सदर ः मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदर ः   मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने
सदर ः मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने

सदर ः मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने

sakal_logo
By

(आधुनिक मत्स्यपुराण ...............लोगो)

rat8p15.jpg ःKOP22L48953 डॉ. बी. एम. यादव


इंट्रो

मासे सहज पचण्यायोग्य प्रथिनांचा समृद्ध स्त्रोत आहे. मासळीपासून मानवी पोषणासाठी जीवनसत्वे, खनिजे इत्यादी सहज उपलब्ध होतात. मासा हा जलद खराब होणारा नाशवंत खाद्यपदार्थ आहे. मासळीची गुणवत्ता व त्याचे पौष्टिक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी मासळीची योग्य हाताळणी आणि संरक्षणाची आवश्यकता असते. मासळीची गुणवत्ता आणि टिकावूपणा वाढवण्यासाठी मासळीवर प्रक्रिया केली जाते व त्यामध्ये अन्न संरक्षणाच्या तंत्राचा वापर केला जातो.

डॉ. बी. एम. यादव

मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने

मासे टिकवण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात जसे की, बर्फ किंवा अतिशीत तापमान नियंत्रणावर आधारित तंत्रे, मासळीच्या शरीरातील पाण्याच्या क्रियेवरील नियंत्रण ज्यात सुकवणे आणि खारवणे समाविष्ट आहे. मासे टिकवण्यासाठी बऱ्याचदा वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला जातो. मासेमारी करताना पकडल्या जाणाऱ्या एकूण मासळीपैकी कमी किमतीच्या मासळीचे प्रमाण अधिक असते. अशा कमी किमतीच्या मासळीचा पुरेपूर वापर करणे गरजेचे आहे. यांत्रिक मशिनद्वारे कमी किमतीच्या मासळीचे मांस व काटे वेगळे करून मिळणारे मत्स्य मांसपासून (ज्याला सुरमी म्हणतात) मूल्यवर्धित पदार्थांची निर्मिती करता येते. अशाप्रकारे तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मुख्यत: फिश कटलेट, फिश शेव आणि फिश वडा, फिश पापड, शेव, चकली, वेफर्स, न्यूडल्स इत्यादी विविध प्रकारचे मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी आधारभूत सामग्री म्हणून सुरमी वापरली जाते.

सूरमी बनवण्याची साधीसोपी पद्धत

घरच्या घरी सुरमी बनवण्यासाठी मासे व्यवस्थित धुऊन साफ करून घ्यावेत आणि साधारण 30 मिनिटे शिजवावेत. मासे व्यवस्थित शिजलेत की नाहीत, याची खात्री करण्यासाठी त्याचे थोडे मांस काढून बघावे. शिजवलेले मासे थंड झाल्यावर काटे, कातडी वेगळे करून फक्त मांस मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने तयार करण्यासाठी उपयोगात आणले जाते. त्या मांसामध्ये हळद, मीठ, मसाले इत्यादी पदार्थ वापरून त्यापासून वेगवेगळे मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने घरच्या घरी तयार करता येतात. मासळीच्या कोणत्याही प्रजातीपासून सुरमी बनवता येऊ शकते; परंतु जेव्हा ते कमी किमतीच्या मासळीपासून सुरमी बनवली जाते. तेव्हा त्याचे मूल्यवर्धन जास्त होते. कमी मागणी असलेल्या मासळीपासून चांगली मागणी असणारी अनेक उत्पादने तयार करण्यासाठी आधार सामग्री म्हणून सुरमी वापरता येते.

सुरमी आणि सुरमी आधारित मूल्यवर्धित मत्स्य उत्पादने ः
मासळीची त्वचा, काटे आणि इतर अवयव वेगळे करून फक्त मांस वेगळे केले जाते व त्यापासून विविध प्रकारचे मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. मूल्यवर्धित मत्स्यपदार्थामध्ये सुरमी हा मुख्य घटक असतो. सुरमीपासून बनवलेल्या शेल-फिश-अ‍ॅनालॉग उत्पादनांना (जसे की क्रॅब क्लोव, क्रॅब स्टिक) देशांतर्गत व परदेशामध्ये चांगली मागणी आहे. सुरमीपासून बनवलेल्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने मस्त्यवडा, मस्त्यकचोरी, मस्त्यशेव, मस्त्यचकली, मस्त्यपापड, मस्त्यवेफर्स, फिश कटलेट, फिश बॉल इत्यादी पदार्थाचा समावेश होतो.

कोटेड मत्स्यपदार्थ ः
ग्राहक वेळ वाचवण्यासाठी पारंपरिक ताज्या अन्नाचा अधिक चांगला पर्याय शोधत आहेत. त्यामुळे रेडी टू ईट कोटेड मत्स्य पदार्थांना सध्या मोठी मागणी आहे. कोटेड मत्स्य पदार्थ त्यांच्या सुंदर दिसण्यामुळे, पौष्टिक मूल्य आणि स्वाद यामुळे ग्राहकांच्या पसंतीला येत आहेत. कोटिंगचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पदार्थाच्या आकारात वाढ होते व पदार्थ आकर्षक दिसतो. कोटिंगमधील प्रत्येक घटक मत्स्य पदार्थाची कार्यक्षमता आणि वैशिष्ट्ये विकसित करण्यात महत्वाची भूमिका प्रदान करतो. कोटेड मत्स्यपदार्थ तयार करण्यासाठी मुख्यत: सुरमी, पीठ, पाणी, कॉर्न स्टार्च (मका पीठ), ब्रेड क्रम्ब्स आणि चववर्धक घटक/मसाले इत्यादीचा समावेश असतो. कोटेड मत्स्यपदार्थामध्ये प्रामुख्याने कोटेड कोळंबी, कोटेड म्हाकूळ, फिश फिलेट, क्रॅब क्लोव, फिश बॉल, फिश कटलेट, फिश फिंगर इत्यादी पदार्थाचा समावेश होतो.

मत्स्य-कोळंबी-शिंपले लोणचे
मासे, कोळंबी तसेच शिंपल्यापासून लोणचे बनवणे सहज शक्य आहे. मासे, कोळंबी व शिंपल्याचे लोणचे हे लोक जेवणामध्ये रूचकर चवीकरिता सर्रास वापरतात व अशा प्रकारचे लोणचे बनवण्याची पद्धत सहज व सोपी आहे व त्याकरिता महागड्या उपकरणांची तसेच मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता नाही. ग्रामीण भागातील लोक अशा प्रकारचे लोणचे सहजपणे बनवून त्याचा व्यापार करू शकतात.
अशाप्रकारे मासे व मासळीच्या मांसापासून विविध मत्स्य पदार्थ बनवून त्याची विक्री केल्यास मूल्यवर्धन होऊन त्यापासून मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगाराच्या संधी आणि अर्थार्जनाचे साधन उपलब्ध होऊ शकतात.
( लेखक मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे सहयोगी प्राध्यापक आहेत )

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94543 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..