गुणकारी हळद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुणकारी हळद
गुणकारी हळद

गुणकारी हळद

sakal_logo
By

37869
गुणकारी हळद

लीड
हळद हे भारतातील मसाला पीक वर्गातील प्रमुख नगदी पीक आहे. भारतात फार पूर्वीपासून हळदीची लागवड केली जाते. हळदीला पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि औषधी महत्त्व आहे.
- डॉ. विलास सावंत, शास्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस
--------
महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, नांदेड, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड केली जाते. हळदीची लागवड इतर जिल्ह्यांमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात केली जाते. आता नाशिक, नगर, पुणे आदी जिल्ह्यांमध्ये हळदीच्या लागवडीस सुरुवात झाली आहे. कोकणात जास्त करून घराकडील परसात हळदीची लागवड केली जाते. महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता या पिकाखाली क्षेत्र आणि उत्पादन वाढविण्यासाठी बराच वाव आहे. भारतातील आहारात हळदीचा उपयोग विविध प्रकारे होतो. भाजीमध्ये, तिखटामध्ये आणि मसाल्याच्या पावडरमध्ये उपयोग होतो. हिंदूंच्या धार्मिक कार्यात, सौंदर्य प्रसाधनासाठी तसेच लग्न समारंभात हळदीस अनन्य साधारण महत्व आहे. हळदीचा उपयोग औषधासाठी देखील होतो. हळदीपासून कुंकू तयार करतात. खोकल्यावर, छाती दुखल्यास, सर्पदंशावर, विंचु चावल्यास, मूळव्याध, कफ, मुतखड्यावर हळद औषधी म्हणून वापरली जाते. हळदीमध्ये अ जीवनसत्व असते. हळदीमध्ये रक्त शुद्ध करण्याचा गुण आहे. त्याशिवाय हळदीमुळे अन्नद्रव्यातील पाचक द्रव्य सुटी होतात व अन्न लवकर पचते. हळद पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. तापमान २० ते २५ अंश सेल्सिअस अनुकूल असून पाऊस ७० सेंटीमीटर ते २५० सेंटीमीटर पर्यंत चालतो. या पिकास मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. नदीकाठी पोयट्याच्या जमिनीत हळदीचे पीक चांगले येते. हळद लागवडीसाठी निवडलेली जमीन भुसभुशीत असावी. हळदीची लागवड अक्षय तृतीयेपासून म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मे महिन्यात करणे आवश्यक आहे. उशिरात उशिरा हळदीची लागवड जून महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात करावी. हळद हे जमिनीत वाढणारे खोड आहे. त्यामुळे जमीन जितकी भुसभुशीत तितके हळदीचे उत्पादन चांगले मिळते. त्यासाठी जमीन उभी व आडवी दोन ते तीन वेळा १८ ते २२ सेंटीमीटर खोल नांगरून घ्यावी. पहिली नांगरणी मार्चमध्ये करावी. जमीन १५ ते २० दिवस उन्हात तापू होऊ द्यावी. त्यानंतर दुसरी नांगरणी करून ढेकळे फोडून प्रती हेक्टरी २५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे. हळदीची लागवड दोन पद्धतीने केली जाते. सरी वरंबा पद्धतीने व रुंद वरंबा पद्धत. लागवडीसाठी हळकुंडे किंवा अंगठ्यापेक्षा मोठे गड्डे वापरणे चांगले असते. नाशके व कुजके गड्डे बियाण्यासाठी वापरू नयेत. लागवडीपूर्वी किडींचा आणि बुरशीजन्य रोगजंतूंचा नाश करण्यासाठी बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली अधिक २० ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बियाणे कमीत कमी १५ ते २० मिनिटे बुडवून घेऊन सावलीत सुकवून लागवडीसाठी वापरावे. हेक्टरी साधारणपणे २५ क्विंटल बियाणे लागते. हळद पिकास सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करावा. जमिनीच्या प्रकारानुसार हेक्टरी २५ ते ४० टन चांगले कुजलेले शेणखत मशागतीच्या वेळी देऊन मातीत चांगले मिसळावे. याशिवाय १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि ६० किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. यापैकी संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीपूर्वी द्यावे आणि नत्र खताची मात्रा दोन किंवा तीन हप्त्यात विभागून लागवडीपासून दिड, तीन व साडेचार महिन्यांनी द्यावी. हळद हे बागायती पीक आहे. हळदीला वेळेवर पाणी देणे अत्यंत जरुरीचे आहे. सात ते आठ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पीक नऊ महिन्याचे झाले की काढणीस येते. त्यावेळेस झाडांची पाने खालून पिवळी पडतात. रोपे सुकून जमनिवर लोळल्यावर पाणी देणे बंद करावे. हळदीचे पीक निघेपर्यंत १८ ते २२ पाण्याच्या पाळ्या लागतात. हळदीचे पीक आठ ते नऊ महिन्यात तयार होते. काढणीच्या वेळी गड्ड्यांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी. कंद व हळकुंडे वेगवेगळे वेचणी करावे. बियाण्यासाठी गड्डे योग्य ठिकाणी साठवावे. कुजलेले गड्डे वेगळे करून नष्ट करावे. नंतर गोलाकार ढिग करून तिथे हवा खेळती राहील, अशा जागी ठेवावी. एका हेक्टरपासून ३०० ते ४०० क्विंटल ओली हळद आणि २५ ते ३० क्विंटल गोल गड्डे मिळतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95940 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..