पूर्वीच्या विश्वासू सहकाऱ्याबद्दल आदित्य काय बोलणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्वीच्या विश्वासू सहकाऱ्याबद्दल आदित्य काय बोलणार
पूर्वीच्या विश्वासू सहकाऱ्याबद्दल आदित्य काय बोलणार

पूर्वीच्या विश्वासू सहकाऱ्याबद्दल आदित्य काय बोलणार

sakal_logo
By

पूर्वीच्या विश्वासू सहकाऱ्यांबद्दल
आदित्य ठाकरे काय बोलणार
निष्ठा यात्रा ; दापोलीत सभा, चिपळुणात जंगी स्वागत
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १४ ः निष्ठायात्रेच्या निमित्ताने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दोन दिवसानंतर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. पूर्वीचे विश्वासू सहकारी आणि युवासेनेच्या कोअर कमिटीचे सदस्य आमदार योगेश कदम यांच्या मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे. चिपळूणमध्ये माजी आमदार सदानंद चव्हाण यांनीही बंडखोरी केल्यामुळे चिपळुणात त्यांचे जंगी स्वागत करून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. सेनेतील पूर्वीच्या या दोन विश्वासू सहकाऱ्यांबद्दल आदित्य ठाकरे काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर कोण नेते उपस्थित राहतात, याचीही उत्सुकता अनेकांना आहे.
आदित्य ठाकरेंच्या युवासेनेतील एकमेव आमदार योगेश कदम शिंदे गटात गेले. ते शिंदे गटात जाण्याआधी दोन वर्षापासून दापोली मतदार संघात माजी पालकमंत्री अनिल परब आणि आमदार योगेश कदम यांच्यात वाद रंगला होता. हा वाद मातोश्रीपर्यंत गेला; परंतु तेव्हा मातोश्रीकडून कोणतीही थेट भूमिका मांडण्यात आली नव्हती. त्यामुळे आमदार योगेश कदमांची नाराजी दापोली मतदार संघातून शिंदे गटाला बळ देण्यास पूरक ठरली होती. यामुळे आदित्य ठाकरेंच्या दापोली दौऱ्याला अधिक महत्त्व आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जायचे. शिवसेनच्या माध्यमातून चव्हाण दोनवेळा आमदार झाले. सुरवातीच्या भाजप-शिवसेना युतीमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांनी त्यांचा पराभव केला. त्याचवेळी महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले आणि सदानंद चव्हाण सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले.
पक्षातील लोकांकडूनच दुलर्क्ष होऊ लागल्याची तक्रार त्यांनी पक्ष सोडताना केली होती. त्यामुळे चव्हाण यांच्या बंडाबाबत आदित्य ठाकरे काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. काही महिन्यांपूर्वी दापोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. त्याच ठिकाणी आता निष्ठायात्रेची सभा होणार आहे. या सभेतून आदित्य ठाकरे रामदास कदम व आमदार योगेश यांनी केलेल्या गद्दारीलाही उत्तर देणार आहेत. चिपळूणमध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शिवसेनेच्या शहर कार्यालय परिसरात आदित्य ठाकरेंचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन यापूर्वी करण्यात आले होते; मात्र माजी आमदार सदानंद यांनीही बंडखोरी केल्यामुळे ठाकरेंचे चिपळुणात स्वागत तर होईलच त्याशिवाय ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे यासाठी नियोजन केले जात आहे. ठाकरेंच्या दौऱ्याचे नियोजन सूक्ष्म पातळीवर सुरू आहे. शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी जिल्हा परिषद गटानुसार बैठका घेत आहेत. नेत्यांनी गद्दारी केली तरी आम्ही शिवसैनिक पक्षातच आहोत, हे आदित्य ठाकरेपर्यंत पोहोचावे यासाठी पक्षातील कार्यकर्ते त्यांच्या दौऱ्याची तयारी करत आहेत.
-------------
कोट
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी पूर्ण झाली आहे. शिवसैनिक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन एक वेगळी ऊर्जा आणि वेगळा विचार घेऊन घरी जातील. आम्ही सर्वजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीबरोबर आहोत, हे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यातून स्पष्ट होईल.
- बाळा कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96016 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..