आधी हकालपट्टी, की राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधी हकालपट्टी, की राजीनामा
चिपळूण-आधी हकालपट्टी की राजीनामा

आधी हकालपट्टी, की राजीनामा

चिपळूण : शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात सामील होत असल्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर येथील शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सलग बैठका सुरू आहेत. यामध्ये शिवसैनिकांकडून शिंदे गटात जाणाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे. त्याचवेळी आमदार चव्हाण यांचे समर्थन करणाऱ्या कार्यकर्त्यांमधून आधी राजीनामा देण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे आधी हकालपट्टी की आधी राजीनामा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट निर्माण झाल्यानंतर त्याचे पडसाद जिल्ह्यात सर्वत्र उमटू लागले आहेत. त्यातच उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार योगेश कदम शिंदे गटात सामील झाल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फूट पडू लागली आहे.

आता चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर आपल्या या निर्णयात चिपळूणची ८० टक्के शिवसेना सामील असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे चिपळूण शिवसेनेला फार मोठा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सलग दोन दिवस बैठका सुरू आहेत. या बैठकीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आमदार चव्हाण यांचे समर्थन करणाऱ्यांची हकालपट्टी करावी, असा सूर उमटू लागला आहे. त्याचवेळी शिंदे गटात इच्छुक असणाऱ्यांमध्येही आधी राजीनामा देण्याचा विचार केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता दोन्हींच्या चढाओढीत पहिलं पाऊल कोण टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत माजी आमदार चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. विशेषतः चिपळूण शहरातून व ग्रामीण भागातूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला तर शिवसेनेला ते त्रासदायक ठरू शकते. त्यासाठी जिल्हाप्रमुख सचिन कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम व त्यांचे अन्य सहकारी त्या त्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यासाठी दोन दिवसांत दोन बैठकाही झाल्या. १६ सप्टेंबरला शिवसेनेचे युवानेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे हे कोकण दौऱ्यावर येत असल्याने त्याचीही तयारी सुरू केली आहे.

युवासेना शिवसेनेच्याच पाठीशी
चिपळूण युवासेनेची रविवारी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत युवासेना शिवसेनेच्याच पाठिशी राहणार असल्याचा निर्धार केला गेला; मात्र या बैठकीला निम्म्याहून अधिक पदाधिकारी अनुपस्थित होते. या वेळी तालुका युवासेना अधिकारी उमेश खताते यांनी स्पष्ट केले की, चिपळूण युवासेना कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीसोबत ठामपणे उभी आहे. आज आम्हाला ओळख भेटली, नाव भेटलं ते फक्त शिवसेना या चार शब्दांमुळे आणि मातोश्री आमचं मंदिर आहे. आज आमचा देव अडचणीत आहे, अशावेळी आम्ही सर्वजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95416 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..