सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांची गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhudurg District
आठही गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांची गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त

ओरोस - शालेय शिक्षण मंत्र्यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात आठही तालुक्यांची गटशिक्षणाधिकारी पदे रिक्त आहेत. याचा शिक्षण विभागाच्या कामकाजावर परिणाम होत आहे. सर्व तालुक्यांचा कारभार प्रभारींच्या हाती आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा हा दहावी, बारावी निकालात गेली आठ वर्षे राज्यात अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे राज्यात एक प्रकारे सिंधुदुर्ग पॅटर्न तयार झाला आहे. जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आहेत. या आठही पंचायत समित्यांना स्वतंत्र गटशिक्षणाधिकारी ही पदे मंजूर आहेत; मात्र सध्या या पदांचा कारभार प्रभारींच्या हाती आहे. कारण आठही तालुक्यांना गटशिक्षणाधिकारी पदे भरलेली नाहीत. ही बाब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खच्चीकरण करणारी आहे; मात्र यावर जिल्ह्यातील आमदार, खासदार आवाज उठविताना दिसत नाहीत. ही पदे भरली जावीत यासाठी साधा प्रयत्न होताना दिसत नाही.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला अ वर्गातील प्राथमिक शिक्षणाधिकारी हे एक पद मंजूर आहे. ते पद सध्या भरलेले आहे; परंतु ‘ब’ वर्गातील दोन उपशिक्षणाधिकारी, एक अधीक्षक, लेखाधिकारी एक, आठ गटविकास अधिकारी आणि शालेय पोषण आहारसाठी अधीक्षक ही सात पदे मंजूर आहेत. एकूण ‘ब’ वर्गामध्ये १९ पदे मंजूर आहेत. यातील लेखाधिकारी हे एकमेव पद भरलेले आहे. उर्वरित १८ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे यातील आठही तालुक्यांना गटशिक्षणाधिकारी ही पदे भरलेली नाहीत. तालुक्याच्या शिक्षण विभागाला कॅप्टन नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाचा गाढा हाकताना तारेवरची कसरत सुरू आहे.

प्राथमिक शिक्षण व्यवस्था खिळखिळी

एकीकडे जिल्हा शिक्षणात अग्रेसर असल्याचे आपण छाती ठोकपणे सांगत आहोत. गेली आठ वर्षे सातत्याने दहावी, बारावी निकालात सिंधुदुर्ग राज्यात अग्रेसर असल्याचे आपण म्हणत आहोत; मात्र याचा पाया तयार करणारी प्राथमिक शिक्षण व्यवस्था खिळखिळी बनलेली आहे. त्याबाबत ब्र सुद्धा काढला जात नाही. बरे ही पदे अलीकडे रिक्त झालेली नाहीत. काही ठिकाणी २०१५ पासून गटशिक्षणाधिकारी नाहीत. याच्यावरून अंदाज येतो की राज्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदे भरण्याबाबत संवेदशीलता नाही.

...तरच मंत्रिपदाचा जिल्ह्याला फायदा

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचे धोरण स्वीकारले आहे. जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाईल, असे वक्तव्य केले आहे; मात्र ते ज्या जिल्ह्याचे आमदार आहेत, त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. त्याबाबत त्यांनी प्रथम संवेदनशील राहिले पाहिजे. धोरण बदलले तरी त्याची अंमबजावणी करणारी यंत्रणा नसेल तर त्यांचे हे नवीन धोरण त्यांच्याच जिल्ह्यात अयशस्वी ठरण्याची भीती आहे. त्यामुळे मंत्री केसरकरांनी जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. तरच त्यांच्या मंत्रीपदाचा खरा फायदा जिल्ह्याला होण्यास सुरुवात झाली, असे म्हणता येईल.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील वर्ग ब आणि वर्ग क रिक्त असलेल्या पदांची माहिती प्रत्येक महिन्याला शासनाला कळविली जाते. ही भरती थेट शासनाकडून होत असते. शासनाने पदे भरली नसल्याने ही पदे रिक्त आहेत.

- महेश धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

गटशिक्षणाधिकारी रिक्त पदे

तालुका रिक्त पद कालावधी

कणकवली १ जानेवारी २०१६ पासून

सावंतवाडी ५ ऑगस्ट २०१७ पासून

मालवण १ डिसेंबर २०१८ पासून

देवगड १७ मार्च २०१९ पासून

कुडाळ २३ मार्च २०१८ पासून

वेंगुर्ले ३० जून २०१५ पासून

वैभववाडी १ जून २०२० पासून

दोडामार्ग १९ जून २०१५ पासून

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95626 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..