प्रवासी रेल्वेगाड्या आता विद्युत इंजिनावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रवासी रेल्वेगाड्या आता विद्युत इंजिनावर
प्रवासी रेल्वेगाड्या आता विद्युत इंजिनावर

प्रवासी रेल्वेगाड्या आता विद्युत इंजिनावर

sakal_logo
By

(धूरमुक्त रेल्वेचे चित्र वापरा)


प्रवासी रेल्वेगाड्या आता विद्युत इंजिनावर

‘कोरे’चा प्रदूषणमुक्त प्रवास; ‘तुतारी’ १५ पासून; ‘कोकणकन्या’ २० पासून धावणार

कणकवली, ता.१२ : कोकण रेल्‍वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाले होते. त्‍यानंतर जूनपासून सर्व मालगाड्या विद्युत इंजिनासह धावण्यास सुरवात झाली. त्‍यानंतर आता १५ सप्टेंबर पासून टप्पाटप्प्याने प्रवासी गाड्याही विद्युत इंजिनासह धावणार आहेत. यात सावंतवाडी-दादर तुतारी एक्‍स्प्रेस १५ सप्टेंबर पासून तर कोकणकन्या एक्‍स्प्रेस २० सप्टेंबरपासून धावणार आहे. तर डिसेंबर २०२२ पर्यंत सर्व प्रवासी गाड्या विद्युत इंजिनावर धावण्याचे नियोजन रेल्‍वेने केले आहे. त्‍यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त प्रवासाच्या अध्यायासाठी सज्ज झाल्या आहेत.
कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकर या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले तरी प्रवासी गाड्यांना विद्युत इंजिन बसविले नव्हते. फक्‍त रत्‍नागिरी ते दिवा आणि दिवा ते रत्‍नागिरी हीच एकमेव प्रवासी गाडी विद्युत इंजिनावर धावत होती. विद्युतीकरणाच्या कामापैकी सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या सबस्टेशनची कामे पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे प्रवासी रेल्वेगाड्या विजेवर चालवण्याचे नियोजन रेल्वेला लांबणीवर टाकावे लागले होते. मात्र आता या कामातील रत्नागिरी येथील टीएसएस (ट्रॅक्शन सबस्टेशन) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने रेल्वेने दिनांक १५ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विजय वर चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकण रेल्‍वे मार्गावरून जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस १५ ऑक्टोबरपासून तर मत्स्यगंधा आणि मुंबई- मेंगलोर एक्सप्रेस १ जानेवारी २०२३ पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. याखेरीज या संदर्भात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई सीएसटी ते करमाळी दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस १५ ऑक्टोबर २०२२ पासून विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे.
--
टप्पानिहाय कार्यक्रम असा
प्रवासी रेल्वे गाड्या विजेवर चालवण्याच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार १५ सप्टेंबरपासून दादर- सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस तसेच मंगला एक्सप्रेस विद्युत इंजिनसह धावणार आहेत. त्यापाठोपाठ मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेस, नेत्रावती एक्‍सप्रेस तसेच दिवा -सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस या प्रवासी गाड्या दिनांक २० सप्टेंबरपासून विद्युत इंजिनसह चालवल्या जाणार आहेत. मडगाव ते रत्नागिरी या मार्गावर धावणारी गाडी देखील १५ सप्टेंबरपासून विजेवर जाणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95295 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..