चिपळूण - सदानंद चव्हाण यांच्या बंडखोरीमागे मतलबी किनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - सदानंद चव्हाण यांच्या बंडखोरीमागे मतलबी किनार
चिपळूण - सदानंद चव्हाण यांच्या बंडखोरीमागे मतलबी किनार

चिपळूण - सदानंद चव्हाण यांच्या बंडखोरीमागे मतलबी किनार

sakal_logo
By

KOP18H39839

सदानंद चव्हाणांच्या बंडखोरीला मतलबी किनार

भाजपच्या बळावर लढण्याची संधी; विकासकामांना प्राधान्य
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १३ ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर चिपळूणच्या राजकारणातून माजी आमदार सदानंद चव्हाण बाजूला फेकले गेले होते. आगामी काळात दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी होईल किंवा नाही हे अस्पष्ट असले तरी सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी होणार हे निश्चित आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय धोका लक्षात घेऊन सदानंद चव्हाण हे शिंदे गटात गेले. त्यांनी शिवसेना सोडण्याला मतलबी किनार असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली. त्याला सेनेच्या ४० आमदारांनी पाठिंबा दिला. यातील बहुतांशी आमदार ‘ईडी’च्या कारवायांना घाबरून शिंदे गटात गेल्याचे सांगितले जाते; मात्र सदानंद चव्हाण यांनी तालुकाप्रमुख आणि आमदारकीच्या काळात फारसे काही कमावले नाही. त्यामुळे त्यांच्यावर ईडीची कारवाई होण्याचा प्रश्नच नाही. चव्हाण यांनी तीन निवडणुका लढवल्या. पहिल्या निवडणुकीपासून त्यांनी लग्न, मुंज, बारशापासून अखंड हरिनाम सप्ताहाला हजेरी लावून कार्यकर्ते जमवले. सार्वजनिक मंडळे आणि धार्मिक स्थळे उभारणीसाठी आर्थिक देणगी देत प्रत्येकाला आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले शिवसेनेचे विद्यमान नेते भास्कर जाधव यांनी आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी चव्हाण यांना पडद्यामागून मदत केली. त्यामुळे चव्हाण आमदार झाले. आमदार शेखर निकम यांच्या विरोधात ते पहिली निवडणूक जिंकले; मात्र दुसऱ्या निवडणुकीत निकम मोठ्या ताकदीने उतरले त्यामुळे चव्हाण यांचा पराभव झाला.
शिवसेना आणि राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीत आघाडी झाली तर चिपळूणची जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यामुळे आमदार निकम यांना पुन्हा संधी मिळेल आणि चव्हाण यांना माजी आमदार म्हणून रमेश कदम यांच्यासारखे निकम यांचे काम करावे लागण्याची शक्यता आहे, हे लक्षात घेऊन सदानंद चव्हाण सक्रिय झाले. भविष्यात आघाडीला शिंदे गट आणि भाजपचा पर्याय असेल.
मुख्यमंत्री शिंदे गट आणि भाजपकडे चिपळूणमध्ये सक्षम उमेदवार नाही. सदानंद चव्हाण महाविकास आघाडीसाठी पर्याय ठरू शकतात. शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत मतदार संघातील विकासकामांना प्राधान्य मिळेल, या अपेक्षेने त्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याची चर्चा आहे.

चौकट
ठेकेदार कंपनीसह अधिकाऱ्यांवर ठपका
२२ जणांचे बळी घेणाऱ्या तिवरे धरणाचे काम सदानंद चव्हाण यांच्या खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनीने केले होते. तिवरे धरण फुटल्यानंतर या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीचा अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर झाला आहे. त्यात ठेकेदार कंपनीसह अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
.....................
कोट
मी इतके वर्ष राजकारणात आहे. संघटना कशी उभी केली, हे सर्वांना माहित आहे. तरीही संघटनेसाठी माझे योगदान काहीच नाही, असे जर कोणी बोलत असेल तर मी जनमत आजमावण्यासाठीच मैदानात उतरलो आहे. मतदार आणि कार्यकर्त्यांची चांगली साथ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- सदानंद चव्हाण, माजी आमदार चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95651 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..