर एक कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जे काम गावकऱ्यांनी दोन-पांच लाखात केले, त्याच कामासाठी ठेकेदारांना एक कोटी रुपये लागतातच कशाला? असा प्रश्नही गावकऱ्यांच्या मनात आहे.
तेरवण ते तेरवण मेढे रस्ता तिलारी घाटाला पर्याय आहे. शिवाय त्या मार्गाने ऐतिहासिक पारगड किल्ला आणि वर्षा पर्यटन स्थळ असलेल्या आंबेलीला जाणे जवळ पडते. कोल्हापूरला जायचे असल्यास तो मार्गही सोयीस्कर आणि जवळचा आहे. शिवाय तेरवण आणि मेढे ही दोन गावे तेरवण मेढे या ग्रुप ग्रामपंचायतीशी आणि दोडामार्ग तहसीलशी जोडलेली आहेत. दोन्ही गावांमध्ये खूप मोठे अंतर आहे. तिलारी घाटातून जायचे झाल्यास वीस-पंचवीस किलोमीटरचा फेरा पडतो. शिवाय वेगवेगळ्या दोन गाड्या पकडून किंवा अव्वाच्या सव्वा पैसे मोजून खासगी गाडी करून तेरवण मेढे ग्रामपंचायत किंवा दोडामार्ग तहसील कार्यालयात यावे लागते. त्यामुळे मधला रस्ता डांबरी व्हावा, अशी दोन्ही गावच्या गावकऱ्यांची मागणी होती. जंगल भागातील वाटेने गावकरी यायचे. धार्मिक उत्सवावेळी देवही आणले जायचे. त्यामुळे तत्कालीन वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे रस्त्याची मागणी लावून धरण्यात आली. तत्पूर्वी तत्कालीन प्रभारी सरपंच प्रवीण गवस आणि अन्य गावकऱ्यांनी मध्ये वनविभागाची जमीन लागत असल्याने त्यांना तो रस्ता फार पूर्वीपासून कस्टम रस्ता आहे, हे दर्शवणारी कागदपत्रे सादर करून रस्त्याच्या मंजुरीचा मार्ग सुकर केला.
............
गावकऱ्यांनी २०१६ मध्येच बनवला रस्ता
गावकरी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी स्वखर्चाने आणि श्रमदानातून जवळपास साडेसहा किलोमीटरचा रस्ता आवश्यक तिथे सिमेंट पाईप टाकून, रस्त्यासाठी खोदाई व सपाटीकरण करून वाहतुकीस योग्य बनवला. त्यासाठी चार ते पाच लाख रुपये खर्चही केले. ६ ऑक्टोबर २०१६ ते ५ डिसेंबर २०१६ या दोन महिन्यांत त्यांनी रस्ता बनवला आणि चारचाकी वाहनांची ये-जा सुरु झाली.
गावकऱ्यांनी तब्बल दोन महिने राबून रस्ता बनवला आणि येण्याजाण्याचा मार्ग मोकळा केला असला, तरी तो रस्ता डांबरी होण्यासाठी शासकीय निधीची गरज होती. ती गरज शिक्षण व पर्यावरण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी पूर्ण केली. जिल्हा नियोजनमधून त्यांनी मातीकामासाठी एक कोटी रुपये दिले. त्यानंतर त्यांनी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही केले. रस्त्याच्या कामाला दोघा ठेकेदारांनी काम विभागून घेऊन सुरुवात केली. त्यात खोदाई, रस्त्याचे रुंदीकरण, मोऱ्यांची कामे, भराव घालणे आदी कामांचा समावेश होता. प्रत्यक्षात त्या ठेकेदारांना त्या रस्त्याचे काम आधीच गावकऱ्यांनी बऱ्यापैकी पूर्ण केलेले असल्याने फायदेशीर ठरले. असे असले तरी अद्याप अनेक ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण आहेत; मात्र जीएसटी वगळता जवळपास सगळीच रक्कम ठेकेदारांना अदा केल्याची माहिती मिळाली.

चौकट
गावकऱ्यांना ठेंगा
गावकऱ्यांनी रस्त्याचे काम पूर्वीच केल्याने कोट्यवधीचा रस्ता करणाऱ्या ठेकेदाराला काम करणे खूप सोपे झाले. एक कोटी रुपये निधी आल्याने साहजिकच पदरमोड करणाऱ्या गावकऱ्यांना आपले पैसे संबंधित ठेकेदारांनी द्यावेत असे वाटते. तसे त्यांनी त्यांनी बोलूनही दाखवले आहे; मात्र त्यांनी गावकऱ्यांना ठेंगा दाखवल्याचे समजते.

चौकट
रस्त्यावर आधी पाच लाख खर्च
मोरीसाठीचे १२ पाईप वाहतूक व खोदकाम करून पाईप टाकण्यासाठी दीड लाख रुपये, २७९ तास जेसीबी वापरला त्यासाठी दोन लाख ऐंशी हजार खर्च असे एकूण ४ लाख ३० हजार रुपये खर्च झाले. शिवाय इतर खर्च आणि अंगमेहनत वेगळी. ती रक्कम गावकऱ्यांनी आपली परवड संपावी म्हणून काढली असली तरी, ठेकेदारांनी नैतिकता म्हणून त्यांना त्यातील काही रक्कम तरी परत द्यायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोट
अनेक अडचणींतून मार्ग काढत आम्ही रस्ता बनवला होता. दोन महिन्यांत आम्ही तो रस्ता कोल्हापूर-चंदगड-पारगड आणि कोल्हापूर-पणजी मार्गाला जोडला होता. सगळ्या गावकऱ्यांच्या एकीमुळे ते शक्य झाले; पण ठेकेदारांनी केलेल्या कामाचा दर्जा तपासण्याची आणि अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्याची गरज आहे.
- मायकल लोबो, ग्रामपंचायत सदस्य, तेरवण मेढे

कोट
तेरवण ते तेरवण मेढे रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरणासाठी शिक्षण व पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी किती रुपये लागतील याबाबत विचारणा केली होती. या रस्त्यासाठी किमान साडेतीन कोटी रुपये लागणार आहेत. नाबार्ड अथवा डीपीडीसीमधून तो निधी मंत्री केसरकर उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. शिवाय एक कोटी रुपयांमधील जीएसटी वगळता ८ ते १० लाख रुपये शिल्लक आहेत.
- अमित कल्याणकर, शाखा अभियंता

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94445 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..