काजू बागायतींवर गव्यांचे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काजू बागायतींवर गव्यांचे संकट
काजू बागायतींवर गव्यांचे संकट

काजू बागायतींवर गव्यांचे संकट

sakal_logo
By

49643
सोनुर्ली : गव्यांनी काजू कलमांचे केलेले नुकसान.

काजू बागायतींवर गव्यांचे संकट

कलमांची नासधूस; सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी हैराण

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः तालुक्यात गव्यांकडून काजू कलमांची मोठ्या प्रमाणात नासधूस सुरू आहे. चरण्यासाठी काजू बागायतीत येणारे गवे आपले अंग खाजविण्यासाठी काजूच्या झाडांचा उपयोग करतात. यात त्यांच्या शिंगांमुळे झाडे मोडण्याचे प्रकार होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
तालुक्यात काजू लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. यामध्ये दरवर्षी वाढच होत आहे. खुल्या माळरानावर किंवा भरडी जमिनीत ही बागायती केली जाते. बरेच शेतकरी भातशेतीबरोबरच काजू बागायतीकडे आर्थिक स्रोत म्हणून पाहत आहेत; मात्र बागायतींसमोर गव्यांचे संकट निर्माण झाले आहे. बागायतीमध्ये वाढलेले गवत लक्षात घेता रात्रीच्या वेळी अशा बागायतीमध्ये चरण्यासाठी येणाऱ्या गव्यांकडून काजू कलमांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जाते. कळपांमध्ये पूर्ण वाढ झालेल्या गव्यांचा समावेश असून दोन चार वर्ष मेहनतीने वाढविलेली कमले व त्यासाठी केलेला खर्च क्षणार्धात वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यात गव्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या गव्यांकडून भातशेतीचे होणारे नुकसानही खुप मोठे असते. बदल्यात शासनाकडून मिळणारी भरपाई मात्र तुटपुंजी असते. त्यामुळे या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठविणेही आता कमी केले आहे. गावागावात हीच परिस्थिती आहे. असे असले तरी भातशेती आणि काजू बागायत यांच्यात मोठी तफावत असल्याने गव्यांकडून होणारी काजूच्या झाडांची नासाडी शेतकरी, बागायतदारांना पाहवत नाही. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एका काजूच्या झाडाची पूर्ण वाढ होण्यासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च येतो; मात्र गव्यांकडून ही मेहनत एका रात्रीत वाया घालविली जाते. सद्यस्थितीत चाऱ्याच्या कमतरतेमुळे बागायतीमध्ये वाढलेल्या चाऱ्यावर ताव मरण्यासाठी हे गवे बागायतीमध्ये घुसतात. कंपाऊंड तोडून बागायतीत घुसतात.
---
शासनाचे ‘कागदी खेळ’
चरत असतानाच अंगाला चावणाऱ्या माशांपासून संरक्षण करण्यासाठी गवे काजूच्या झाडांना अंग घासतात. त्यामुळे झाडाच्या फांद्या मोडतात. एकदा झाड मोडले की त्याला पुन्हा उभारी मिळत नाही. सद्यस्थितीत अशी परिस्थिती तालुक्यात ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. गव्यांकडून होणारी ही हानी मोठी आहे. शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन दिले जाते; पण शासनाच्या ‘कागदी खेळा’मुळे बऱ्याच शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे वनविभागाने नुकसान भरपाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95348 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..