पान एक-मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूरस्थिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूरस्थिती
पान एक-मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूरस्थिती

पान एक-मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गात पूरस्थिती

sakal_logo
By

49535
बांदा ः आळवाडी येथे रविवारी तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने परिसर जलमय झाला होता.

संततधारेने जिल्ह्यात पूरस्थिती
तेरेखोलचे पाणी बांद्यात शिरल्याने तारांबळ; अनेक मार्गांवर पाणी

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ११ ः जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आज पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नद्यांनी पूररेषा ओलांडली. माणगाव खोऱ्यातील आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने २७ गावांचा संपर्क तुटला; तर तेरेखोल नदीचे पाणी बांदा शहरात शिरल्याने तारांबळ उडाली. अनेक मार्ग पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. शेकडो एकर भातशेती पुराच्या पाण्याखाली गेली. पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे; मात्र शनिवारी (ता. १०) रात्री आठपासून जिल्ह्यात संततधार पावसाला सुरुवात झाली. सरींवर सरी कोसळत असल्यामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहत होते. जिल्ह्यातील तेरेखोल, गड, शुक, शांती, निर्मला, पीठढवळ, हातेरी या नद्या धोक्याच्या पातळीवर पोचल्या होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. काही गावांचा देखील संपर्क तुटला होता.

कुडाळ तालुक्याला फटका
पावसाचा सर्वाधिक फटका कुडाळ तालुक्याला बसला. कुडाळ तालुक्यातील आंबेरी पूल आज पहाटेपासूनच पाण्याखाली गेल्यामुळे या भागातील २७ गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला होता. या मार्गावरील वाहतूक चार ते पाच तास पूर्णतः ठप्प होती. दरम्यान सायंकाळी पाणी ओसरू लागल्याने या गावांचा सोमवारी सकाळपर्यंत संपर्क पूर्ववत होण्याची शक्यता आहे. भंगसाळ नदीचे पाणी देखील पात्राबाहेरून वाहत होते. पुराचे पाणी अनेक बागायतींमध्ये शिरले. शेकडो एकर भातशेतीमधून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. माणगाव खोऱ्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. कुडाळ रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील पुराचे पाणी होते. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. याच तालुक्यातील काळप नाका परिसरात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. कुडाळ गुलमोहर हॉटेल ते नवीन एसटी बस स्थानक मार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कुडाळ तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते.

वैभववाडी तालुक्यालाही झोडपले
वैभववाडी तालुक्याला देखील पावसाने झोडपून काढले. शनिवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. वैभववाडी-उंबर्डे मार्गावरील एडगाव तिठ्यावर झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प होती. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, देवगड भागातही जोरदार पाऊस झाला. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. तेरेखाल आणि तिलारी या दोन नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

पावसाचा जोर गुरुवारपर्यंत
जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या काही भागात आज अतिवृष्टी झाली. दरम्यान, मंगळवारी (ता. १३) काही ठिकाणी अतिमुसळधार, तर बुधवार (ता. १४) आणि गुरुवारीही (ता. १५) मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95205 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..