अपात्र रेशनकार्ड धारकांकडून जादा दराने वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपात्र रेशनकार्ड धारकांकडून जादा दराने वसुली
अपात्र रेशनकार्ड धारकांकडून जादा दराने वसुली

अपात्र रेशनकार्ड धारकांकडून जादा दराने वसुली

sakal_logo
By

‘गिव्ह इट अप्’ला फाटा देणाऱ्यांना दणका
शासनाचा निर्णय ; अपात्र रेशनकार्ड धारकांकडून जादा दराने वसुली
रत्नागिरी, ता. १४ः जिल्ह्यात शासनाच्या सार्वजनिक धान्यवितरण प्रणालीचा लाभ अपात्र व्यक्तीकडून घेतला जात आहे. त्यामुळे गरजू लोकांना या योजनेपासून वंचित राहावे लागते. अशा अपात्र लाभार्थींनी या योजनेतून स्वेच्छेने बाहेर पडण्यासाठी शासनाने काही वर्षापूर्वी ‘गिव्ह इट अप्’ योजना सुरू केली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करत धान्याचा लाभ काहीजण घेत आहेत. अपात्र योजनेतून बाहेर न पडलेल्या कार्डधारकांकडून प्रतिकिलो गव्हाची ४२ रुपये दराने तर तांदळाची ३२ रुपयांप्रमाणे सक्तीची वसुली केली जाणार आहे.
जिल्ह्यात या मोहिमेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शासनाची गिव्ह इट अप् अभियान अन्नसुरक्षा योजनेचा लाभ जे अपात्र लाभार्थी घेत आहेत त्यांनी स्वेच्छेने अन्नधान्याचा लाभ सोडावा, यासाठी राबवले जात आहे; मात्र, या मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. त्यामुळे शासनाने आता कारवाई कडक करण्यास सुरवात केली आहे. ज्यांचे उत्पन्न जास्त असूनही ते योजनेचा लाभ घेत आहेत असे लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेमधून बाहेर पडणार नाहीत, अशांवर या योजनेतून घेतलेल्या धान्याची वसुली केली जाणार आहे. ३२ रुपये प्रतिकिलो तांदळाची आणि ४२ रुपये प्रतिकिलो दराने गव्हाची वसुली शासनाकडुन सक्तीची वसुली केली जाणार आहे.
शासनाने यापूर्वी अनेक योजना आणून कमी उत्पन्न असलेल्या दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांना पोटभर अन्न मिळावे, या उद्देशाने जिल्हा पुरवठा विभागाकडून तांदूळ व गव्हाची अनुक्रमे २ व ३ रुपये किलो या दराने वितरित केले जातात; मात्र अनेक कार्डधारकांनी जास्त उत्पन्न असूनही सार्वजनिक धान्यवितरण व्यवस्थेचा गैरफायदा घेत असल्याचे दिसत आहे. याला पायबंद बसवण्यासाठी शासनाने ही गिव्ह इट अप् ही योजना आणली आहे. त्यालाही नागरिक फाटा देत असल्याने जादा दराने सक्तीची वसुली जिल्हा पुरवठा विभागाने सुरू केली आहे.

चौकट
अन्नसुरक्षा योजनेचे २.३५ लाख लाभार्थी
जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेचे २ लाख ३५ हजार १७४ लाभार्थी आहेत. या लाभार्थींना सध्या चार किलो तांदूळ आणि एक किलो गहू अनुक्रमे २ आणि ३ रुपये दराने दिले जात आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पन्न ५९ हजारापेक्षा कमी आहे अशांचा समावेश अन्नसुरक्षा योजनेत आहे; मात्र, ज्यांचे वार्षिक उत्पन्न वाढलेले आहे अशांनी लाभ सोडण्यासाठी अर्ज करावा.

चौकट
अर्ज कसा भराल?
ज्यांना अन्नसुरक्षा योजनेत मिळणाऱ्या सवलतीच्या धान्याचा लाभ सोडावयाचा आहे त्यांनी रेशन दुकानदार, तहसील कार्यालयात जाऊन धान्याचा लाभ सोडत असल्याचा अर्ज भरावा. अपात्र लाभार्थींनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडावे यासाठी शासनाने गिव्ह इट अप् उपक्रम सुरू केला आहे. तहसील कार्यालयामध्ये धान्य नाकारणाऱ्याचे अर्ज दाखल होण्यास सुरवात झाली आहे.

कोट...
राज्याच्या नागरी व अन्न पुरवठा विभागातर्फे सर्व जिल्ह्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स काही दिवसांपूर्वी झाली. या वेळी गिव्ह इट अप् या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे तसेच अपात्र या योजनेतून बाहेर न पडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आम्ही अपात्र कार्डधारकांकडून धान्याची वसुली जादा दराने करत आहोत.
- रोहिणी रजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी, रत्नागिरी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96069 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..