अखेर सदानंद चव्हाण यांनी शिवबंधन तोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

former shiv sena mla sadanand chavan join shinde group politics
सदानंद चव्हाण यांनी शिवबंधन तोडले

अखेर सदानंद चव्हाण यांनी शिवबंधन तोडले

चिपळूण : माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी अखेर शिवबंधन तोडले. आज त्यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या गटाला पाठिंबा दिला. यावेळी उद्योगमंत्री उदय उपस्थित होते. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा ते निवडून आले होते. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी २००४ मध्ये पक्ष सोडल्यानंतर चिपळूणमध्ये संपलेली शिवसेना मी उभी केली, असा दावा ते वारंवार करत होते. मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सदानंद चव्हाण सक्रिय राजकारणापासून दूर होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चिपळूण विधानसभा मतदारसंघावरील त्यांची पकड ढिली झाली होती. राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे दिवसेंदिवस वर्चस्व वाढत होते, परंतु महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे ते शांत होते.

संघटनेच्या बैठकांसाठी आणि कार्यक्रमासाठीही त्यांना डावलले जात असल्यामुळे ते नाराज होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदारांना घेऊन भाजपबरोबर हात मिळवणी केली आणि राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर चिपळूणमध्ये शिवसैनिकांनी तातडीची बैठक घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी सदानंद चव्हाण संघटनेबरोबर होते, मात्र नंतरच्या काळात चक्रे फिरली आणि सदानंद चव्हाण यांनी स्वतंत्र बैठक घेऊन पक्ष संघटनेवरील आपली नाराजी बोलून दाखवली. त्याचवेळी सदानंद चव्हाण हे पक्षावर आणि नेतृत्वावर नाराज असून, ते शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर आज त्यांनी शिवबंधन तोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके, उपतालुकाप्रमुख अभय सहस्त्रबुद्धे, अनंत पवार, युवकचे माजी तालुकाप्रमुख संदेश आयरे, विभागप्रमुख बळीराम चव्हाण, अनारीचे सदाभाऊ पवार आदी निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.

सदानंद चव्हाण दहा वर्षे आमदार होते. पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला, असे काही घडले नाही. महाराष्ट्रामध्ये माजी आमदार भरपूर आहेत. सदानंद चव्हाण शिंदे गटात का गेले, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
- सचिन कदम जिल्हाप्रमुख शिवसेना

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आगामी काळात चिपळूण मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने मी त्यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघासाठी ते निधी देणार असतील, तर माझा त्यांना पाठिंबा आहे, असे मी त्यांच्याशी बोललो आहे. पुढील दोन वर्षांत चिपळूणसाठी जास्तीत जास्त निधी आणून विकासकामे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
- सदानंद चव्हाण, माजी आमदार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y94658 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..