‘लम्पी’चा सामना करणार कसा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लम्पी’चा सामना करणार कसा?
‘लम्पी’चा सामना करणार कसा?

‘लम्पी’चा सामना करणार कसा?

sakal_logo
By

S87773

‘लम्पी’चा सामना करणार कसा?

जिल्ह्यात दुबळी यंत्रणा; ‘पशुसंवर्धन’ची निम्मी पदे रिक्त

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १४ ः सिंधुदुर्गाच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यात अजूनही लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झालेला नसला तरी जर प्रादुर्भाव जाणवला तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ५० टक्के पद रिक्त असलेला जिल्हा पशुसंवर्धन विभाग या संकटाचा सामना करणार कसा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने या आजाराच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून परजिल्ह्यातील जनावरे, चारा वाहतुक पोलीसामार्फत बंद केली आहे.
देश आणि राज्याच्या अनेक भागात लम्पी स्कीन आजाराने हाहाकार उडाला आहे. हा आजाराचा संसर्ग जलदगतीने पसरत असल्यामुळे शेतकरी हतबल आहेत. लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. जिल्ह्या बाहेरील जनावरे, चारा वाहतूक तपासणी नाक्यावर बंद करण्याचे पत्र पोलीस अधीक्षकांना दिल्यानंतर आंबोली, करूळ आणि फोंडा या तीन तपासणी नाक्यावर परजिल्ह्यातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याशिवाय तालुकानिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १० हजार लस उपलब्ध करण्यात आली असून आणखी लस खरेदी करण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे. जनजागृती मोहीम राबविण्याचे धोरण पशुसंवर्धन विभागाने आखले आहे. असे असले तरी जिल्ह्याच्या सीमेवर आलेल्या लम्पी स्कीनचा संसर्ग जिल्ह्यात झाला तर जिल्हा पशुसंवर्धन विभाग ५० टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कसा काय सामना करेल? असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे. प्रत्येक तालुक्यात पशुवैद्यकीय, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशु पर्यवेक्षक आणि या सर्व अधिकाऱ्यांना सहाय्य करणाऱ्या शिपायांची ५० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. सध्या जनावरांना होणाऱ्या सामान्य आजारांवर उपचार करण्यासाठी पशुधन विकास अधिकारी उपलब्ध होत नाही हे वास्तव आहे. त्यातच जर लम्पी स्कीनचे संकट ओढवले तर कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची ताराबंळ उडणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ रिक्त पदे भरावीत, अशी मागणी पशुपालकांकडून केली जात आहे.
------------
कोट
शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व पर्यायांचा वापर केला जात आहे. तालुकानिहाय पथके तयार केली आहेत. त्यांना प्राथमिक उपचाराचे साहित्य पुरविले आहे. पशुपालकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. १० हजार लस उपलब्ध आहेत. आणखी लस खरेदीची प्रकिया सुरू केली आहे. जनावरांची वाहतूक बंद केली आहे.
- डॉ. विद्यानंद देसाई, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सिंधुदुर्ग
------------
कोट
"जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव संसर्ग नसला तरी पशुसंवर्धन विभागाने खबरदारी घेण्याची गरज आहे. या विभागात असलेली रिक्त पदे शासनाने तत्काळ भरावीत, जेणेकरून लम्पीचा प्रादुर्भाव भासल्यास त्याचा सामना हा विभाग करू शकेल."
- रणजित तावडे, पशुपालक, वाभवे वैभववाडी
------------
पदाचे नाव*एकुण पदे*रिक्त पदे
पशुसंवर्धन अधिकारी*३३*८
सहाय्यक पशुधन अधिकारी*५१*२७
पशुधन पर्यवेक्षक*७२*३६
-----------

‘लम्पी’ रोखण्यासाठी
जिल्ह्यात सर्व्हेक्षण सुरू

‘पशुसंवर्धन’तर्फे खबरदारीचे आवाहन

सिंधुदुर्गनागरी, ता. १४ ः राज्यात जनावरांना ‘लम्पी’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबत सिंधुदुर्ग पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून गाव पातळीवर जनजागृती व सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई यांनी दिली.
राज्यातील काही जिल्ह्यात जनावरांना लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून आतापर्यंत राज्यात अडीच हजार जनावरे या आजाराने त्रस्त आहेत. सिंधुदुर्गात अद्यापपर्यंत तरी या आजारसदृश्य जनावर आढळून आले नसले तरी खबरदारी घेण्यासाठी राज्याच्या सूचनेनुसार पशुसंवर्धन विभागामार्फत तालुकास्तरावर माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०२ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ६८८ जनावरांचे सर्व्हेक्षण करून माहिती घेणे आणि प्रत्येक तालुक्यात गाय, म्हशी व अन्य जनावरांची खबरदारी घेण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याचे प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी देसाई यांच्या माध्यमातून तालुक्यात अचानक पथकामार्फत भेटी देऊन ‘लम्पी’ बाबत सतर्कता व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची माहिती घेण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यात अद्याप ‘लम्पी’चा प्रादुर्भाव झालेला दिसून येत नसला तरी हा आजार पसरु नये आणि जणावरे दगावू नये, याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. तशा सूचना तालुकास्तरावर दिल्याची माहिती देसाईंनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y95989 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..