मुंबई साथींच्या विळख्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई साथींच्या विळख्यात
मुंबई साथींच्या विळख्यात

मुंबई साथींच्या विळख्यात

sakal_logo
By

मुंबई साथींच्या विळख्यात
मुंबई, ता. १४ : मुंबईत साथीच्या आजारांचा धोका कायम असून मलेरिया, डेंगी, गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. त्यातच मुंबईला स्वाईन फ्ल्यूच्‍या धोक्याची चिंता सतावत आहे. गणेशोत्सवानंतर  सुरू झालेला पाऊस पुन्हा एकदा आजारांना निमंत्रण देत आहेत. त्यामुळे पालिकेकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत घट झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा मलेरिया, डेंगी, लेप्टो, स्वाईन फ्ल्यू या आजारांचा झपाट्याने फैलाव झाला आहे. एका आठवड्यात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. मलेरिया ११८, डेंगी ५१ व गॅस्ट्रोचे ८३ रुग्ण आढळल्याने मुंबईत साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. मुंबईत या वर्षी पावसाळी आजारांमुळे ऑगस्टपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लेप्टो-मलेरियामुळे प्रत्येकी १ आणि डेंगी-स्वार्इन प्ल्यूमुळे प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्टमधील पावसाळी आजारांच्या स्थितीने पालिकेचे टेन्शन वाढले होते; मात्र ऑगस्टअखेरीस पुन्हा रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने दिलासा मिळाला होता; मात्र सप्टेंबरमध्ये पावसाळी आजारांनी पुन्हा डोके वर काढल्याने पालिकेचे टेन्शन पुन्हा
वाढले आहे.
--
गणेशदर्शन विशेष बससेवा ‘बेस्ट’
मुंबई, ता. १४ : मुंबईतील गणेशोत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट प्रशासनाकडून खुल्या दुमजली बस, ‘हो-हो’ योजनेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वातानुकूलित गाड्या आणि संपूर्ण रात्रभर विविध मार्गांवर चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्या सोडण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना देखील गणेशदर्शन सुलभ झाले. त्यामुळे बेस्ट प्रशासनाच्या महसुलात ४ लाख ५३ हजार २६९ रुपयांची भर देखील पडली. मुंबईतील विविध भागांत असलेल्या उंचच उंच मूर्ती पाहण्यासाठी देशभरातून गणेशभक्त मुंबईनगरीत दाखल होतात. मात्र त्यांना प्रवासासाठीच्या अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी बेस्टकडून यंदा विशेष लक्ष देण्यात आले. सार्वजनिक गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवादरम्यान बेस्टने रात्री सुरू केलेल्या विशेष गणेशदर्शन बस सेवेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रात्रभर चालविण्यात येणाऱ्या या गणेशदर्शन सुविधेमुळे नागरिकांना गणेश दर्शनात बाधा आली नाही. त्यामुळे ‘हो हो’ आणि खुल्या दुमजली तसेच अन्य बसमधून २५७१२ प्रवाशांनी प्रवास केला. यातून बेस्टच्या महसुलात ४ लाख ५३ हजार २६९ रुपयांची भर पडली. यामुळे विशेष बस सेवेला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल बेस्ट उपक्रमाने समाधान व्यक्त केले आहे.
--
ईशान्य मुंबईत गढूळ पाणीपुरवठा
घाटकोपर, ता. १४ ः ईशान्य मुंबईतील विक्रोळी, घाटकोपर आदी भागांत गेल्या तीन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे संबंधित पालिका अधिकारी याबाबत ठिकठिकाणी फिरून आढावा घेत आहेत. पाणीपुरवठा होणाऱ्या तलावातून गढूळ पाणी येत असून, कालपासून अधिकारी पाण्याचे नमुने घेत असल्याची माहिती पालिकेच्या घाटकोपर एन विभागातील पाणी खात्याचे मुख्य अधिकारी महेश पवार यांनी दिली.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडत आहे. त्यामुळे हा गढूळ पाणीपुरवठा होत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे पाणी गढूळ असले तरी आजारांना निमंत्रण देणारे नाही. तरीही नागरिकांनी ते उकळूनच पिण्यास वापरावे, असे आवाहन पालिका अधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान, यापूर्वीही काही दिवसांपूर्वी घाटकोपर भागातील पंतनगर, रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर तसेच पश्चिमेकडील भटवाडी, असल्फा व्हिलेज या भागात गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत होता; मात्र सध्या फक्त गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तरीही नागरिकांतून आजारांची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उद्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
--
कृषी अभ्यासक्रमासाठी आजपासून प्रवेश
मुंबई, ता. १४ : राज्यातील कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यात पहिल्या प्रवेशाची यादी ११ ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची तयारी करण्याचे आवाहन सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी केले आहे.
राज्यातील कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयांमध्ये १९३ महाविद्यालयांमध्ये १६ हजार ६२६ जागा उपलब्ध आहेत. यातील प्रवेशासाठी ५ ते २० ऑगस्टदरम्यान परीक्षा घेण्यात आली. याचा निकाल १५ सप्टेंबरला जाहीर होणार आहे. त्यानुसार १५ ते २५ सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे आणि आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायची आहेत. त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी ८ ऑक्टोबरला तर पहिल्या प्रवेश फेरीची यादी ११ ऑक्टोबरला सायंकाळी जाहीर होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96229 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..