विकास आराखड्यावर कणकवलीत खडाजंगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकास आराखड्यावर कणकवलीत खडाजंगी
विकास आराखड्यावर कणकवलीत खडाजंगी

विकास आराखड्यावर कणकवलीत खडाजंगी

sakal_logo
By

kan१५१.jpg
५०२१३
कणकवली : येथील नगरपंचायत सभेत शहर विकास आराखड्यावर चर्चा करताना नगराध्यक्ष समीर नलावडे.

आराखडा बैठकीवरून कणकवलीत खडाजंगी
नगरपंचायत सभा : पुढील आठवड्यात सर्व १९ नगरसेवकांची होणार बैठक
कणकवली, ता. १५ : शहर विकास आराखड्याची बैठक घाईघाईने बोलावण्यात आली. या मुद्दयावर आजच्या नगरपंचायत सभेत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांत खडाजंगी झाली. अखेर पुढील आठवड्यात सर्व १९ नगरसेवकांची एकत्रित बैठक लावून आराखड्यातील आरक्षणांवर निर्णय घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.
कणकवली नगरपंचायतीची सभा आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, कन्हैया पारकर, सुशांत नाईक, मानसी मुंज, माही परुळेकर, कविता राणे, संजय कामतेकर, अभिजित मुसळे, रुपेश नार्वेकर, अबीद नाईक, ॲड. विराज भोसले, मेघा गांगण आदी उपस्थित होते.
विकास आराखड्याबाबत मागील आठवड्यात शहरवासियांकडून सूचना मागविण्याबाबत बैठक झाली. ही बैठक घाईघाईने का बोलावण्यात आली? सकाळी निमंत्रण आणि दुपारी बैठक असा प्रकार कशासाठी? असा मुद्दा कन्हैया पारकर यांनी उपस्थित केला. तर शहर विकास आराखडा तयार करण्यासाठी जी कंपनी नियुक्‍त केली आहे, ती कंपनी येत्‍या आठ ते दहा दिवसांत विकास आराखडा निश्‍चित करणार आहे. त्‍यामुळे शहरवासीय आणि आम्‍हा लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून आराखडा तयार केला जात असल्‍याचा आरोप सुशांत नाईक यांनी केला.
नगराध्यक्ष नलावडे यांनी विरोधी नगरसेवकांचे आरोप खोडून काढले. गेल्‍या आठवड्यात झालेली बैठक ही शहरातील तज्‍ज्ञ मंडळींकडून अभिप्राय मागवण्यासाठी होती. पुढील काळात आणखीही बैठका होणार आहेत. त्‍यात शहर विकास आराखड्याबाबत चर्चा करून निर्णय घेऊया, असे नलावडे यांनी सांगितले. यावेळी कन्हैया पारकर यांनी तुमच्या पक्षात हुकूमशाही चालते मात्र आम्‍ही सर्वानुमते निर्णय घेतो असे स्पष्‍ट केले.
नगरपंचायत बैठकीमध्ये कोविड काळात शहरातील ज्‍या महिलांचे पती कोरोनामुळे दगावले, त्‍यांना प्रत्‍येकी २५ हजार रूपये साहाय्य देण्याचा ठराव करण्यात आला. तर प्रत्‍येक नगरसेवकांनी आपापल्‍या प्रभागातील विकासकामांची यादी द्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले.

कोट
शहराच्या सुधारित विकास आराखड्यामध्ये शहरवासीयांवर अन्याय होता नये. नागरिकांना विश्‍वासात घेऊन आराखडा तयार करावा तसेच आरक्षणे निश्‍चित करण्यात यावीत हीच भूमिका आम्‍ही सभागृहात मांडली.
- कन्हैया पारकर
...
कणकवली शहराचा विकास आराखडा खासगी कंपनीकडून तयार केला जात आहे. अहवाल तयार झाल्‍यानंतर त्‍यावर नागरिकांकडून सूचना, हरकती मागवून सुनावणी घेतली जाणार आहे. यानंतरच हा अहवाल सभागृहात ठेवला जाणार आहे.
- अवधूत तावडे, मुख्याधिकारी
...
शहरातील अस्तित्वात असलेल्‍या जागा, इमारतींचा नकाशा तयार झाला आहे. या नकाशाच्या आधारावर प्रस्तावित शहर आराखडा तयार केला आहे. हा प्रस्तावित शहर विकास आराखडा ऑनलाईन आणि नगरपंचायतीच्या नोटिस बोर्डवर लवकरच सर्व नागरिकांना पाहण्यासाठी लवकरच खुला केला जाणार आहे.
- बंडू हर्णे, उपनगराध्यक्ष

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96263 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..