वाफोली धरण पर्यटकांना खुणावतेय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाफोली धरण पर्यटकांना खुणावतेय
वाफोली धरण पर्यटकांना खुणावतेय

वाफोली धरण पर्यटकांना खुणावतेय

sakal_logo
By

50453
वाफोली ः धरण पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेला व पर्यटकांना खुणावणारा सुंदर धबधबा. (छायाचित्र ः महेश चव्हाण)

वाफोली धरण पर्यटकांना खुणावतेय

पावसामुळे ‘ओव्हर फ्लो’; बांदा-दाणोली मार्गावरील ठिकाण

महेश चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १६ ः सह्याद्री पट्ट्यात सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने वाफोली धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. वाढत जाणाऱ्या पावसामुळे धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले असून सभोवतालच्या मनमोहक निससौंदर्याने येथील धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरला आहे.
बांदा-दाणोली या मुख्य मार्गालगतच वाफोली येथे धरण असून हा फेसाळणारा धबधबा वाटसरू प्रवासाच्या दृष्टीस पडतो. गोवा राज्यातून आंबोली या थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीने सध्या उच्चांक गाठला आहे. आंबोली येथे पर्यटनाची मजा लुटण्यासाठी जाणारे गोव्यातील पर्यटक याच पर्यायी व सोयीस्कर मार्गाचा अवलंब करतात. या मार्गावरून प्रवास करताना केवळ ८० फुटांच्या अंतरावर हा धबधबा दृष्टीस पडतो. त्यामुळे पर्यटक नकळत आणि कुतुहलाने पर्यटकांची पावले या धबधब्याखाली मौजमस्ती करण्यासाठी वळताना दिसतात. आजूबाजूच्या गावातील कुटुंबेसुद्धा रविवारची सुटी एन्जॉय करण्यासाठी या छोटेखानी धबधब्याला पसंती देत आहेत. निसर्गाच्या या कृत्रिम अविष्कारामुळे वाफोली गावाला पर्यटनदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मार्गावरील जुने तीव्र उताराचे नागमोडी वळण काढून त्या ठिकाणी आता विस्तृत पूल यावर्षी बांधण्यात आले आहे. या पुलाला धरण धबधब्याशी समांतर अशी अधिक उंची आणि पुलावरील मार्गावर पुरेशी रुंदी दिल्याने वाटसरू, पर्यटकांची पावले या ठिकाणी आपसूकच थांबतात. या पुलावरून धबधब्याचे विहंगम दृश्य अधिकच सुंदर दिसत असल्याने सेल्फीसाठी पर्यटकांची या पुलावर गर्दी असते. बांदा बाजारपेठेपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या धबधब्याची पर्यटन दृष्ट्या डागडुजी करणे गरजेचे बनले आहे. सध्या या ठिकाणी झुडपे मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांना अडचणीचे ठरत आहे. स्थानिक ग्रामस्थ धबधबा परिसरात दरवर्षी साफसफाई व डागडुजी करतात; पण ती तात्पुरत्या स्वरुपात असते. या स्थळाची सुंदरता अधिक खुलविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यासह गोवा परिसरातील पर्यटकांचा ओढा वाढून प्रसिध्द पर्यटनस्थळ म्हणून याचा नावलौकिक वाढेल, यात शंका नाही.
............
चौकट
शासनस्तरावरून प्रयत्नांची गरज
धरण परिसर आणि विसर्ग स्वरुपातील धबधब्यानजीक जाणारा मार्ग आंबोली आणि गोवा या दोन प्रसिद्ध पर्यटनस्थळांना जोडतो. त्यामुळे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या धरण परिसरासह धबधब्याचा पर्यटन दृष्ट्या विकास होणे गरजेचे आहे. सुसज्ज पायऱ्या, बैठक व्यवस्था, रहदारीसाठी थेट पुलावरून सुरळीत रस्ता किंवा लोखंडी रेलिंग आदी बाबींची पूर्तता झाल्यास पर्यटकांची संख्या वाढणार आहे. यासाठी शासनस्तरावरून सकारात्मक प्रयत्न होणे गरजेचे आहे. धबधबा परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास हॉटेल व्यवसायासह अनेक लहानमोठ्या रोजगाराच्या संधी स्थानिकांसाठी प्राप्त होतील.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96655 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..