मोदकातून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदकातून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न
मोदकातून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न

मोदकातून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न

sakal_logo
By

50467
माजगाव ः कोकणरत्न उत्पादक गटाच्या महिलांनी तयार केलेले काजू मोदक.
50468
माजगाव ः तयार केलेले काजू मोदक प्लास्टिक पिशवीत बंदिस्त करताना महिला.


मोदकातून मिळवले दोन लाखांचे उत्पन्न

बचतगटाची यशोगाथा; माजगावमधील सिद्धिविनायक महिला समूह

विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः जिल्ह्यातील महिला बचतगट यशस्वी उद्योजक समूह म्हणून पुढे येताना दिसत आहेत. विविध व्यवसायात व्यावसायिक म्हणून उतरत त्यात यश संपादन करीत आहेत. माजगाव उद्यमनगर (ता.सावंतवाडी) येथील सिद्धिविनायक महिला समूहाने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात काजू मोदक उत्पादित करीत त्याची विक्रमी विक्री केली आहे. ४ हजार ८५० मोदक बॉक्स विक्री करीत ३ लाख १५ हजार २५० रुपये एवढा व्यवसाय केला आहे. यासाठी केवळ एक लाख रुपये एवढी गुंतवणूक केली होती. त्यामुळे तब्बल २ लाख १५ हजार २५० रुपये एवढे निव्वळ उत्पन्न मिळविले आहे.
उमेद-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील महिलांना संघटित करून त्यांना बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक बचत करण्याची सवय लावण्यात आली आहे. आता या बचतगटांचे समूह तयार करून त्यांना विविध उद्योग व्यवसायाकडे वळविले जात आहे. यासाठी त्या महिलांना आवश्यक अनुदान, कर्ज शासन बँकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देत आहे. याशिवाय व्यवसायाचे मूलभूत प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे. त्यामुळे समूहाच्या माध्यमातून महिला व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे शासनाचा महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा उद्देश सफल होताना दिसत आहे.
जिल्ह्यात उमेद-राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचतगटांना पुनर्जीवित करून त्यांना व्यवसायाकडे वळविले जात आहे. त्याला जिल्ह्यातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील विविध बँका सुद्धा या महिला बचतगटांना कर्ज उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील असंख्य महिला बचतगट विशेषतः स्थानिक उत्पादनावर प्रक्रिया करणारे उद्योग करीत आहेत. त्याप्रमाणे सावंतवाडी तालुक्यातील माजगाव उद्यमनगर येथील सिद्धिविनायक महिला समूह स्थानिक उत्पादनावर प्रक्रिया करणारे विविध व्यवसाय करीत आहे.
कोकणरत्न उत्पादक गट म्हणून कार्यरत असलेल्या सिद्धिविनायक महिला समूहाची स्थापना १५ मार्च २०१५ ला झाली आहे. तर कोकणरत्न उत्पादक गट म्हणून १९ नोव्हेंबर २०१९ ला या समूहाने प्रवेश केला आहे. अध्यक्षा वैशाली गवस, सचिव नमिता पेडणेकर व कोषाध्यक्ष अनिता बोगटी या महिला आपल्या समूहातील अन्य महिलांना सोबत घेत २०२० पासून विविध उत्पादने घेण्यास प्रारंभ केला. काजू, आंबा, कोकम, फणस या स्थानिक उत्पादनावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनविण्यास सुरुवात केली. याला सुरुवाती पासून चांगला प्रतिसाद लाभत आहे.
यातील काजू मोदक उत्पादन कोकणरत्न उत्पादक गटाला मोठी ऊर्जा देणारे ठरत आहे. काजू मोदक चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे या गटाने उत्पादित केलेल्या काजू मोदकाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. यावर्षी सुद्धा या बचतगटाने काजू मोदक उत्पादित केले होते. यावर्षी काजू मोदकाची फलदायी विक्री झाली आहे. यामुळे या उत्पादक समूहाला चांगला फायदा झाला आहे. यामुळे काजू मोदक उत्पादन घेवून महिला उत्पादक गट आर्थिक ऊर्जितावस्था आणू शकतात, हे कोकणरत्न उत्पादक गटाने सिद्ध केले आहे. जिल्ह्यातील अन्य बचतगटासमोर आदर्श निर्माण केला आहे. तसेच राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान मागचा शासनाचा उद्देश सफल केला आहे.
-----------
इतर काही उत्पादने
सिद्धिविनायक महिला समूह कोकणरत्न उत्पादक गटाच्या माध्यमातून काजू, आंबा, कोकम आणि फणस यावर प्रक्रिया उद्योग करीत आहेत. काजूपासून काजू चॉकलेट, काजू लाडू, काजू मोदक तसेच काजूच्या बियापासून सर्व प्रकारचे काजूगर तयार करतात. आंब्यापासून आंबा पोळी, आंबा पल्प, आमचूर पावडर बनवितात. कोकमपासून अमृत कोकम, कोकम सरबत, गोड कोकम, कोकम आगळ, खाण्याचे कोकम तयार करतात. तसेच फणस पासून फणस वेफर्स तयार करतात.
-------------
चौकट
सव्वादोन लाखांचा नफा
यावर्षी काजू मोदक बनविण्यात आले होते. ५ हजार २०० एवढे एकूण काजू मोदक बॉक्स तयार केले होते. यातील ४ हजार ८५० बॉक्सची विक्री झाली आहे. ६५ रुपये दराने एक काजू मोदक बॉक्सची विक्री करण्यात आली. एकूण ३ लाख १५ हजार २५० रुपयांचे काजू मोदक विकण्यात आले. यासाठी एक लाख रुपयांची गुंतवणूक होती. तर एकूण व्यवसाय ३ लाख १५ हजार २५० रुपयांचा झाला. यातील झालेला एक लाखाचा खर्च वजा केल्यास दोन लाख १५ हजार २५० रुपयांचा निव्वळ नफा झाला.
------------
कोट
सिद्धिविनायक महिला समूहाची स्थापना १५ मार्च २०१५ ला केली. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत अनुदान व कर्ज मिळत गेले. यातून आम्ही १९ नोव्हेंबर २०१९ ला कोकणरत्न उत्पादक गट तयार केला. त्यानंतर आम्ही व्यवसायात उतरलो. यासाठी आवश्यक प्रशिक्षण उमेद अभियान अंतर्गत देण्यात आले. त्यातून आम्ही स्थानिक उत्पादनावर प्रक्रिया करणारे उत्पादन सुरू केले. यावर्षी काजू मोदक बनविले होते. त्याला बाजारपेठेत चांगली मागणी लाभली.
- वैशाली गवस, नमिता पेडणेकर, अनिता बोगटी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y96667 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..