चिपळुणात शिंदे गट गुंतला जंगी मेळाव्याच्या तयारीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात शिंदे गट गुंतला जंगी मेळाव्याच्या तयारीत
चिपळुणात शिंदे गट गुंतला जंगी मेळाव्याच्या तयारीत

चिपळुणात शिंदे गट गुंतला जंगी मेळाव्याच्या तयारीत

sakal_logo
By

rat14p20.jpg
50104
चिपळूण ः तिवरे येथील बैठकीत माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले.
-----------
शिंदे गटाची जंगी मेळाव्याची तयारी
चिपळुणात गावनिहाय गाठीभेटींवर जोर; ठाकरेंच्या दौऱ्याला प्रत्युत्तराचे नियोजन
चिपळूण, ता. १४ः माजी आमदार सदानंद चव्हाण व त्यांच्या सहकारी समर्थकांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी सेना पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात जिल्हा परिषद गटनिहाय बैठकींचा सिलसिला सुरू केला. विविध पदाधिकाऱ्यांना आश्वासने देत पक्षात थांबण्यासाठी गळ घातली जात आहे, तर माजी आमदार चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी सायलंट डिप्लोमसीचे धोरण स्वीकारून मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत जंगी मेळावा घेण्याची तयारी सुरू ठेवली आहे. गावनिहाय समर्थकांच्या गाठीभेटींवर जोरदार भर दिला आहे.
गेल्या अडीच-तीन वर्षाच्या कालावधीत पक्षनेतृत्वाकडून मतदार संघातील विकासकामांसाठी बळ मिळाले नाही. राज्यात पक्षाची सत्ता असतानाही कार्यकर्त्यांना विकासकामांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतानाच शिंदे गटात जाणार असल्याचे माजी आमदार सदानंद चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी जाहीर केले होते.
दरम्यान, माजी आमदारांच्या बंडामुळे तालुक्यात शिवसेनेला भगदाड पडू नये यासाठी पक्षात राहिलेल्या पदाधिकाऱ्यांनी कधी नव्हे ते गटनिहाय बैठका घेतल्या. बैठकीच्या निमित्ताने ज्यांच्या पदरात पडले, त्यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. महामार्गातील ठेकेदार पदाधिकारीही कधी नव्हे ते तालुक्याच्या दौऱ्यात गुंतले आहेत. १६ ला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे चिपळूण दौऱ्यावर येत असल्याने येथे शक्तीप्रदर्शनाची तयारी त्यांनी सुरू ठेवली आहे. दुसरीकडे माजी आमदार सदानंद चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी तालुक्यात गाजावाजा न करता गावनिहाय कार्यकर्ते आणि लोकांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावा घेण्याचे शिंदे गटाचे नियोजन आहे. तशी जंगी तयारी शिंदे गटाकडून केली जात आहे. खुल्या मैदानात मेळाव्याचे नियोजन आहे.
मेळाव्याच्या रूपाने ताकद दाखवण्यासाठी चव्हाण व त्यांचे समर्थक कार्यकर्ते गाव आणि वाड्या पिंजून काढत आहेत. पक्षाकडून स्थानिक नेतृत्वावर कशा पद्धतीने अन्याय झाला, विकासकामांसाठी निधी देण्यात डावलण्यात आले. राज्यात सत्तेत सहभागी असतानाही राष्ट्रवादीच्या लोकांचीच बहुतांशी कामे झाल्याचे कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे. त्याला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

कोट
माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी चिपळूण मतदार संघात गावोगावी कार्यकर्ते घडवले. कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीच्या काळातही त्यांनी नेहमीच साथ दिली. त्यामुळेच बहुतांशी पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी राहिले. सध्या माजी आमदार चव्हाणांच्या उपस्थितीत गावोगावी होणाऱ्या बैठकांनाही जोरदार पाठिंबा मिळतो आहे.
- रूपेश घाग, माजी आमदार चव्हाण समर्थक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96118 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..